ऑनलाईन थट्टा, वैयक्तिक द्वेषातून कट : १,३७१ पानी आरोपपत्र
पणजी : वैयक्तिक द्वेष आणि ऑनलाईन थट्टेमुळे कट रचून मुख्य सूत्रधार जेनिटो कार्दोझ याच्या इशाऱ्यावरून समाज कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला, असा दावा पोलिसांनी केला आहे. जेनिटोसह इतर सात जणांच्या विरोधात मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात १,३७१ पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, यात ४९ जणांची साक्ष नमूद आहे.
करंझाळे येथे १८ सप्टेंबर रोजी रामा काणकोणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी पणजी पोलिसांनी मुख्य सूत्रधार जेनिटो कार्दोझ याच्यासह अँथनी नदार, फ्रान्सिस नदार, मिंगेल आरावजो, मनीष हडफडकर, सुरेश नाईक, फ्रांको डिकॉस्टा व साईराज गोवेकर या आठ जणांना अटक केली होती. संशयितांना मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रथम पोलीस कोठडी ठोवली. ती संपल्यानंतर आठही संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
रामा काणकोणकर यांनी जबाबात ‘मिंगेल आरावजो हा आपला पाठलाग करत होता. मारहाण करताना हल्लेखोरांनी आपल्याला ‘गावडा’ आणि ‘राखणदार’ म्हणून हिणवण्याचा प्रयत्न केला’, असे सांगितले होते. याची दखल घेऊन पोलिसांनी या गुन्ह्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (छळ प्रतिबंध) कायद्याअंतर्गत कलम जोडून हे प्रकरण पोलीस उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्याकडे चौकशीसाठी सोपवले होते. याच दरम्यान सराईत गुंड जेनिटो कार्दोझ याने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता, तो न्यायालयाने फेटाळून लावला होता.
१) या प्रकरणी ओळख परेड घेतली असता, रामा काणकोणकर आणि तक्रारदार सोयरू वेळीप यांनी हल्ला करणारे संशयित अँथनी नदार, फ्रान्सिस नदार, मिंगेल आरावजो, मनीष हडफडकर, सुरेश नाईक, फ्रांको डिकॉस्टा व साईराज गोवेकर यांना ओळखल्याचे समोर आले.
२) दरम्यान, रामा काणकोणकर याने ऑनलाईन केलेल्या थट्टेमुळे तसेच वैयक्तिक द्वेषामुळे कट रचून त्याच्यावर हल्ला केल्याचा जबाब संशयित फ्रान्सिस नदार याने दिला.
३) हा हल्ला जेनिटोच्या इशाऱ्यावरूनच केल्याचा दावा करत पोलिसांनी आठही संशयितांविरोधात १,३७१ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.