जि.प. निवडणुका : ‘आप’ स्वबळावर, काँग्रेसची ‘महाआघाडी’

भाजपचीही रणनीतीवर चर्चा, बंडखोरी टाळण्यासाठी प्रयत्न

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th November, 11:03 pm
जि.प. निवडणुका : ‘आप’ स्वबळावर, काँग्रेसची ‘महाआघाडी’

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या तोंडावर विविध राजकीय पक्षांकडून उमेदवार निवडीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. आम आदमी पक्षाने (आप) १४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, भाजप व काँग्रेस यांनीही उमेदवारी निश्चित करण्यासाठी बैठका सुरू केल्या आहेत.

काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजी (रेव्होल्यूशनरी गोवन्स) या विरोधी पक्षांमध्ये युती होईल, असे काँग्रेस विधीमंडळ नेते युरी आलेमाव यांनी स्पष्ट केले. यामुळे जिल्हा पंचायत निवडणुकीचे वातावरण तापायला लागले आहे.

जिल्हा पंचायत निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतरही आचारसंहितेची अधिसूचना अद्याप जाहीर झालेली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारखांसह इतर सर्व तारखा आणि आचारसंहितेची अधिसूचना पुढील दोन दिवसांत जाहीर होणार आहे. इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्ष आचारसंहितेच्या अधिसूचनेची प्रतीक्षा करत आहेत.

भाजपचा ‘माझे घर’वर भर

जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप ‘माझे घर’ व सरकारने केलेल्या विविध विकासकामांवर भर देण्याची त्यांची तयारी आहे. निवडणुकीचे संपूर्ण कार्यक्रम जाहीर होताच भाजप उमेदवारांची घोषणा करणार आहे. पक्षाच्या सुकाणू समितीच्या बैठकीत निवडणूक प्रचार व रणनीतीवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

गोव्यात १३ डिसेंबरला जिल्हा पंचायत निवडणुका होत आहेत. आचारसंहिता लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या नेतृत्वाखाली सुकाणू समितीची बैठक झाली. या बैठकीत सिद्धार्थ कुंकळ्येकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, चंद्रकांत कवळेकर, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, खासदार सदानंद शेट तानावडे, क्रीडा मंत्री रमेश तवडकर तसेच माजी खासदार विनय तेंडुलकर उपस्थित होते.

बंडखोरी टाळण्यासाठी प्रयत्न : कुंकळ्येकर

आचारसंहिता लागू होताच भाजप उमेदवारांची घोषणा करणार आहे. प्रचार आणि रणनीतीवर या बैठकीत चर्चा झाली. मंत्री, आमदार आणि पदाधिकारी राज्यभर प्रचार करणार असल्याची माहिती सुकाणू समितीचे सदस्य सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी दिली. यावेळी उमेदवारी जाहीर होताना होणारी बंडखोरी टाळण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. बंडखोरीचे प्रमाण कमी रहावे यासाठी इच्छुकांशी तातडीने चर्चा सुरू आहे.

महाआघाडी विधानसभेपर्यंत कायम!

आम आदमी पक्षाने १४ उमेदवार जाहीर केल्याने ते निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजी या तिन्ही पक्षांची युती अंतिम होईल. जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी ही महाआघाडी तयार झाली असून युती २०२६ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहील, असे युरी आलेमाव यांनी सांगितले. जागावाटपाबाबत चर्चा पूर्ण होताच उमेदवारांची घोषणा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षांची युती आणि उमेदवारांच्या यादीवर दिल्लीत बैठकीत चर्चा झाली. मी आज या बैठकीसाठी दिल्लीत आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली. जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी स्थापन केलेल्या समितीची बैठक झाली असल्याचे त्यांनी सांगितले. या समितीत अमित पाटकार (प्रदेश अध्यक्ष), युरी आलेमाव (विधिमंडळ नेते), खासदार विरियातो फर्नांडिस, उपाध्यक्ष एम. के. शेख, आमदार कार्लुस फेरेरा, एल्टन डिकोस्ता आणि गिरीश चोडणकर यांचा समावेश आहे.

सर्व ५० उमेदवार जिंकून आणण्याचा प्रयत्न : दामू नाईक

जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपचे सर्व ५० उमेदवार जिंकून आणण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. तसेच या निवडणुकीत पक्षातर्फे ८० टक्के नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. यातून कार्यकर्त्यांना संधी देण्याचा पक्षाचा प्रयत्न असणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पणजीत पत्रकारांना सांगितले. आरक्षणामुळे नाराज असलेले बंडाच्या पवित्र्यात आहेत का? या प्रश्नाला उत्तर देताना, भाजपचा कार्यकर्ता बंड करणे अशक्य आहे, असे दामू नाईक म्हणाले. प्रत्येक कार्यकर्ता ‘पार्टी फर्स्ट’ असे मानतो, असे ते म्हणाले. राज्यातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन सुद्धा जिल्हा पंचायत निवडणुकीत सर्वात जास्त जागा भाजपच्या असतील, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला.

हेही वाचा