आमदार देविया राणे, जीत आरोलकरांनी घेतला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा आदर्श

पहलगाम हल्ल्यामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th April, 12:26 am
आमदार देविया राणे, जीत आरोलकरांनी घेतला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा आदर्श

पणजी : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला नाही. वाढदिवसानिमित्त फक्त सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले. मुख्यमंत्र्यांसह आमदार देविया राणे आणि जीत आरोलकर यांनीही वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द केले आहेत. केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनीही त्यांचा वाढदिवस साजरा केला नाही.

मंगळवारी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याने संपूर्ण देशाला दुःख झाले आहे. हल्ल्याचा निषेध आणि शोक व्यक्त करण्यासाठी  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेतला नाही. तसेच त्यांनी जनतेच्या जाहीरपणे शुभेच्छाही स्वीकारल्या नाहीत. तथापि, त्यांनी साखळी येथील रवींद्र भवन येथील आरोग्य शिबिराला भेट दिली.

पर्येच्या आमदार देविया राणे यांचा शुक्रवारी वाढदिवस आहे. मात्र वाढदिवसानिमित्त कोणताही कार्यक्रम आयोजित करू नका असे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. वाढदिवसाची पार्टी किंवा सार्वजनिक कार्यक्रम होणार नाहीत. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांचा ३० एप्रिल रोजी वाढदिवस असून ते देखील त्यांचा वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरा करणार नाहीत.

केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा २३ एप्रिल रोजी वाढदिवस होता. मात्र त्यांनी देखील वाढदिवसाचे कोणतेही कार्यक्रमही आयोजित केले नाहीत. काजू महोत्सव २५ एप्रिलपासून सुरू होणार होता, तो देखील पहलगाम हल्ल्यामुळे पुढे ढकलण्यात आला आहे.

आमदार डिलायला लोबोंकडून वाढदिवसाची पार्टी 
शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनी मात्र स्वत:च्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन केले होते. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प आमोणकर यांनी केक कापण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.