पीडितेकडून खटला पुढे नेण्यास नकार
पणजी : बार्देश तालुक्यातील एका युवतीला २०२४ मध्ये लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. यात तिने बाळाला जन्म दिला. या प्रकरणी पीडितेने आपण दोघांनी लग्न केल्याचे न्यायालयात स्पष्ट करत खटला पुढे नेण्यास नकार दिला. याची दखल घेऊन पणजी येथील जलदगती न्यायालयाच्या न्या. दुर्गा मडकईकर यांनी संशयिताची पुराव्याअभावी आरोपातून सुटका केली आहे.
या प्रकरणी पर्वरी पोलीस स्थानकात पीडित युवतीने १९ ऑगस्ट २०२४ रोजी तक्रार दाखल केली होती. युवती आणि संशयितामध्ये २०२१ पासून प्रेमसंबंध होते. संशयिताने पर्वरी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील युवतीला त्याच्या निवासस्थानी नेले आणि तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार १ फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत झाला. त्याच दरम्यान त्या दोघांनी लग्नाची नोंदणी प्रक्रिया सुरू केली होती. त्यानंतर युवती पाच महिन्यांची गरोदर राहिली. संशयित लग्नाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यास तयार झाला नाही. त्यामुळे पीडित युवतीने संशयिताविरोधात पर्वरी स्थानकात वरील माहितीसह तक्रार दाखल केली. याची दखल घेऊन पर्वरी पोलीस स्थानक उपनिरीक्षक प्रज्योती देसाई यांनी संशयित युवकाविरोधात भादंसंच्या कलम ३२८ आणि ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी २० ऑगस्ट २०२४ रोजी त्याला अटक केली. उपनिरीक्षक लाॅरीन सिक्वेरा यांनी तपास पूर्ण करुन १६ ऑक्टोबर २०२४ रोजी संशयित युवकाविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
युवतीची न्यायालयात उलटतपासणी झाली असता, त्या दोघांनी लग्न केल्याचा जबाब दिला. तसेच खटला सुरू ठेवण्यास नकार दिला. याची दखल घेऊन न्यायालयाने संशयिताची निर्दोष सुटका केली.
दि. १९ नोव्हेंबर २०२४ रोजी पीडित युवतीने बाळाला जन्म दिला. त्यानंतर १ मार्च २०२५ रोजी न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेत संशयित युवकाविरोधात आरोप निश्चित केला. यानंतर संशयिताने पीडित युवतीबरोबर २ एप्रिल २०२५ रोजी लग्नाची प्रक्रिया पूर्ण केली.