घराला आग लागून सिलींडर स्फोट; मायलेकीने गमावले सर्वस्व

विळीयण भाटी सांगे येथे घर भस्मसात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th April, 12:01 am
घराला आग लागून सिलींडर स्फोट; मायलेकीने गमावले सर्वस्व

सांगे : वेळीपवाडा विळीयण भाटी सांगे येथे श्रीमती रोहिदास गावकर यांच्या घराला आग लागून घरातील सिलींडरचा स्फोट झाला. आगीत कपडे, सोनसाखळी, कर्णफुले, कागदपत्रे जळून खाक झाली. अंगावरील कपड्यांशिवाय मायलेकीकडे कोणतेही साहित्य शिल्लक राहिले नाही.

विळीयण भाटी येथे श्रीमती रोहिदास गावकर व तिची कन्या तेजा हे दोघेच राहतात. घरावर सिमेंट पत्र्याचे छत, घरात कमाविणारी अशी कोणीच व्यक्ती नाही. दोघांची शारीरिक परिस्थिती एकदम वाईट आहे. जेवणखाण्यासाठी शेजाऱ्यांवरच त्या अवलंबून होत्या. अशी बिकट परिस्थिती असताना रात्रीचे जेवण करुन त्या शेजारच्या घरात झोप असत. हा त्यांचा नित्यक्रम होत. बुधवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घरात कोणी नसताना आग लागली. आग लागल्याचे समजताच शेजारील कृष्णा भंडारी आपल्या घरातून बाहेर आले. तोपर्यंत घर जळून खाक झाले होते. त्यात गॅस सिलिंडर फुटल्याने आगीचा भडका उडून सर्व काही जळून राखरांगोळी झाली.

कृष्णा भंडारी यांनी रात्रीच कुडचडे अग्निशमक दल आणि सांगे पोलिसांना याची माहिती दिली. मात्र, त्याआधीच सर्व काही संपले होते. या दुर्घटनेमुळे अंगावरील कपड्याशिवाय एकही वस्तू शिल्लक राहिलेली नाही. एकमेव अशा लोखंडी कपाटात काही कपडे, एक सोनसाखळी, कर्णफुले तीसुद्धा जळून राख झाली. घराचा असलेला कागदी पुरावा तोही शिल्लक राहिलेला नाही.

सर्व कागदपत्रे जळून खाक

शिधापत्रिका, गॅस कार्ड, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे पासबुक, आठ ते दहा हजार रुपयांची दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेची रोख रक्कम, भांडी, कपडे, तांदूळ, खाण्याचे काही सामान सर्व काही जळून खाक झाले. आता सर्व कागदपत्रे नव्याने तयार करुन देण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांनी खास आदेश देऊन त्या- त्या खात्याकडून कागदपत्रे तयार करून देण्याची गरज आहे. 

हेही वाचा