ट्रकमधील दोघांना इजा : झाडामुळे ट्रक दरीत कोसळण्यापासून बचावला
जोयडा : बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड घाटात दूधसागर देवस्थान ठिकाणी असलेल्या वळणावर ट्रक व कार यांच्यात बुधवारी अपघात झाला. या अपघातात चौघे जखमी झाले असून त्यांच्यावर बांबोळी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
कर्नाटकातून गोव्यात जाणाऱ्या ट्रकचे नियंत्रण सुटल्याने प्रथम कारला धडक दिली. यानंतर चॅपेलला (क्रूसाला) ट्रकने धडक दिली, तिथेच असलेल्या एका झाडामुळे ट्रक दरीत कोसळण्यापासून बचावला. अपघातात जखमी झालेले ट्रक चालक व वाहक महाराष्ट्रातील असून कारमधील जखमी हे गोव्यातील आहेत.
कर्नाटकमधून येणाऱ्या या ट्रकमध्ये सिमेंटची पोती होती. तर दुसऱ्या बाजूने येणारी मडगावमधील वॅगनर गाडी बेळगावच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला.
रामनगर - गोवा राष्ट्रीय महामार्गवर अनमोड घाटात दूधसागर देवाचे मंदिर आहे. त्यामुळे इथून जाणारा प्रत्येक चालक मंदिराला नक्कीच भेट देतो. त्याप्रमाणे मडगावमधून आलेला कार चालक देखील गाडी बाजूला पार्क करुन मंदिरात जाण्याच्या तयारीत असतानाच हा अपघात घडला. यावेळी झालेल्या अपघातात ट्रकमधील दोघांसमवेत कारमधील जखमी असलेल्या दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत.
प्रत्यक्षदर्शी स्थानिक विक्रेत्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, हा ट्रक वेगाने येत असताना त्याची थेट कारला धडक बसली. गाडीमधून उतरण्याच्या तयारीत असलेल्या लोकांना बाजूला होण्यासाठी वेळ देखील मिळाला नाही. ट्रकने चॅपेलला धडक दिलीच मात्र झाडाला अडकल्यामुळे ट्रक दरीत कोसळला नाही. या अपघाताची नोंद कुळे पोलीस स्थानकात करण्यात आली असून पोलीस निरीक्षक राघोबा कामत यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा पंचनामा करण्यात आला.