केरळमधून प्रियकरसोबत पळून गोव्यात आलेल्या महिलेला पकडले

१२ लाखांचे दागिने घेऊन रिक्षाचालकासोबत केले होते पलायन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th April, 12:36 am
केरळमधून प्रियकरसोबत पळून गोव्यात आलेल्या महिलेला पकडले

म्हापसा : केरळमधून प्रियकरासोबत १२ लाखांचे दागिने घेऊन पळून आलेल्या २४ वर्षीय महिलेला संशयितासोबत बागा येथील एका शॅकमध्ये कळंगुट पर्यटक विभाग पोलिसांनी पकडले. नंतर या दोघांना केरळ पोलिसांच्या स्वाधीन केले.

गेल्या दि. १९ एप्रिल रोजी संशयित महिला आपल्या विष्णू ए. या प्रियकरासोबत पळून गोव्यात आली होती. सोबत तिने घरातील १२ लाख रुपये किमतीचे दागिने आणले होते. ते दोघेही बागा येथील एका गेस्ट हाऊसमध्ये उतरले होते. याप्रकरणी केरळ पोलिसांत संशयित महिलेचा पती जग्गन यांनी तक्रार केली होती.

संशयित आरोपी गोव्यात बागा येथे असल्याची केरळ पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी मंगळवारी २२ रोजी सांयकाळी कळंगुट पर्यटक पोलीस युनिटशी संपर्क साधला. युनिटचे पोलीस निरीक्षक जतिन पोतदार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी लागलीच शोधाशोध सुरू केली.

बागा समुद्रकिनारील एका बीच शॅकमध्ये रात्री कळंगुट पर्यटक पोलिसांनी संशयितांना पकडून ताब्यात घेतले. नंतर चौकशीअंती संशयितांना केरळ पोलीस पथकाच्या स्वाधीन केले असता, ते दोघांना घेऊन केरळला रवाना झाले.

पर्यटक पोलीस निरीक्षक जतिन पोतदार यांमया मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीतेश देसाई, कॉन्स्टेबल नंदकुमार सावंत, नागेश पार्सेकर, रजत चोपडेकर, अनुराज पिल्लई, शिवम राठोडकर व सिद्धी नाईक या पथकाने ही कामगिरी केली.

संशयित सराईत गुन्हेगार

संशयित आरोपी विष्णू ए. हा रिक्षाचालक असून संशयित महिला आपल्या मुलीला त्याच्या रिक्षेतून शाळेत पोचवायची. त्यावेळी त्यांच्यात मैत्री निर्माण झाली व ती घरातील दागिने घेऊन संशयितासमवेत पळून गोव्यात आली होती. संशयित विष्णू ए. हा केरळमधील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पोलिसांत अनेक गुन्हे नोंद आहेत. 

हेही वाचा