टॅक्सीचालकांच्या वादात गोव्याची बदनामी

दक्षिण गोवा

Story: अंतरंग |
24th April, 12:25 am
टॅक्सीचालकांच्या वादात गोव्याची बदनामी

राज्यातील किनारी भागात बाहेरील टॅक्सीचालकांकडून हॉटेल्सबाहेर येऊन भाडे घेऊन जाण्याचे प्रकार होत आहेत. स्थानिक टॅक्सीचालकांचे पोट हे याच व्यवसायावर असल्याने अ‍ॅपद्वारे बुकिंग केलेल्या गाड्या येऊन त्यांचा व्यवसाय नेत असल्याने ते आक्रमक होतात. यातून वाद घडतात, गुन्हे नोंद होतात. यामुळे पर्यटकांकडून गोव्याला दोष दिला जातो. हे थांबण्यासाठी राज्य सरकारने वादावर गांभीर्याने विचार करत तोडगा काढण्याची गरज आहे.

 गोवा हे पर्यटन राज्य असून देशी पर्यटकांसह विदेशी पर्यटकांचीही रेलचेल मोठी असते. पर्यटक येतात, किनारी भागात फिरतात. मंदिरे, नद्या, डोंगरदर्‍या, धबधबे व येथील हॉटेलमधील पाहुणचाराचाही आस्वाद घेतात. मात्र, हे सगळे झाल्यानंतरही टॅक्सीचालकांच्या वादात पर्यटक भरडले गेले तर त्यांचा राग अनावर होतो. यानंतर ते सरकारच्या भूमिकेसह सुरक्षितता व आदरतिथ्याच्या मुद्द्याबाबतही बोलतात, यामुळे गोव्याची बदनामी होत असते. हे सर्व थांबण्याची गरज आहे. काहीजणांकडून हा प्रश्न भडकावण्याचा प्रयत्न होत आहे का, याचीही चौकशी व्हावी. 

राज्य सरकारने योग्य उपाय करत हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे. दक्षिण गोव्यातील स्थानिक टॅक्सीचालकांनी हा प्रश्न सोडवण्याची मागणी सरकारकडे केलेली आहे. सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 

अ‍ॅपबेस टॅक्सीचालकांकडून कोणत्याही गाडीला कुठूनही भाडे मारण्याची परवानगी परवान्याद्वारे दिल्याचे सांगण्यात येते. यामुळे स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांचा व्यवसाय ते हिरावून घेत आहेत.

किनारी भागातील हॉटेल्सचा फायदा हा त्या त्या गावातील लोकांना होण्याची गरज आहे.

पर्यटकांना त्रास होऊ नये, अशी आमची भूमिका असल्याने राज्य सरकारनेही यावर योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी विरोधी व सत्ताधारी पक्षांनी एकत्रित येण्याची गरज आहे. पोलिसांनी दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक घेत हा प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे मत स्थानिक टॅक्सीचालक मांडतात. किनारी भागातील हॉटेल्सना गावातील लोकांनी जमिनी दिलेल्या आहेत, याची जाणीव ठेवत हॉटेल्स व्यवस्थापनांनीही स्टँडवरील टॅक्सीचालकांकडून गाड्या घेत पर्यटकांना उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यांनी स्टँडवरील गाड्यांऐवजी बाहेरील गाड्यांची नेमणूक लग्न समारंभ, कॉन्फरन्स व इतर कार्यक्रमांसाठी करू नये, अशी मागणीही स्थानिक टॅक्सीचालकांची आहे. मात्र, ठोस उपाययोजना झालेल्या नसल्याने अ‍ॅपवरून बुकिंग केल्यानंतर हॉटेलमध्ये पर्यटकांना आणण्यासाठी गेलेल्या टॅक्सीचालकांसह पर्यटकांनाही धमकावण्याचे प्रकार वाढत आहेत. यातून स्थानिकांवर गुन्हे नोंद होत असल्याने वादाला मोठे स्वरूप येते. सरकारने गोव्याची बदनामी रोखण्यासाठी, पर्यटकांना सुरक्षितता मिळण्यासाठी, टॅक्सीचालकांतील वाद मिटवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकायला हवे.

अजय लाड