समाजातील वाढत्या अस्वस्थेतेमुळे हत्या, आत्महत्या

ज्यांनी जीवनात समतोल साधायचा, तशी शिकवण इतरांना द्यायची अशा व्यक्ती स्वतःच निराशेच्या गर्तेत बुडून जातात, हे अनाकलनीय आहे. अखेर मनःशांतीचा, संयमाचा, विवेकाचा मार्ग केवळ अध्यात्मातच आहे, असे आधुनिक युगातही म्हणणे अपरिहार्य ठरले आहे.

Story: विचारचक्र |
24th April, 12:21 am
समाजातील वाढत्या अस्वस्थेतेमुळे हत्या, आत्महत्या

मतलबी जगात कोणी कोणाचे नसते

लाख निभावा नाते पण कोणी आपले नसते

गैरसमज असतो काही दिवसांचा...

पण मग मात्र अश्रूंशिवाय काही नसते

या कोणा अज्ञात कवीच्या वस्तुस्थिती सांगणाऱ्या ओळी आठवायचे कारण सध्या घडत असलेल्या काही घटना, ज्यामध्ये मानवतेची, संवेदनशीलतेचीच हत्या केली जात आहे. गोवाच नव्हे तर अन्य भागांतील भौतिक विकास ज्या वेगाने सुरू आहे, महामार्ग, इमारती उभ्या राहात आहेत, त्याच वेगाने माणसे नैतिक अधोगतीकडे वाटचाल करीत आहेत. गुन्हे रोखण्यासाठी नवनव्या सहिंता लागू केल्या जात असतानाच, माणुसकी शून्य प्रकारांनी होत असलेली मानवाची घसरण कायद्यावर मात करण्याची स्पर्धा तर करीत नाही ना, असा प्रश्न पडतो. गोव्यातील सत्तरी तालुक्यातील श्रवण बर्वेचे आकस्मिक निधन हा नैसर्गिक मृत्यू नव्हे, तर त्याचा खून कोणीतरी केला अशी बातमी वाचल्यावर संशयित एखादा मित्र असेल असे प्रथमदर्शनी वाटले. आपसातील मतभेद मिटविण्यासाठी प्रत्यक्ष त्याच माणसाला मिटविण्याचा, नामशेष करण्याचा विडा कोणा मित्राने उचलावा आणि नियोजनपूर्वक त्याचा काटा काढावा असे काही वेळा घडलेले दिसते. रागाच्या भरात, नशेत एखाद्याचा प्राण घेणे वेगळे आणि ठरवून तसे घडवून आणणे यातला फरक लक्षात घ्यायला हवा. श्रवण याच्या मृत्युप्रकरणी त्याचे वडील आणि भाऊ कोठडीत आहेत, तेच प्रमुख संशयित आहेत हे समजून तर समाजमन हादरून गेले. संपत्ती-मालमत्ता याच जगात, याच पृथ्वीवर ठेवून रिक्त हस्ते परतायचे आहे, याची जाणीव भल्याभल्यांना असत नाही आणि मग असे प्रकार घडतात. भ्रष्टाचार करून गडगंज संपत्ती कमावणारे राजकारणी समोर दिसत असतात, त्यांना सर्वजण सर्वज्ञानी समजतात, पण तेही अशा संपत्ती संवर्धनात, त्याच्या वाढीत एवढे रममाण होतात की, संपत्तीमुळे या पृथ्वीतलावरील आपले आयुष्य वाढवता येणार नाही, हे ते विसरूनच जातात. पोलीस तपासात श्रवणच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, पण पालकांनीच संशयिताच्या पिंजऱ्यात दिसावे ही खरोखरच अधोगती आहे. नातेसंबंध हा गैरसमज असतो काही दिवसांचा या कवितेच्या ओळी निराशेतून कागदावर उतरल्या असतील असे वाटत असतानाच, त्यामागील वेदनादायक सत्य समोर येते.

कर्नाटकमधील निवृत्त पोलीस महासंचालकांची त्यांच्याच कुटुंबियांनी केलेली हत्या अशाच प्रकारात मोडते. ६८ वर्षांचे ओम प्रकाश हे मृतावस्थेत घरात सापडले. त्यांच्या शरीरावर तब्बल १२ वार केलेले होते. मुलाने खुनाची तक्रार नोंदविली. हा पोलीस अधिकारी नेहमी आपला छळ करायचा, भांडणे उकरून काढायचा म्हणून त्याचा काटा काढला असे त्यांच्या खुद्द पत्नीने सांगावे हे तर धक्कादायक. आपणास व मुलीस बंदुकीचा धाक दाखवायचा आणि अप्रत्यक्ष दहशत निर्माण करायचा, असा त्यांचा दावा आहे. ते जेवणास बसले असताना, पुन्हा असेच धमकावयाला लागले म्हणून त्याच्या डोळ्यांत, तोंडावर मिरचीपूड टाकून नंतर त्यांचा वार करून खून केला असे पल्लवी नामक या महिलेने म्हणावे ही तर परिसीमाच झाली. याकामी तिला मुलीची मदत झाली, असेही ती म्हणते. कायद्याच्या या राज्यात एका पोलीस अधिकाऱ्याचे हे आक्षेपार्ह वर्तन आणि ते रोखण्यासाठी पत्नीने दाखवलेले क्रौर्य याचे स्पष्टीकरण कोणता राज्यकर्ता, मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशक करू शकेल? संवेदनशीलतेचा, नातेसंबंधाचा असा कडेलोट झालेला पाहून, त्याबद्दल वाचून सामान्य नागरिकांनी काय प्रतिक्रिया द्यायची यापेक्षा या घटनेचा परिणाम त्यांच्यावर काय होऊ शकतो याचा विचार समाजपुरुषाने करण्याची ही वेळ आहे. ते कुटुंब जे करू शकले, ते आपणही करू शकतो, त्या मार्गाने जाऊ शकतो, असा काटा काढू शकतो, असा विचार जर कोणा नागरिकाच्या मनात आला तर त्यात नवल ते काय?

कर्नाटकमधील आणखी एका घटनेने सामान्य माणसांमध्ये अस्वस्थता निर्माण केली आहे, सामान्य नागरिकांच्या संवेदनशीलतेला धक्का दिला आहे. गदग जिल्ह्यातील बेटगिरी येथील महिलेने घरच्या  मंडळीने केलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. पूजा आणि अमरेश यांच्या विवाहाला वर्षही पूर्ण झाले नसताना, नवविवाहित पूजाला मृत्यूला कवटळावे लागणे अनपेक्षितच. सासू व दीर यांनी तिच्या रंगावरून तिचा छळ केला, अशी माहिती उघड होत आहे. तिचा काळासावळा रंग असणे यात तिची काय चूक असावी?

मात्र छळ सहन न झाल्याने, सतत टोमणे ऐकावे लागल्याने पूजाने आपले जीवन संपवले. यात नवऱ्याची काय भूमिका, तो तिला का आधार देऊ शकला नाही, घरच्यांची समजूत का काढू शकला नाही की तोही त्याच मताचा होता, असे प्रश्न निर्माण होतात. पुन्हा एकदा आपल्याला दुखावणाऱ्यांपैकी काही जण आपल्या जीवनातील सर्वांत जवळचे असतात आणि हीच गोष्ट सर्वांत वेदनादायक असते, याचा प्रत्यय येतो.

सोलापुरातील नामवंत मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून केलेली आत्महत्या तर सबंध महाराष्ट्राला हादरा देणारी ठरली आहे. त्यांच्या सहाय्यक महिलेने केलेले आर्थिक गैरव्यवहार बाहेर कळू नयेत यासाठी ती डॉक्टरांवर सतत दबाव टाकत होती, अशी माहिती उघड झाली आहे. ७० वर्षीय या तज्ज्ञ डॉक्टरांना मानसिक तणाव सहन न होऊन आत्महत्येचा मार्ग अनुसरावा लागला, हे तर फारच चिंताजनक आहे. ज्यांनी जीवनात समतोल साधायचा, तशी शिकवण इतरांना द्यायची अशा व्यक्ती स्वतःच निराशेच्या गर्तेत बुडून जातात, हे अनाकलनीय आहे. अखेर मनःशांतीचा, संयमाचा आणि विवेकाचा मार्ग केवळ अध्यात्मातच आहे, असे आजच्या आधुनिक युगातही म्हणणे अपरिहार्य ठरले आहे. जगात अनेक चांगल्या घटना घडतात, त्या सुखद असतात पण दुःखद प्रकारच मानवी मनात अस्वस्थता आणि चलबिचलता निर्माण करतात, यात शंका नाही.


गंगाराम केशव म्हांबरे, (लेखक पत्रकार असून विविध विषयांवर लेखन करतात) मो. ८३९०९१७०४४