वन्यजीव संरक्षणात कॅमेरा ट्रॅप

वन्यजीवांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी कॅमेरा ट्रॅप तंत्रज्ञानचा कल्पक आणि नियोजनबद्ध उपयोग महत्त्वाचा आहे. गोव्यासारख्या राज्यात कॅमेरा ट्रॅप वापरण्यास वन अधिकाऱ्यांना मुभा गोवा सरकारने देण्याची गरज आहे.

Story: विचारचक्र |
22nd April, 10:32 pm
वन्यजीव संरक्षणात कॅमेरा ट्रॅप

आज भारतभर वन्यजीवांच्या शिकारीचे प्रमाण वाढत चालले आहे. जंगली श्वापदांचे मांस, रक्त, चामडे, दात, नखे आदींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव असल्याकारणाने त्यांची शिकार करण्यात गुंतलेल्या टोळ्या व्यापक प्रमाणावर कार्यरत आहेत. स्थानिक जंगलनिवासी लोकांची दिशाभूल करून हे संघटितपणे वावरणारे शिकारी जंगली श्वापदांची बंदुकीच्या गोळीद्वारे, विषप्रयोग करून अथवा फास किंवा सापळे लावून, बॉम्बस्फोट घडवून हत्या करत आहेत आणि मागणी असलेले त्यांचे अवयव पुरवित आहेत. वन्यजीवांची शिकार आणि त्यांच्या अवयवांची विक्री रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर भारत सरकारची तर आंतरराष्ट्रीय स्तरावर संघटना कार्यरत आहे, परंतु आपल्याकडे असलेल्या एकंदर व्यवस्थेचा गैरफायदा उठवत वन्यजीवांची हत्या करणारे गुन्हेगार त्यांच्या अस्तित्वावर घाला घालण्यास सिद्ध झाले आहेत.

पश्चिम घाटात वसलेला - गोवा जसा सागरकिनाऱ्यांच्या प्रेक्षणीय सौंदर्यासाठी ख्यात आहे तसाच तो हिरवाईत समृद्ध असलेल्या जंगल आणि त्यात वावरणाऱ्या वन्यजीवांसाठी ख्यात आहे. पट्टेरी वाघ ही गोव्यातल्या जंगलांची शान होती. २००२ सालच्या वन्यजीव गणनेत गोव्यातल्या जंगलात पाच वाघांचे अस्तित्व होते परंतु त्यानंतर मात्र वनखात्याने गोव्यात वाघच नसल्याचा वारंवार रेटा लावला परंतु त्यानंतर सत्तरी आणि परिसरात वाघांच्या हत्येची प्रकरणे चर्चेत आल्याने आणि त्या संदर्भात व्याघ्रहत्येचे पुरावे प्रकाशात आल्याने वाघाचे अस्तित्व इथल्या वनखात्याला मान्य करण्याची पाळी आली. वन परिक्षेत्राधिकारी परेश परोब आणि प्रकाश सालेलकर यांनी परिस्थितीजन्य पुरावे आणि क्षेत्रीय अभ्यासाद्वारे म्हादईच्या सत्तरीतल्या अभयारण्यात कॅमेरा ट्रॅप तंत्रज्ञानाचा नियोजनबद्ध वापर केल्याने पाच वाघांचा संचार आणि वास्तव्य चर्चेत आले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्राणीशास्त्रज्ञ डॉ. उल्हास कारंथ आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या वन्यजीव अभ्यासक आणि संशोधकांनी कॅमेरा ट्रॅप तंत्रज्ञानाचा सुयोग्य पद्धतीने वापर करून भारतातल्या विविध जंगलातल्या वाघांच्या वास्तव्याला प्रकाशात आणलेले आहे. गेल्या दिड दशकात भारतभर कार्यरत असलेल्या शिकाऱ्यांनी ४०० च्यावर वाघांची हत्या केल्याची प्रकरणे उघडकीस आलेली आहेत. व्याघ्रहत्येत गुंतलेल्या सुमारे हजारजणांना अटक करून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. वन्यजीव गुन्हा नियंत्रण मंडळातर्फे आज देशभर वाढत चाललेल्या वन्यजीवांच्या शिकारीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी जरी प्रयत्न चालू असले तरी कायद्यातील पळवाटांचा गैरफायदा घेत गुन्हेगारीचे प्रस्थ वाढत चालले आहे. वन्यजीवांची चालू असलेली शिकार नियंत्रित व्हावी, त्यात गुंतलेले गुन्हेगार गजाआड व्हावेत यासाठी काही कर्तव्यदक्ष अधिकारी वनखात्यात कार्यरत असले तरी त्यांना समाजाचे तसेच सरकारचे बऱ्याचदा पाठबळ मिळत नाही आणि त्यामुळे वन्यजीव क्षेत्रातील संघटित गुन्हेगारी वाढीस लागली आहे. वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन विश्वसनीयरित्या व्हावे यासाठी जगातील बरेच देश कॅमेरा ट्रॅप या आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी दिलेल्या माध्यमाचा प्रभावीपणे उपयोग करत आहेत. भारतीय वन विभागाने कॅमेरा ट्रॅप तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखून त्याचा वापर करण्याला प्राधान्य दिले आहे.

२०१४ आणि त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने व्याघ्र गणनेसाठी साडेतीन लाखपेक्षा चौरस किलोमीटरच्या राज्यांत पसरलेल्या जंगल प्रदेशात कॅमेरा ट्रॅप तंत्रज्ञानाद्वारे सर्वेक्षण आणि आवश्यक माहितीचे संकलन करण्यात प्रभावीरित्या उपयोग केला होता. वाघांचे मलमूत्र विसर्जन, त्यांनी वृक्षांच्या बुंध्यावर केलेल्या खरचटण्याच्या खाणाखुणा, पाणथळ जागेवरती उमटलेल्या पाऊलखुणा आदींद्वारे वाघांच्या संचाराबाबत त्याचप्रमाणे अन्य वन्यजीवांच्या हालचालींचा अभ्यास करूनच सर्वसाधारणपणे सुमारे ४५ सेंटीमीटरवरती इन्फ्रारेट किरणाचे उत्सर्जन करणारे कॅमेरे झाडांच्या बुंध्यावर किंवा लाकडी खांबावर कॅमेरा ट्रॅप लावून वाघाबरोबर अन्य बिबटे, तरस, कोल्हे, अस्वले, रानमांजर आदी वन्यजीवांच्या हालचाली टिपल्या जातात आणि त्या माहितीच्या आधारे अशा वन्यजीवांचा अभ्यास आणि संशोधन केले जाते. पट्टेरी वाघांबरोबर एखाद्या संरक्षित जंगलात किंवा अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानासारख्या नैसर्गिक अधिवासात वन्यजीवांच्या स्थितीबाबत या तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे उपयोग करून त्यावर उपाययोजना आखण्यात येते. गोव्यातल्या सत्तरी तालुक्यात असलेल्या म्हादई अभयारण्यात बेकायदेशीररित्या घुसून जंगली श्वापदांची शिकार करण्यात गुंतलेल्या व्यावसायिक शिकाऱ्यांचे फोटो टिपण्यात कॅमेरा ट्रॅप तंत्रज्ञानाचा वापर केला आणि तो प्रयत्न सफल झाल्याचे कळताच दुसऱ्यावेळी शिकाऱ्यांनी त्याठिकाणी बसविलेल्या कॅमेऱ्याचा शोध घेऊन त्यातले बरेच कॅमेरे तेथून उडवून लावण्यात यश मिळविले होते. वन्यजीवांच्या हालचाली त्याचप्रमाणे बेकायदेशीररित्या घुसखोरी करणाऱ्या शिकाऱ्यांना रोखण्यासाठी लावलेल्या कॅमेऱ्यांच्या चोरांचा शोध घेणे ना वनखात्याला ना पोलीस यंत्रणेला शक्य झाले. त्यामुळे अशा गुन्हेगारीत गुंतलेल्या जंगली श्वापदांची शिकार करणाऱ्यांचे मनोधैर्य वृद्धिंगत झाले आहे. सत्तरीत वन्यजीवांची शिकार करण्यात गुंतलेल्या हल्लीच्या दिवसांत दोघांना मरण आलेले आहे, यावरून शिकारीचे प्रस्थ वाढत चालले असल्याचे दिसून येत आहे.

देशभरात वनखात्याने काही ठिकाणी आपल्या प्रामाणिक आणि निर्भिड अधिकाऱ्यांच्या साहाय्याने तर काही पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मदतीने कॅमेरा ट्रॅप तंत्रज्ञानाद्वारे वन्यजीवांची शिकार करणाऱ्या गुन्हेगारांना रोखण्यात आणि त्यांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवण्यात यश आले आहे. देशातल्या विविध राज्यातल्या दीडशेवर राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये येथे वन्यजीवांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी वावरणाऱ्या वन्यजीव संवर्धन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अनिश अंधेरा यांनी कित्येक वर्षे कॅमेरा टॅप तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीरित्या वन्यजीवांच्या हालचाली, स्वभावधर्म, नैसर्गिक अधिवास यांचा अभ्यास आणि संशोधनासाठी केलेला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे देशभरातल्या वन्यजीवांचे संवर्धन आणि संरक्षण त्याचप्रमाणे त्यांच्या नैसर्गिक अधिवासावर देखरेख ठेवण्यात कॅमेरा ट्रॅप तंत्रज्ञान यशस्वीपणे वापरणे शक्य आहे आणि त्यासाठी त्याचा कल्पक आणि नियोजनबद्ध उपयोग महत्त्वाचा आहे. गोव्यासारख्या राज्यात कॅमेरा ट्रॅप वापरण्यास वन अधिकाऱ्यांना मुभा गोवा सरकारने देण्याची गरज आहे.


प्रा. राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५