विश्वरंग
स्कॉटलंडच्या संसदेत अलीकडेच हिंदूद्वेषाचा मुद्दा चांगलाच गाजला. संसदेत प्रथमच हिंदूफोबिया म्हणजेच हिंदूद्वेषाचा निषेध करणारा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या ऐतिहासिक प्रस्तावाला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला, हे विशेष. एडिनबर्गच्या पूर्वेकडील स्कॉटिश नॅशनल पार्टीच्या सदस्य असलेल्या अॅश रेगन यांनी हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावात स्कॉटलंडमधील हिंदू समुदायाला येत असलेल्या भेदभावाच्या वाढत्या पातळीवर चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज प्रतिपादन करण्यात आली.
या प्रस्तावाला आधार मिळाला तो 'हिंदूफोबिया इन स्कॉटलंड : अंडरस्टँडिंग, अॅड्रेसिंग अँड ओवरकमिंग प्रेज्युडिस' या अहवालामुळे. गांधीयन पीस सोसायटीने हा अहवाल तयार केला आहे. या अहवालात स्कॉटलंडमधील हिंदू लोकांना कोणत्या प्रकारच्या भेदभावांना सामोरे जावे लागते, याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मंदिरांची तोडफोड, सांस्कृतिक ओळख पुसण्याचा प्रयत्न, कामाच्या ठिकाणी होणारा भेदभाव आणि धार्मिक परंपरांना लक्ष्य करून बोलले जाणारे अपशब्द यासारख्या अनेक गंभीर गोष्टींचा उल्लेख या अहवालात आहे. रेगन यांनी संसदेत स्कॉटलंडमधील हिंदू समुदायाच्या भावनांना वाचा फोडली. त्यांनी नमूद केले की, स्कॉटलंडमध्ये हिंदूंची लोकसंख्या जरी कमी असली तरी, त्यांच्याविरुद्ध होणारा कोणताही भेदभाव गंभीर आहे आणि याकडे दुर्लक्ष करता कामा नये. मंदिरांवर होणारे हल्ले केवळ मालमत्तेचे नुकसान नसून ते स्कॉटलंडमधील हिंदूंच्या धार्मिक भावनांवर आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे करतात. काही विशिष्ट घटनांमध्ये मंदिरांना लक्ष्य केले गेले आहे, ज्यामुळे समुदायात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी सरकारला आणि प्रशासनाला या प्रकरणांची गांभीर्याने दखल घेण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
गांधीयन पीस सोसायटीचे ध्रुव कुमार आणि अनुरंजन झा यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, गांधीजींनी आपल्याला शिकवले आहे की अहिंसेमध्ये अज्ञानाचा प्रतिकार करणेही समाविष्ट आहे. हिंदूफोबियाचा मुद्दा उपस्थित करून आपण केवळ हिंदूंच्या बाजूने उभे राहत नाही, तर एकता आणि मानवता यासारख्या मूल्यांनाही बळकट करत आहोत. या प्रस्तावाला विविध राजकीय पक्षांच्या सदस्यांनी पाठिंबा दर्शवला. कॉलिन बीट्टी, स्टिफनी कॅलाघन आणि केविन स्टुअर्ट यासारख्या सदस्यांनी हिंदू समुदायासोबत एकजूट दाखवली. या एकजुटीमुळे धार्मिक नेते आणि सांस्कृतिक राजदूत यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. या प्रस्तावानंतर स्कॉटलंड सरकार हिंदू समुदायाच्या संरक्षणासाठी आणि धार्मिक सलोखा वाढवण्यासाठी काय पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे असेल. मात्र, स्कॉटलंडच्या संसदेने हिंदूद्वेषाच्या विरोधात आवाज उठवून एक महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक संदेश दिला आहे, यात शंका नाही.
सुदेश दळवी