गरिबांचा पोप

पोप फ्रान्सिस यांच्या नम्र वागणुकीमुळे, त्यांनी पारदर्शकता आणि समानतेला दिलेले महत्त्व यामुळे तसेच चर्चच्या पारंपरिक विचारसरणीकडे कुठलीच तडजोड न करता आधुनिक बदलही तेवढ्याच कुशलतेने स्वीकारले आणि हाताळले. म्हणूनच ते महान नेत्यांमध्ये गणले जातात.

Story: संपादकीय |
22nd April, 10:34 pm
गरिबांचा पोप

बाराव्या शतकात ऐश्वर्य संपन्न आयुष्य त्यागून प्रेमभावना, त्याग, करुणा, गरिबांची सेवा या गोष्टींना प्राधान्य देणारे एक महान ख्रिश्चन संत फ्रान्सिस ऑफ अ‍ॅसिसी होऊन गेले. त्यांच्याविषयी ख्रिस्ती धर्मात प्रचंड आदर आहे. ख्रिश्चन धर्मातील महान विचारवंतांपैकी ते एक मानले जातात. बाराव्या शतकात जन्म आणि त्यांचे कार्य बाराव्या तसेच तेराव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात अधिक प्रभावी होत गेले. इटलीत त्यांचा जन्म झाला होता. घरातील श्रीमंती त्यागून त्यांनी धर्मकार्यासाठी आयुष्य वाहून घेतले होते. या संताची महानता हीच पोप फ्रान्सिस यांची प्रेरणा. त्यांनी सेंट फ्रान्सिस यांचे नावे स्वीकारले. पोप फ्रान्सिस यांच्याकडे करुणा, ऐश्वर्य संपन्न, पर्यावरणाप्रती चिंता, सर्वसमावेशकता, न्यायाची मागणी करणाऱ्यांसाठी आवाज उठवण्याचे धैर्य, विनम्रता असे अनेक गुण होते ज्याचा जगाला फायदाच झाला. सेंट फ्रान्सिस यांचे नावच नव्हे तर ते गुणही पोप फ्रान्सिस यांनी स्वीकारले होते त्यामुळेच त्यांच्या निधनाने जग दुःखसागरात बुडाले. बदलत्या आणि स्पर्धेच्या जगात माणुसकी जिवंत रहावी, संवेदनशीलता रहावी, करुणा आणि सहिष्णुता हरवू नये यासाठी सतत आग्रही राहणाऱ्या पोप फ्रान्सिस यांच्या नेतृत्वाने ख्रिश्चन धर्मालाच नव्हे तर जगालाही शांतता आणि करुणेचा धडा दिला.

पोप फ्रान्सिस त्यांचे मूळ नाव जॉर्ज मारिओ बेर्गोग्लियो असे होते. १३ मार्च २०१३ रोजी ते कॅथोलिक चर्चचे २६६ वे पोप बनले. सेंट फ्रान्सिस ऑफ अॅसिसी यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेतलेल्या पोप फ्रान्सिस यांना गोरगरिबांची सेवा आणि त्यांच्यासाठी कार्य करण्याचे सुचले असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही एवढा त्यांच्यावर सेंट फ्रान्सिस यांचा प्रभाव होता. त्यातूनच त्यांनी गरिबांसाठी चर्च या भावनेने कार्य सुरू केले. त्यांची पोपपदी नियुक्ती अनेक अंगांनी विशेष होती. पोप होणारे ते पहिले लॅटिन अमेरिकन धर्मगुरू होते. पोप होताना त्यांनी सेंट फ्रान्सिस यांचे नाव स्वीकारले. पोपपदी असताना बारा वर्षांच्या कार्यकाळात पोप फ्रान्सिस यांनी चर्चच्या पारदर्शक व्यवहारासह, सर्वसमावेशकतेला प्राधान्य दिले. त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी केलेले कार्यही सदोदित आठवणीत राहील असेच आहे. एलजीबीटीक्यू समुदायाला दिलेले समर्थन हे त्यांच्या खुल्या आणि समान न्यायिक वैचारिकतेचे दर्शन घडवते. फक्त आपल्याच धर्माचा डंका वाजवणाऱ्या धर्मगुरूंनी सर्वांसाठी अशा प्रकारची परिवर्तनशील विचारधारा ठेवणे, हेही आता दुर्मिळ झाले आहे. सेंट फ्रान्सिस यांच्या कार्यातून प्रेरणा घेतलेल्या पोप फ्रान्सिस यांनी आपली जीवनशैलीही शक्य तेवढी साधी आणि विनम्र ठेवली. असे म्हणतात की व्हॅटिकनमध्ये पोप फ्रान्सिस यांच्यामुळेच साधेपणा आला. त्यांनी भव्यतेला फाटा देत नम्रतेचा आदर्श निर्माण केला. म्हणूनच ते फक्त कॅथोलिक धर्मगुरू राहिले नाहीत तर ते जगातील इतर जाती धर्मांसाठीही प्रेरणास्रोत राहिले. पोप यांच्या पायाशी सर्व सुखे लोळण घेत असतात. त्यांना कशाची कमी नसते. पण पोप फ्रान्सिस यांनी आपल्या राहणीमानासह वाहन वापरण्यातही साधेपणा ठेवला. लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यापासून ते महिला कैद्यांचे पाय धुण्यापर्यंत अनेक पायंडे घातले. अशा अनेक गोष्टींमुळे 'लोकांचा पोप' म्हणून त्यांची ख्याती कायम राहणार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे भारतात तीन दिवासांचा दुखवटा जाहीर करण्यात आला. माणसातील देवत्व ओळखण्यासाठी ते कायम आग्रही राहिले. एलजीबीटी, शरणार्थी, स्थलांतरित या सर्वांच्या हक्कांसाठी त्यांनी कायम आवाज उठवला त्यामुळेच ते जागतिक स्तरावर कमालीचे प्रसिद्ध झाले. त्यांच्या कार्यामुळेच जगाने त्यांना नेहमी विनम्रतेने पाहिले.  त्यांचे नेतृत्व स्वीकारले.

पोप फ्रान्सिस यांच्या पोपपदाच्या कार्यकाळात 'गरिबांसाठी गरीब चर्च' अशी संकल्पना जन्माला आली. ते म्हणायचे, 'मी गरिबांसाठी एक चर्च इच्छितो जी गरिबांसोबत असेल'. हीच गोष्ट त्यांच्या कार्यकाळाची खरी ओळख होती. त्यांनी केलेले काम जगभरातील सर्वसाधारण कॅथोलिक धर्मियांची मने जिंकणारे होते. त्यांच्या नम्र वागणुकीमुळे, त्यांनी पारदर्शकता आणि समानतेला दिलेले महत्त्व यामुळे तसेच चर्चच्या पारंपरिक विचारसरणीकडे कुठलीच तडजोड न करता आधुनिक बदलही तेवढ्याच कुशलतेने स्वीकारले आणि हाताळले. म्हणूनच ते महान नेत्यांमध्ये गणले जातात. आध्यात्मिकतेचा त्यांचा प्रवास हा त्यांच्या मानवता, दया, करुणा, समावेशकता अशा कृतीतून दिसून आला. निधनानंतरही त्यांचे कार्य सतत स्मरणात राहील असेच आहे.