मरावे परी कीर्तिरुपे उरावे - वाळवे

वाळवे यांनी नवोदित मराठी साहित्यिक घडवण्यासाठी जी कामगिरी बजावली त्याला साहित्य क्षेत्रात तोड नाही. त्यांनी विशेष कष्ट घेऊन घडवलेले अनेक लेखक आज प्रथितयश साहित्यिक बनले आहेत.

Story: विचारचक्र |
06th November, 09:27 pm
मरावे परी कीर्तिरुपे उरावे - वाळवे

शिवछत्रपतींचे अभयपत्र प्राप्त झालेल्या व्हाळशी-डिचोली येथील वाळवे कुटुंबातील शेवटचे पुरुष सदस्य, श्रीमान सुरेश वाळवे, यांच्या निधनास आज तेरा दिवस पूर्ण होत आहेत. कॅन्सरसारख्या असाध्य रोगाशी यशस्वीपणे लढत आणि १२० केमोथेरपीचा मारा सहजपणे पचवत त्यांनी तब्बल १० वर्षे साक्षात यमदेवाला थोपवून धरले होते. पण अखेर शरीराने दगा दिला आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कमरेखालचा संपूर्ण भाग लुळा पडला. जीवन संपूर्णपणे परावलंबी झाल्याने त्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळत गेला. ‘आता मी शेवटच्या घटका मोजत आहे.’ हा त्यांचा व्हॉट्सअॅप संदेश वाचल्यावर मन चर्र झाले. १ ऑक्टोबर रोजी ७६ व्या वाढदिवसाचे निमित्त साधून मी ४-५ मित्रांसह व्हाळशी गाठली. ‘पुष्पगुच्छ नको, फार भावुक बनतील,’ असा वहिनींचा सल्ला शिरसावंद्य मानून आम्ही पहिल्या मजल्यावरील त्यांची बेडरुम गाठली. आम्हाला पाहताच हंबरडा फोडून साहेबांना रडू कोसळले. ‘असे रडणार असाल तर आम्ही थांबणारच नाही,’ अशी तंबी आम्ही दिली तेव्हा कुठे ते सावरले. केवळ जीभ तेवढीच चालते, बाकी सगळे निष्प्राण झाल्याचे पायांकडे नजर टाकत म्हटले. त्यांनतर तास-दीड तास चर्चा झाली. आम्ही निरोप घेत उठलो तेव्हा आम्हाला काही तरी गोड धोड देण्याचा सूचना वजा आदेश वहिनींना दिला. ‘त्यांना देणार ते मला पण आण,’ वहिनींना आणखीन एक सूचना केली. आम्ही चहा घेत असतानाच, मला परत बोलावणे आले. त्यांना रामा काणकोणकर प्रकरण जाणून घ्यायचे होते.

वाळवे साहेब आणि मी तसे समकालीन! आम्ही दोघे एकाच वर्षी या भूतलावर अवतरलो. आमचा जन्मही एकाच महिन्यात, ऑक्टोबर महिन्यात. वाळवे साहेबांना दसऱ्याच्या मुहूर्तावर या पृथ्वीवर अवतीर्ण व्हायचे होते म्हणून त्यांनी थोडी घाई केली आणि १ ऑक्टोबरला जन्म घेतला. मी मात्र आरामशीर म्हणजे वाळवेनंतर ११ दिवसांनी म्हणजे १२ ऑक्टोबर  १९४९ रोजी अवतरलो. १९७५ मध्ये वाळवे नवप्रभात आले आणि पहिल्या भेटीतच आमची मैत्री जमली ती अगदी काल-परवापर्यंत म्हणजे तब्बल ५० वर्षे टिकली. वाळवे तर तब्बल २२ वर्षे माझे संपादक म्हणजे बॉस होते. २००७ मध्ये मी निवृत्त होईपर्यंतच्या ३३ वर्षात एक किरकोळ अपवाद वगळता आमचे कधीच खटके उडाले नाही. खाजने या माझ्या जन्मगावात घडलेल्या शंभू काळे पुजारी प्रकरणात वाळवे साहेबांनी गावातील लोकांची बाजू समजून न घेता खाजने गावातील लोकांना झोडून काढले होते. हा प्रकार असह्य झाल्याने मी तीन महिन्यांची रजा टाकून घरी बसलो होतो. आमचे सरव्यवस्थापक विलासराव सरदेसाई यांनी मध्यस्थी करून आमचे हे भांडण मिटवले होते.

वाळवे साहेब मला केवळ ११ दिवसांनी सिनीयर होते. पण ते संपादक असल्याने माझे बॉस होते. मात्र माझ्यावर त्यांनी कधी बॉसगिरी केली नाही. त्यांना अभिनयाची विशेष आवड होती. त्यासाठी पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यासाठी ते गेले होते. तेथील तथाकथित तज्ज्ञांना वाळवे यांच्यातील अभिनय गुणांचे योग्य असे आकलन झाले नाही व सिनेमातील हिरो बनायची त्यांची संधी हुकली. ही संधी मिळाली असती तर भारतीय चित्रपटसृष्टीला आणखी एक उत्कृष्ट हिरो मिळाला असता. वाळवे साहेबांची आर्थिक परिस्थिती शतपटीने सुधारली असती. व्हाळशीऐवजी साहेबांनी शाहरुख खान किंवा अमिताभ बच्चन यांचे शेजारी बनून डझन-दोन डझन खोल्यांचा, जलतरण तलाव असलेला आलिशान बंगला उभारला असता. मात्र, वाळवे हिरो बनले असते तर गोव्यातील पत्रकारिता क्षेत्र तसेच साहित्यिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली असती. वाळवे यांनी नवोदित मराठी साहित्यिक घडवण्यासाठी जी कामगिरी बजावली त्याला साहित्य क्षेत्रात तोड नाही. त्यांनी विशेष कष्ट घेऊन घडवलेले अनेक लेखक आज प्रथितयश साहित्यिक बनले आहेत. या साहित्यिकांची ७० हून अधिक दर्जेदार पुस्तके प्रकाशित झाली असून, त्यापैकी बहुतेक पुस्तके कृतज्ञतापूर्वक भावनेने वाळवे साहेबांना अर्पण केली आहेत. या सर्व लेखकांनी आपल्या भावना फेसबुकवर अतिशय संवेदनशीलपणे व्यक्त केल्या आहेत. वर्तमानपत्रे, फेसबुक व इतर माध्यमांतून वाळवे साहेबांवर त्यांच्या हितचिंतकांनी जे विपुल लिखाण केले आहे, ते संग्रहित केले तर एक उत्तम पुस्तक निर्माण होईल.

शिव छत्रपतींनी वाळवे घराण्यातील विद्वान ब्रह्म वर्गाची काळजी घेण्याचा आदेश आपल्या भतग्राममधील सरदारांना दिला होता. या अभयपत्राची अस्सल मूळ प्रत वाळवेंच्या पूर्वजांनी आपल्या पेटीत जपून ठेवली होती. या अभयपत्राचे ऐतिहासिक महत्त्व व मूल्य वाळवेंच्या लक्षात येताच, त्यांनी दस्तऐवज योग्य ठिकाणी म्हणजे पुराभिलेख-पुरातत्व खात्याकडे सुपूर्द केला. या दस्तऐवजामुळे मराठे साम्राज्य डिचोलीत पसरले होते, हे निर्विवादपणे सिद्ध झाले आहे. शिवाजी महाराज गोव्यात आलेच नव्हते, असे म्हणणाऱ्या लोकांचे तोंड आपोआप बंद पडले होते.

ऐतिहासिक महत्त्वाचे असे दस्तऐवज सरकार दरबारी स्वखुशीने पोचते करणारे वाळवे घराणेच आज जगाच्या पटलावरून लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, याची चाहूल सुरेश वाळवे यांना लागली तेव्हा बराच उशीर झाला होता. शिव छत्रपतींनी अभयपत्र दिल्यास आज सुमारे ४०० वर्षे उलटली. सुरेश व दीपक वाळवे हे दोघे बंधू होते. काकांना मूल नसल्याने त्यांनी सुरेश यांना दत्तक घेतले होते. काही वर्षांपूर्वी दीपकचा अपघाती मृत्यू झाला. या दोघाही बंधूंना एकेक मुलगी! सुरेश वाळवे हे वाळवे घरण्यातील एकमेव पुरुष होते. आपल्या मृत्यूनंतर वाळवे आडनाव धारण करणारा कोणी मानव गोव्यात नाही, ही गोष्ट लक्षात येताच त्यांच्या मनाला एका अनामिक भीतीने ग्रासले. गोव्यात नसले म्हणून काय झाले, महाराष्ट्रात वाळवे आडनाव असलेले शेकडो ब्राह्मण असणार, असा विचार करून त्यांनी चौकशी चालू केली. वाळवेंच्या मामांचे घर सावंतवाडीत, तेथे चौकशी केली. काहीच थांगपत्ता न लागल्याने अखेर वाळवे बंधूंचे अखिल भारतीय स्नेहसंमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील अनेक वर्तमानपत्रांतून बातमी छापून आणली, पण प्रत्यक्षात प्रतिसाद शून्य. त्यामुळे गोवा व महाराष्ट्रात वाळवे आडनाव असलेले कोणी नाही, याची त्यांना खात्री पटली. ‘मरावे परी कीर्तिरुपे उरावे,’ हा वाक्यप्रचार त्यांना आठवला. आज ना उद्या वाळवे हे आडनाव या विश्वातून लुप्त होणारच, असे गृहीत धरून डिचोली तालुक्यापुरते तरी वाळवे हे नाव कायमस्वरूपी लोकांच्या लक्षात राहावे म्हणून डिचोली वाचनालयच्या एका खोलीला ‘वाळवे वाचन कक्ष’ असे नाव दिले. वाळवे यांच्या घराजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या साखळी बायपासला ‘वाळवे सर्कल’ असे नामकरण करावे, या प्रस्तावाला गोवा सरकारने मान्यता दिली होती. केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते या सर्कलचे उद्घाटन होणार होते, त्याच दिवशी संघाच्या एका बड्या नेत्याचे निधन झाल्याने राज्यपाल आर्लेकर डिचोलीत असताना अडथळे निर्माण केले. आता ‘पेन सर्कल’ असे नवे नामकरण झाले आहे. त्याऐवजी ‘वाळवे सर्कल’ नामकरण करून वाळवे नाव कायम ठेवण्यासाठी पालिका विचार करेल?


- गुरुदास सावळ

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)