गोवा सरकारचे ‘रासुका’ अस्त्र

अपेक्षा आहे की ‘रासुका’खाली पुढील काही दिवसांत अनेकजणांवर कारवाई होईल. सरकारने काही लोकांना आवर घालण्यासाठीच ‘रासुका’ लागू केला आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत काहीजणांना ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.

Story: संपादकीय |
06th November, 09:29 pm
गोवा सरकारचे ‘रासुका’ अस्त्र

गेल्या काही महिन्यांत गोव्यात अनेक गंभीर गुन्हे घडले. सध्या कोलवाळ तुरुंगात गुंडांच्या तीन-चार टोळ्या हवा खात आहेत. पोलिसांनीही प्रकरणे गांभीर्याने घेतल्यामुळे आरोपींनी जामिनासाठी केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. मुंगूल येथे टोळीयुद्धातून घडलेली घटना असो, किंवा सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेला हल्ला असो, या घटनांनी पोलीस यंत्रणेची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे सध्या पोलिसांनी अशा काही गुंडांना तडीपार करण्याचे किंवा राष्ट्रीय सुरक्षा कायदा - एनएसए लावून प्रतिबंधात्मक ताब्यात ठेवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. देशाचाच विचार करायचा झाला तर राष्ट्रीय सुरक्षेचे गंभीर प्रश्न निर्माण होतात, त्यावेळी ‘रासुका’सारखा कायदा लावला जातो. गोव्यातील सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या गुंडांचा बिमोड करण्याचा प्रयत्न म्हणून आता तो गोव्यात लागू झाला आहे. काणकोणकर यांच्यावरील हल्ल्यानंतर लोकांकडून गोव्यात ‘रासुका’ लावण्याची मागणीही होत होती. रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याने सरकारही टीकेचे लक्ष्य झाले. विरोधकांनी आणि जनसामान्यांमधूनही अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. आजही रामा काणकोणकर त्या हल्ल्यातून सावरलेले नाहीत. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये हवे असलेल्या गुंडांनी त्यांच्यावर दिवसाढवळ्या हल्ला केला. त्यानंतर जनभावनेचा उद्रेक झाल्यामुळे लगेच सरकारने ‘रासुका’ लावण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता. अखेर त्याला मंजुरी देऊन तो अंमलात आणला आणि त्यासाठी लागणारे सल्लागार मंडळही स्थापन केले. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती उत्कर्ष बाक्रे सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आहेत. माजी जिल्हा न्यायाधीश सायोनारा टेलीस आणि माजी न्यायाधीश वंदना तेंडुलकर या मंडळाच्या सदस्य आहेत. दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या जिल्ह्यातील, समाजास घातक असलेल्या व्यक्तींवर ‘रासुका’खाली कारवाई करण्यासाठी विशेष अधिकार दिलेले आहेत. कारवाईनंतर अटकेबाबत निर्णय घेण्याचे काम सल्लागार मंडळ पाहील. गोव्यात माजलेल्या गुंडांचा उपद्रव नियंत्रित ठेवण्यासाठीच सरकारने ‘रासुका’ विचारात घेतला आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यांत अनेक गुंडांना पोलीस धडा शिकवण्याची शक्यता आहे.

सराईत गुंड जेनिटो कार्दोज याच्यासह त्याच्या टोळीतील अनेकांना पणजी पोलिसांनी अटक केल्यानंतर ते तुरुंगात आहेत. मुंगूल येथील टोळीयुद्धात आतापर्यंत अनेक गुंडांना अटक करून तुरुंगात टाकले आहे. वारंवार उपद्रव करणारे काही गुंड सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत, त्यामुळे ‘रासुका’ लागू केल्यामुळे पुढील काही दिवस तरी शांतता राहू शकते. पण दुसऱ्या बाजूने अपघात, खून या घटनांनी गोव्याला पुन्हा पुन्हा हादरे बसत आहेत. राज्यात सुरक्षा व्यवस्था चिंतेची बाब बनलेली असताना सरकारने ‘रासुका’ही त्याच वेळी लागू करणे हा योगायोग आहे. ‘रासुका’च्या आधारे गोव्यातील गुंडगिरी नामशेष करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. प्रत्येक गोमंतकीय स्वतःला सुरक्षित समजू शकेल, अशी कायदा सुव्यवस्था देणे ही सरकारची जबाबदारी आहे. 

अपेक्षा आहे की ‘रासुका’खाली पुढील काही दिवसांत अनेकजणांवर कारवाई होईल. सरकारने काही लोकांना आवर घालण्यासाठीच ‘रासुका’ लागू केला आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत काहीजणांना ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तरच ‘रासुका’ लागू करण्याला अर्थ राहणार आहे. काही जणांना तडीपारही करावे लागेल. काहींना तुरुंगात डांबावे लागेल. भाजपच्या सुशासनाच्या राज्यात गुंडांना थारा नाही, हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे काही महत्त्वाच्या कारवाया पुढील काही काळात होतील, अशी अपेक्षा आहे. ‘रासुका’खाली अटक केल्यानंतर बारा आठवडे म्हणजेच तीन महिने एखाद्या व्यक्तीला अटकेत ठेवता येते. त्याहीपेक्षा जास्त काळ ठेवायचे असल्यास केंद्राकडून परवानगी घ्यावी लागेल. गुंडांची गुर्मी उतरवायची असेल तर दीर्घकाळ ‘रासुका’ ठेवणेच योग्य होणार आहे. यापूर्वीही गोव्यात ‘रासुका’ लागू करण्यात आला होता. त्यानंतर २०२१ मध्येही दक्षिण गोव्यात तीन महिन्यांच्या कालावधीसाठी ‘रासुका’ लावला होता. पण त्यावेळी कारवाया फार झाल्या नव्हत्या. राज्यात कायदा सुव्यवस्था सुरळीत रहावी, गुन्हे घडू नयेत म्हणून ‘रासुका’खाली अटक केली जाते. गोव्यात गेल्या काही दिवसांत गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडले आहेत. ऑगस्ट महिन्यात मुंगूल येथे टोळी युद्धात दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर वीसहून अधिक संशयितांना अटक करण्यात आली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये करंजाळे येथे रामा काणकोणकर यांच्यावर हल्ला झाला. त्या प्रकरणात जेनिटोसह सात जणांना अटक झाली. हे गुंड पुढील काही काळ तुरुंगात राहतील, यासाठी पोलीस आणि प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत.