
विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान काल, गुरुवारी पार पडले. मतदानाच्या तोंडावरच प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाचे उमेदवार संजय सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे मुंगेरमध्ये भाजपची बाजू बळकट झाली आहे. विशेष म्हणजे जन सुराज पक्षाच्या चार उमेदवारांनी अचानक निवडणुकीत माघार घेतली आहे.
विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्याचे मतदान ११ रोजी होणार आहे. निकाल १४ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. सध्या राज्यात भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) सरकार आहे. सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीने आक्रमक प्रचार सुरू केला आहे. प्रशांत किशोर यांचा जन सुराज पक्ष सर्व २४३ मतदारसंघांत रिंगणात आहे. त्यामुळे यंदा तिरंगी लढत आहे.
मुंगेर मतदारसंघातील ‘जन सुराज’चे उमेदवार संजय सिंह यांनी निवडणुकीतून माघार घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि रालोआच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. काही दिवसांपासून संजय सिंह भाजपच्या संपर्कात होते, मात्र त्यांच्या हालचालींची कुणालाच कुणकुण लागली नाही. संजय सिंह यांच्या माघारीनंतर मुंगेरमध्ये रालोआ विरुद्ध महाआघाडी असा थेट सामना रंगणार आहे. मतदारसंघात संजय सिंह लोकप्रिय असल्याने रालोआला निर्णायक आघाडी मिळू शकेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
संजय सिंह यांच्यापूर्वी ‘जन सुराज’च्या तीन उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. दानापूरचे उमेदवार अखिलेश कुमार यांनी नामांकन अर्ज वेळेत न भरल्यामुळे त्यांना निवडणुकीतून बाद करण्यात आले. गोपालगंजमधून शशी शेखर सिन्हा आणि ब्रह्मपूरमधून डॉ. सत्य प्रकाश तिवारी यांनी पक्षाला विश्वासात न घेता ऐनवेळी नामांकन अर्ज मागे घेतले.
प्रशांत किशोर यांनी उमेदवारांच्या माघारीमागे भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. भाजपकडून ‘जन सुराज’च्या उमेदवारांना धमकावले जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांनी दानापूरचा दाखला देत एक फोटोही दाखवला होता. आमचे उमेदवार अखिलेश शाह नामांकन अर्ज भरण्यासाठी निवडणूक कार्यालयापर्यंत पोहोचू शकले नाहीत. राजदच्या गुंडांनी त्यांचे अपहरण केल्याचे सांगण्यात आले; परंतु त्यांचे अपहरण झाले नसून अर्ज भरण्याच्या दिवशी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर होते. गृहमंत्र्यांनी सत्तेचा गैरवापर करून त्यांना आपल्याबरोबर बसवून ठेवले, असा आरोप प्रशांत किशोर यांनी केला होता.
राज्यात एकूण मतदारांची संख्या ७.४२ कोटी इतकी आहे. २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत रालोआने सर्वाधिक जागा जिंकून सत्तास्थापन केली होती, त्यावेळी महाआघाडीनेही कडवी झुंज दिली होती. यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याचीच उत्सुकता आहे.
- प्रदीप जोशी