पर्याय एकच... ‘नसबंदी’

फोंड्यातील अनाबिया शेख या मुलीच्या मृत्यूमुळे भटक्या कुत्र्यांचा विषय चव्हाट्यावर आलेला आहे. परंतु, याबाबत एकाही लोकप्रतिनिधीकडून आवाज उठलेला दिसून आलेला नाही. याचाच अर्थ, पंचापासून ते मंत्र्यांपर्यंतचे लोकप्रतिनिधी स्वत: अशा कुत्र्यांच्या हल्ल्यात सापडल्यानंतरच या गंभीर प्रश्नाबाबत तोंड उघडणार का, असा सवाल राज्यभरातील जनतेकडून विचारला जात आहे.

Story: वर्तमान |
20th April, 02:57 am
पर्याय  एकच... ‘नसबंदी’

फोंडा तालुक्यातील बोणबाग-दुर्गाभाटमध्ये शुक्रवारी सकाळी दीड वर्षीय अनाबिया शेख या मुलीचा भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. मामाच्या घरी आलेली अनाबिया खेळता खेळता घराबाहेर गेली आणि भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तिच्यावर हल्लाबोल चढवत तिच्या शरीराचे चावे घेतले. त्यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेने राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. परंतु, या घटनेमुळे राज्याला गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात भेडसावत असलेल्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून, त्यांच्याकडून नागरिकांवर हल्ले करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशा स्थितीत भटक्या कुत्र्यांना आवरायचे कसे, हा मोठा प्रश्न राज्य सरकारसमोर उभा राहिला आहे.

राज्यात भटक्या कुत्र्यांची संख्या ५७ हजारपेक्षा अधिक असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्याने गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील भटक्या आणि पाळीव कुत्र्यांची गणना सुरू केलेली आहे. सुरुवातीला ही गणना पूर्ण करण्यासाठी ३० मार्च २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर त्यात १५ दिवसांची वाढ करण्यात आली. पण, अजूनही गणनेचे पाच ते दहा टक्के काम शिल्लक राहिलेले आहे. केंद्र सरकारने गोव्याला अजून मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे गणनेची प्रक्रिया प्रलंबित राहिलेली आहे. खात्याकडून ही गणना पूर्ण झाल्यानंतरच राज्यातील कुत्र्यांची संख्या निश्चित होणार आहे. राज्यातील काही नागरिकांनी घरात रॉटवेलर, पीटबुल आदी हिंस्र जातींची कुत्री पाळलेली आहेत. अशा कुत्र्यांकडून झालेल्या हल्ल्यांत काही बालकांचा मृत्यू झाल्याच्याही घटना गेल्या काही वर्षांत समोर आल्या. कुत्र्यांच्या गणनेनंतर अशा जातींच्या कुत्र्यांचा आकडा समोर येईल. त्यानंतर त्यांच्यावर आळा घालण्यासाठी अशी कुत्री पाळणाऱ्या मालकांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. पण, भटक्या कुत्र्यांबाबत सरकार काय निर्णय घेणार, हा मोठा प्रश्न आहे.

पेडण्यापासून काणकोणपर्यंत भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले होण्याच्या, चावे घेण्याच्या घटना राजरोसपणे घडत आहेत. त्यात अनेक जण गंभीर जखमीही होत आहे. गत पावसाळी अधिवेशनात याबाबत विचारण्यात आलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात, गेल्या पाच वर्षांच्या काळात कुत्र्यांनी चावे घेतल्याच्या १,०१,८३९ घटना घडल्याची माहिती पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिलेली होती. यावरून विचार केल्यास कुत्र्यांनी​ चावे घेण्याच्या घटना प्रत्येक महिन्याला सरासरी १,६९७ आणि प्रत्येक दिवसाला ५७ इतक्या घडत असल्याचे समोर येते. यातून भटक्या कुत्र्यांचा प्रश्न राज्यात किती गंभीर बनला आहे, याचेही दर्शन घडते.

इतर भागांप्रमाणे राज्यातील किनारी भागांतही भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे. अशा कुत्र्यांचा पर्यटकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पर्यटनाच्या निमित्ताने राज्यात काही दिवस वास्तव्य करणारे पर्यटक ‘मॉर्निंग वॉक’साठी किनाऱ्यांवर जाणे पसंत करतात. सकाळच्या वेळी किनाऱ्यांवर नागरिकांची वर्दळ नसते. हीच संधी साधून ‘मॉर्निंग वॉक’साठी आलेल्यांवर भटकी कुत्री टोळ्यांनी हल्ला चढवून त्यांचे लचके तोडतात. अशा अनेक घटना गेल्या काही वर्षांत समोर आलेल्या आहेत. अशा घटनांमुळे देश-विदेशातील पर्यटकांमध्ये पर्यटनाचा स्वर्ग असलेल्या गोव्याची प्रतिमा मलीन होत चालली आहे. त्यामुळे सरकारने वेळीच जागे होऊन भटक्या कुत्र्यांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवणे आवश्यक आहे.

कायद्यानुसार भटक्या कुत्र्यांना मारणे बेकायदेशीर ठरते. अशी कृत्ये करणाऱ्यांवर कारवाईही होऊ शकते. त्यामुळे अशा कुत्र्यांनी चावा घेतल्यास नागरिकांना रेबिज होऊ नये, यासाठी पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्याकडून दरवर्षी कुत्र्यांचे लसीकरण करण्यात येते. कुत्र्यांना पकडून नेऊन त्यांचे लसीकरण करण्यात येते आणि नंतर त्यांना पुन्हा त्याच ठिकाणी सोडण्यात येते. त्यातून अशा कुत्र्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण कमी होत नाही. केवळ त्यांनी चावे घेतल्यास नागरिकांना रेबिजची लागण होत नाही. पण, अनेकदा त्यांच्यामुळे नागरिकांना अनेक दिवस गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. दुसऱ्या बाजूला भटक्या कुत्र्यांमुळे राज्यातील रस्ते अपघातांमध्येही वाढ होत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. रात्रीच्यावेळी भटकी कुत्री वाहन चालकांवर हल्ला करण्यासाठी त्यांच्यामागून धावत सुटतात. अशावेळी वाहन चालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात घडतात. अशा अपघातांमध्ये अनेकांचा मृत्यू होऊन त्यांचे संसार उद्धवस्त होत आहेत. तर, अनेकजण गंभीर जखमी होत असल्याचेही प्रकार घडत आहेत. पण, पंचायती, पालिकांना या प्रश्नाचे काडीचेही सोयरसूतक नसल्याचे दिसून येत आहे.

कायद्यानुसार भटक्या कुत्र्यांना ठार मारण्यावर बंदी आहे. परंतु, त्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी पशुपालन आणि पशुसंवर्धन खाते निश्चित प्रयत्न करू शकते. त्यासाठी भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीवर पुढील काळात अधिक जोर देणे गरजेचे आहे. तसे केल्यास पुढील काही वर्षांत त्यांची संख्या निश्चितपणे नियंत्रणात येऊ शकते. किनारी भाग तसेच पर्यटकांची आकर्षणे असलेल्या ठिकाणच्या कुत्र्यांवरही ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. अशा कुत्र्यांसाठी शहरांबाहेर शेड उभारून त्यांची व्यवस्था तेथे केल्यास पर्यटनस्थळांवर पर्यटकांना कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. 

किनारी भागांमध्ये भटक्या कुत्र्यांनी जो उच्छाद मांडलेला आहे, त्याबाबतच्या तक्रारी करण्यासाठी तसेच उपाययोजनांची मागणी करण्यासाठी स्थानिक पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्याने जारी केलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. परंतु, हे संपर्क क्रमांकच बंद असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून वाढत चाललेल्या आहेत. याचा या खात्याने गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. फोंड्यातील अनाबिया शेख या मुलीच्या मृत्यूमुळे भटक्या कुत्र्यांचा विषय चव्हाट्यावर आलेला आहे. परंतु, याबाबत एकाही लोकप्रतिनिधीकडून आवाज उठलेला दिसून आलेला नाही. याचाच अर्थ, पंचापासून ते मंत्र्यांपर्यंतचे लोकप्रतिनिधी स्वत: अशा कुत्र्यांच्या हल्ल्यात सापडल्यानंतरच या गंभीर प्रश्नाबाबत तोंड उघडणार का, असा सवाल राज्यभरातील जनतेकडून विचारला जात आहे.


सिद्धार्थ कांबळे
(लेखक गोवन वार्ताचे मुख्य प्रतिनिधी आहेत.)