प्रतिभा ही वेडाची बहीण आहे असे म्हटले जाते. या अर्थाने सूरज असेच कलात्मकतेचे वेड घेऊन जगतो. त्याचा त्याच्या मनाशीच संघर्ष चाललेला असतो. एक क्षण असा होता की काय करावे असा एक मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा होता.
तो चित्र काढतो अगदी हुबेहूब... जिवंत वाटावीत अशीच! निसर्गावर त्याचे मन:पूर्वक प्रेम. भटकंती त्याला आवडते. फिरत असतो एकटाच आपली दुचाकी घेऊन. शोधत असतो काहीतरी सभोवताली. निसर्गातील सूक्ष्म बदल तो हेरतो. त्याची नजर तीक्ष्ण... एकदा बघतो ते लक्षात ठेवतो. त्याला आवडणाऱ्या गोष्टीचा ध्यास बाळगतो. माणसांपेक्षा संगीतात रमतो. हार्मोनियमशी त्याचे सख्य जुळलेले आहे. त्याचा रोजचा रियाज त्याला घडवतो.
कला शाखेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर घेतलेले वकिलीचे शिक्षण त्यांच्यातील विद्वत्ता अधोरेखित करते. कलेच्या सर्वांगांना स्पर्श करीत करीत त्याने स्वत:चे आजचे स्थान निर्माण केलेले आहे. अॅडव्होकेट सूरज मळीक ही त्याची त्याच्या कुटुंबासाठीची ओळख असली, तरीही तो ज्या बोटांनी चित्र काढतो, फोटोग्राफी करतो, जी बोटं लीलया हार्मोनियमवरून फिरतात त्याच बोटांत पेन धरून तो सुंदर लेख लिहितो.
सत्तरीतील वांते या निसर्ग सौंदर्याने समृद्ध गावात त्याचा जन्म झाला. या मातीत आकाशाला गवसणी घालणारी उंचच्या उंच वृक्ष आहेत. तनामनाला गारवा देणारी कुळागरांची वैभव आहे. बारमाही पाण्याचे स्रोत असलेले तलाव, झरी आहेत. देवाच्या नावाने राखून ठेवलेल्या देवराया तर गावाची हृदयेच म्हणावी लागतील.
मातीतील हे सगळे सांस्कृतिक संचितच सूरजच्या नसानसात भिनून राहिलेले आहे. ती सर्जकता त्याला स्वस्थ बसू देत नाही.
तो सातत्याने लिहितो. इंग्रजीतून, मराठीतून. विषयाची त्याला कमतरता नाही. भटकंती करताना त्याला आलेले अनुभव एखादा सुंदर परिसर, मातीचे संचित, गावातील लोककलाकार, निसर्गातील फुले, पाने, पक्षी, प्राणी यावर तो भरभरून लिहितो. जे लिहितो ते तो स्वत: जगतो म्हणून त्याच्या लिखाणाला एक वेगळी शिस्त आलेली आहे. अलीकडे तरुण लिहित नाहीत, वाचत नाहीत अशा सारख्या तक्रारी केल्या जातात. कदाचित हातात पुस्तक घेऊन त्यांचे वाचन होत नसेल मात्र ते वाचत आहेत. जर त्यांनी वाचले नसते, तर त्यांना काहीतरी वेगळे लिहिताना त्रास झाला असता.
आजपर्यंत सूरजने अनेक विषयांवर लेखन केलेले आहे. त्यात त्याला भावते ती गोमंत संपदा. याच नावाखाली त्याचे लेखन सध्या वर्तमानपत्रातून सुरू आहे. या सदरात फुलपाखरू, कुळागर, गाव, पाण्याचे स्रोत, देवराया, जात्यावरच्या ओव्या, मनाला स्पर्शून गेलेली एखादी व्यक्ती, प्राचीन तलाव, इतिहास संस्कृतीच्या खुणा असे विविध विषय येतात. ‘परिक्रमा’ उपक्रमात सहभागी होऊन त्या माध्यमातून अनेक विषय ओळखीचे झाले. तो अभ्यासू असल्याने आकलन करून ते टिपून ठेवतो. त्याच्या आवडीचा आणि जवळचा विषय म्हणजे फुलपाखरू!
सृष्टीच्या या लावण्यमयी कृतीवर त्याने लेख तर लिहिलाच, त्याशिवाय वैविध्यपूर्ण रंगलावण्य इतरांना परिचित करून दिले. त्यांच्या एकूणच जन्माच्या आणि जगण्याच्या प्रक्रियेला व्हिडिओच्या माध्यमातून सजीवंत केले. फुलपाखराच्या जीवन चक्राला कॅमेऱ्यात बंदिस्त केले. त्याची व्हिडिओग्राफी केली. त्याची चित्रं काढली आणि एवढेच करून तो स्वस्थ बसला नाही, तर त्यांचे छोटेसे प्रदर्शन घडवून आणले. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.
विवेकानंद पर्यावरण जागृती फौजेचा कार्यकर्ता सदस्य म्हणून त्याने आजपर्यंत असंख्य पर्यटकांना निसर्गाचे वेगळेपण प्रत्यक्षात नेऊन दाखवलेले आहे. त्यांच्यासाठी व्याख्याने आयोजित केलेली आहेत. सत्तरी तालुक्यातील विविध देवरायांचा अनुभव घेणे ही बऱ्याच अभ्यासू व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची गरज असते. त्यासाठी सूरज अशा अभ्यासक संशोधकांच्या मदतीला येतो. परिसर आणि जैवविविधता यांना जाणून घेण्याची त्यांची इच्छा पूर्ण करतो. निसर्गाच्या कुशीत लपलेली औषधी
वनस्पती असो अथवा एखाद्या झाडपानांवर जगू पाहणारा कीटक असू दे, सूरजला त्याची माहिती असते. तो ती गोळा करतो. त्या परिसरातील लोकांशी संवाद साधतो.
हार्मोनियम आणि चित्रकला हे दोन्हीही त्याचे आवडीचे विषय. त्याविषयी तो भरभरून बोलतो. लिहितो. आजपर्यंत त्यांनी केजी ते पीजी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी, तरुण वर्ग, शिक्षकांसाठी अनेक व्याख्याने दिलेली आहेत. इंग्रजी, हिंदी, मराठी, कोकणी या चारही भाषांतून तो संवाद साधतो. प्रतिभा ही वेडाची बहीण आहे असे म्हटले जाते. या अर्थाने सूरज असेच कलात्मकतेचे वेड घेऊन जगतो. त्याचा त्याच्या मनाशीच संघर्ष चाललेला असतो. एक क्षण असा होता की काय करावे असा एक मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा होता.
हार्मोनियममध्ये त्याचा जीव गुंतलेला. आज तो उत्कृष्ट हार्मोनियम वाजवतो. विविध संगीताच्या मैफिलीत संगीतसाथ करतो आणि लिहिण्यातील सातत्यही
राखतो. एका बाजूला आपण म्हणतो की तरुण वर्ग लिहित नाही, परंतु सूरजसारखी तरुणाई लिहिते ही आश्वासक बाब असते. वडील उत्तम सरकारी नोकरीत. त्यांनी मुलाला मनासारखे जगण्याची मुभा दिली. राजेंद्र केरकरांच्या सहवासात त्यांच्यातील प्रतिभा फुलली, विस्तारली ती अधिक प्रगल्भ होताना दिसत आहे.
अजूनही पेशाने वकील असलेल्या सूरजला लांबचा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी मनाची स्थिरता आणि लेखन वाचनातील सातत्य टिकवून ठेवावे लागेल. कलाकार आपल्या कलेतून अभिव्यक्त होत असतो. त्यातूनच तो वाढतो. सूरजच्या स्वरांची प्रेरणा निसर्ग आहे. फुलात तो रमतो... फुलपाखरांचे रंग कॅमेऱ्यात टिपतो. समूहात असतानाही तो स्वत:च्याच तंद्रीत जगतो. ही त्याची भावतल्लीनता त्याला अंतर्मुख करते. कलाकारांची ही धुंदी सभोवतालाला कळली की मग बरेच गुंते सुटत जातात. सूरज उत्तम मळीक या तरुणाकडून अधिकाधिक सुंदर कलाकृती निर्माण होवोत हीच सदिच्छा!
पौर्णिमा केरकर
(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक,
कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)