रेडिओकडून आम्हांला अनेक गोष्टी शिकता आल्या. मिडियात काम करताना ते गाठोडं, संचित फार कामी आलं. अजून येतं.
आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर एके काळी ‘रेनासेन्स’ नावाचा कार्यक्रम यायचा. दर शुक्रवारी त्याचं प्रसारण व्हायचं. नंतर तो बंद झाला. ‘मनपसंत गीतं’ कार्यक्रम यायचा त्याच धर्तीवर कोंकणी गीतांचा ‘मनाजोगतीं गीतां’ हा कार्यक्रम होता. “आलेन कॉश्ता म्हुण्टा देव बरी सांज दिवं”, उच्चारत निवेदक आरंभालाच छान सूर लावायचा. नंतर लोकांची फर्माईश व गाजलेली कांतारां प्रसारित व्हायची. चोडण, दीवार, बाणावली व भवताल अशा गावात सगळे रेडिओ ऑन असत. आल्फ्रेड रोज – रीता रोज यांची कांतारां सुप्रसिध्द होती. लॉर्ना, एम बॉयर व इतरांचीही कांतारां फार लोकप्रिय होती. ‘मोग तुजो कितलो आशेलो’ हे कोंकणी फिल्मी गीत मला फार फार आवडतं. म्हणजे नंबर एकवर. ‘आमचें नशीब’ चित्रपटातील ‘गोडाचो पांव’ हे गीत पण मला खूपच आवडतं. ‘बॅण्ड्रा फेस्ताक गेल्लों हांव रे निमण्या आयतारा’, हे कांतारही बरंच गाजत होतं.
गांधी विचारांवरील एक कार्यक्रम प्रसारित व्हायचा. ‘गांधीजींचो साद’ असं त्याचं नाव होतं. त्यात सुरुवातीला एक भजन असायचं. नंतर निवेदक गांधी विचार कोंकणीत प्रभावीपणे वाचून दाखवायचा व अखेरीस आणखीन एक छान भजन असे. सकाळी काम करताना हा धीरगंभीर शांत वृत्तीचा कार्यक्रम गांधीजींचे सुविचार लोकांपर्यंत पोहोचवायचं महत्त्वाचं उद्दिष्ट साद्य करायचा. मी हायस्कूलात असताना मला वाटतं हा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी यायचा. शंकर भांडारी यांचे कोंकणी उच्चार व वाक्यफेक ऐकावीशी वाटे. मधाळ कोंकणी. त्यात गांधी विचार असल्याने एक वेगळा भावमिश्रित फ्लेवर असायचा. ती समज त्यांना होती.
आकाशवाणीवरून ‘व्हनीबायली वासरी’ हा महिलांचा कार्यक्रम प्रसारित व्हायचा. साप्ताहिक. कमलादेवी राव देशपांडे उर्फ ताई यांच्या आवाजातील संवाद अतिशय गोड असायचा. त्यांच्या आवाजालाही एक साखरेचा पाक होता. माझ्या ‘वळेसर’ या पुस्तक प्रकाशनाला फोंड्यात झालेल्या कार्यक्रमात या ताई आल्या होत्या. मला भेटल्या, खूश झाल्या. इटुकला होता तू, तेव्हा ‘खळार आनी मळार’ कार्यक्रमासाठी रेडिओवर यायचा. आता लांब झाला रे, म्हणून हसल्या. आवाज तसाच गोड होता.
हे झाले आकाशवाणी पणजी केंद्राचे कार्यक्रम. सरकारी कार्यक्रम असल्याने प्रसारणाचा प्रत्येक निर्णय लालफितीतील निर्णयावरून घडे. दिल्ली मुख्यालयात जो निर्णय होई तो सर्व केंद्रांना लागू होई. फिल्मी गीतांचे प्रमाण किती असावे यावरून निर्णय होई. ते प्रमाण जरा कमी होऊ लागले. या गडबडीत सिलॉन स्टेशनने बाजी मारली. जगप्रसिध्द निवेदक अमीन सायानीचा कार्यक्रम गाजू लागला. “अगली पायदान पर,” हे त्याचे शब्द लोकांना घरचेच वाटू लागले. ‘पायदान पर’ म्हणजे लोकप्रियतेच्या मानदंडाप्रमाणे पुढील टप्प्यावरील गीत. भारतभर मोठ्या प्रमाणात त्या काळी ‘बिनाका गीतमाला’ लोक ऐकू लागले. गाणीही अधिक लोकप्रिय झाली. लोकांच्या ओठी घोळू लागली.
लोकप्रियतेचं शिखर गाठल्यावर, साहजिकपणे त्याची उतरण पण सुरू होते. तसंच सिलोन केंद्राचं झालं. ‘बिनाका गीतमाला’ सोडल्यास या केंद्रावरील प्रसारण बंदच पडलं. कालांतरानं ही ‘गीतमाला’ १९८९ मध्ये विविध भारतीवरून प्रसारित होऊ लागली. १९९४ पर्यंत ही चालली.
बीबीसी बातम्या रेडिओवर ऐकू येत होत्या. जगभरातील घटना समजत. त्यांचे इंग्रजी उच्चारही कडक असायचे. पण बीबीसी बातम्यांचे नाव अजूनही आहे. ताज्या, विश्वासार्ह बातम्या. सुटसुटीत लेखन आणि वाचन. हे त्याचे वैशिष्ट्य होय. आजही त्यांची वेबसाईट वाचताना बातम्यांची पध्दत मोहक वाटते. तीन चार ओळींचे चार परिच्छेद. बातमी तितक्यातच संपते. आटोपशीर.
रेडिओकडून आम्हांला अनेक गोष्टी शिकता आल्या. मिडियात काम करताना ते गाठोडं, संचित फार कामी आलं. अजून येतं.
मुकेश थळी
(लेखक साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत.)