आपण पूर्ण होतो, आपल्या देहाची नित्यपूजा बांधली जाते ती पंचेद्रियांच्या माध्यमातूनच त्यात रंग, रूप, नाद अन् स्पर्शाचे सोहळे माजवतात ती म्हणजे फुले.
छान मंदसा वास असलेला अनंत (तगर), पांढराशुभ्र मोगरा, गुलाबी रंगाची हलकीशी छटा असलेली पण पांढरी जाई, सकाळच्या दवाचे बिंदू आपल्या इवल्याशा अंगावर मिरवणारा सोनचाफा, जिचं झाड आपल्या दारी असावं व जिच्या फुलांचा सडा नेहमी आपल्या अंगणात पडावा असं वाटतं ती बकुळीची फुलं, अन् ज्या फुलाच्या कळ्या हाताळताना फार म्हणजे फारच प्रयास करावे लागतात ते म्हणजे सुरंगी.
पण पुरूष म्हणून मला फुलांची आवड आहे ती नित्यपूजा व आपल्या कारमध्ये डॅशबोर्डवरच्या गणपतीला सजविण्यासाठी. आपल्या विघ्नहर्त्या महागणपतीने नुसतं डॅशबोर्डवर बसू नये. त्यांची, गणरायांची ती बैठक सपुष्प असावी. त्या फुलांतून कारमध्ये एक हलकासा, मंदसा सुगंध प्रवास सुरू होऊन संपेपर्यंत दर्ळत रहावा, त्या सुगंधात कारचालकाने गुंतून राहू नये पण त्याला त्या परिमळाचं अस्तित्व वरचेवर जाणवत राहावं, याने मोठ्ठं काही होत नाही, फक्त तुमचा प्रवास हा एक 'आनंदयात्रा' होतो.
गाडीतला देव व फुलांचा हार हे समीकरण मी लहान असल्यापासून बघतोय. सकाळच्या वेळी आमच्या वांत्यातून निघून साखळी बसस्टँडला बसगाडी पोहोचली की ड्रायव्हर पहिलं काम करायचा ते म्हणजे रोजच्या हारवाल्याकडून हार घेऊन तो बसमधल्या देव्हाऱ्याला घालायचा. त्या देव्हाऱ्यात गणपती, लक्ष्मी व सरस्वती या देवता पर्मनंट असायच्या. यात कधी बदल झाला नाही. या ड्रायव्हर व कंडक्टर लोकांची श्रध्दा म्हणजे विलक्षण असते. रोज बसमधल्या देव्हाऱ्याला फुलं घालणार, उदबत्ती दाखवणार, त्या उदबत्तीचा वास बसभर दरवळत असतो, त्यानेही येणाऱ्या-जाणाऱ्या, चढणाऱ्या-उतरणाऱ्या सुरूवातीपासून शेवटपर्यंत प्रवास करणाऱ्या पॅसेंजर्सची 'गुड मॉर्निंग' होत असते.
तर ह्या फुलांची तऱ्हा तशी निराळी असते. कधी कुठलं फूल दिसायला सुंदर, तर कुठलं फूल दिसायला यथातथा. आता जास्वंदीचंच घ्या. जास्वंदी दिसायला छान, रंगीबेरंगी, नेत्र ह्या इंद्रियाला काठोकाठ सुखावणारं ते दिसणं. पण त्याच्या दिसण्यावरून तुम्ही त्याचा वास घ्यायला गेलात तर तुमच्या पदरी निराशाच येईल कारण या फुलाला सुगंध नाही. मला 'अपूर्णता' या अवस्थेचं आकर्षण, अप्रूप व आश्चर्य वाटतं ते इथे. देव तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या एका दालनात भरभरून देतो पण दुसरं दालन तर अगदी रिकामंच ठेवतो. पण अपूर्णतेत आनंद आहे हेही तितकंच खरं. जास्वंदीला सुगंध नाही अन् बकुळीला रूप नाही पण दोन्ही फुले रूप व गंध लेवून मानवाच्या दोन इंद्रियांना सुखावतात. मोगरा, अनंत, जाई, सदाफुली, यांची साधी राहणी पण उच्च विचारसरणी कुणालाही भावणारी अशी. यांचं पांढरंशुभ्र रूप अगदी मोहवत नाही पण मनाला तोषवतं. या फुलांकडे पाहून मनाला शांतता व शितलता लाभते. या अनंताचे एकेक फूल देव्हाऱ्यातील प्रत्येक देवाला वाहून पूजा झाल्यावर संबंध देवघर न्याहाळून पाहताना एक विलक्षण सुख लाभतं. त्या इवल्याशा फुलांनी आपली नित्य देवपूजा पूर्ण झालेली असती. देव प्रसन्न मुद्रेने आपल्याला पाहत असतो. ‘माझ्याकडे देव माझा पाहतो आहे’ हे भक्तिगीताचे बोल सत्यात उतरतात.
पद्यांच्या भटी बोलीभाषेत मी जेव्हा पहिल्यांदा काव्य लिहायला सुरूवात केली तेव्हा माझे पहिले शब्द होते,
‘जेदवां जेदवां मज तुजी याद येणां,
वोवळां सुकून वास देणां,
तेदवां तूं दाशविण होऊन ये!’
यात मला अपूर्णत्वाची संकल्पना अतिशय आकर्षक वाटते. फुलांसारखे आपणही अपूर्ण आहोत.
चांगलं वस्त्र, चांगला श्रृंगार आपल्याला लोभस रूप देतो, चांगलं संगीत आपल्याला नादनिनादाच्या कर्णमधुर उक्तीं-श्रुतींत रमवतं, आपल्या घ्राणेंद्रियातून शोषलेला उंची अत्तराचा अंश आपला अवघा देह गंधमादन पर्वतासारखा सुगंधित करतो. चांगला पदार्थ, चांगल्या अन्नाचा आस्वाद घेताना आपली ब्रह्मानंदी टाळी लागते. अन् आपली अख्खी मानवजात उभी आहे ती तर स्पर्शाच्या अनाकलनीय व गुढ अशा गुणधर्मावर. स्पर्शात, प्रेम, माया, वात्सल्य, ममत्व, स्नेह, प्रणय, वासना, सगळे मित्र व रिपू सामावलेले आहेत.
आपण पूर्ण होतो, आपल्या देहाची नित्यपूजा बांधली जाते ती पंचेद्रियांच्या माध्यमातूनच त्यात रंग, रूप, नाद अन् स्पर्शाचे सोहळे माजवतात ती म्हणजे फुले. गुलाब हा फुलांचा राजा तर स्वादाच्या प्रांतातही आपल्या सचेतन देहाची आहुति देऊन, देहांतर करून, फिरून नव्याने जन्म घेतो; गुलाबाचा गुलकंद होतो.
फुलांच्या सुखाचा हा उखाणा न सुटण्यासारखा आहे व न सुटावा असा प्राणप्रिय आहे.
प्रा. विघ्नेश शिरगुरकर