हार्मोनियम किंचित बेसूर असल्याने या वाद्यावर आकाशवाणीने बंदी घातली हे मागील प्रकरणात आलं आहे. आकाशवाणीच्या इतिहासात, संगीत विभागात, हार्मोनियम साथीविषयीची बंदी व कालांतराने ती काढणं हा एक अध्याय आहे.
पहिले माहिती आणि प्रसारण मंत्री सरदार पटेल यांच्या काळात बंदी उठवण्यासाठी विशेष काही झाले नाही अशी नोंद एका पुस्तकात मिळते. १९७१ पर्यंत ही बंदी लागू राहिली. ती काढण्याचे प्रयत्न सुरू होते. माहिती आणि प्रसारण मंत्री डॉ. केसकर, डॉ. गोपाळ रेड्डी, सत्यनारायण सिन्हा आणि इतर अनेकांनी अधिकृत भूमिकेपासून हटण्यास नकार दिला. १९५२ पासून दहा वर्षे मंत्री असलेले केसकर हे भारतीय शास्त्रीय संगीताची शुद्धता राखण्याचे जोरदार समर्थक असल्याने त्यांनी या वाद्यावर बंदी घालायला पुढाकार घेतला असे मानले जाते, परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे असेही तपशील मिळतात.
भारतीय शास्त्रीय शैलीतील काही गायकांमध्ये, विशेषतः भजन, ठुमरी, दादरा इत्यादी हलके शास्त्रीय संगीत गाणाऱ्यांमध्ये, बारीकसारीक निषेध सुरूच होते. तथापि, १९७१ पर्यंत अधिकाऱ्यांनी या वाद्याचा वापर करण्यास विरोध केला. कोणीही मांजरीच्या गळ्यात घंटा वाजवू धजत नव्हते. माहिती आणि प्रसारण मंत्री असताना अंतिम निर्णय घेण्याची आणि बंदी उठवण्याची जबाबदारी इंदिरा गांधी यांच्यावर सोपवण्यात आली.
त्यानंतर, ऑक्टोबर १९७१ मध्ये, मनिंद्र मोहन बॅनर्जी, मुनेश्वर दयाळ आणि इतरांसारख्या काही संगीतकारांनी हार्मोनियमचा वापर साथीचं वाद्य म्हणून करण्यास सुरुवात केली. ९ जून १९७४ रोजी, आकाशवाणी कोलकातात तैनात असलेले कर्मचारी कलाकार मोंटू बॅनर्जी यांनी हार्मोनियमवर एकल वादन केलं आणि कालांतराने एकल रचना वाजवत राहिले, अखेर ही बंदी दूर झाली. हार्मोनियम परत आले.
जेव्हा बंदी लादण्यात आली, तेव्हा देशात असंख्य कुशल सारंगी वादक होते आणि सारंगी गायकांच्या स्वरांच्या अगदी जवळ आहे. म्हणूनच, ते साथीदारांचे आवडते वाद्य बनले. त्यानंतर, सारंगी वादकांच्या गुणवत्तेत सतत घसरण होत गेली व वादकही दुर्मिळ होत गेले. म्हणून, साथीदारांना दुसऱ्या वाद्याची आवश्यकता होती आणि लोक हार्मोनियमकडे परतले, असे ज्येष्ठ संगीत निर्माते टी. एस. रामकुमार सांगतात. 'तरीही, गायकांच्या ऑडिशन दरम्यान त्याचा वापर करण्यास अजूनही परवानगी नाही कारण असे मानले जाते की हार्मोनियम साथ असताना त्यांची खरी स्वर गुणवत्ता कधीही ओळखता येत नाही,' असे ते सांगतात.
४० च्या दशकाच्या सुरुवातीला, संगीत हा सर्वात महत्त्वाचा प्रसारण घटक होता आणि बहुतेक स्टेशन्स त्यांच्या प्रसारण वेळेपैकी जवळजवळ ७५ टक्के वेळ त्यासाठी देत असत. म्हणूनच, हार्मोनियमच्या वापराला परवानगी देणे हा त्या काळात चर्चेचा विषय बनला आणि अजूनही त्यावर चर्चा होत आहे. हार्मोनियम हे साथीचं वाद्य म्हणून अपुरं कसं आहे यावर अजूनही संगीत जाणकारांमध्ये चर्चा झडत असतात.
गोव्याचे हार्मोनियम वादक तुळशीदास बोरकर हे ख्यातनाम संगीत कलाकार. त्यांनी आकाशवाणीवर अनेक संगीत गायकांना साथ केली आहे. मी आकाशवाणीच्या सेवेत असताना एकदा ते पणजी केंद्रात आले होते. त्यांची आरकायव्हल मुलाखत होती. फार छान मुलाखत झाली. त्यांचं वाद्याविषयीचं प्रेम व ज्ञान पाहून आम्ही चीत झालो. तुळशीदास बोरकरांनी आपली अमीट मुद्रा हार्मोनियमवर सोडली आहे. अप्पा जळगांवकर, पुरूषोत्तम वालावलकर या दिग्गज हार्मोनियमवादकांनी अनेक मोठ्या गायकांना साथ केली आहे.
आकाशवाणीच्या इतिहासात, संगीत विभागात, हार्मोनियम साथीविषयीची बंदी व कालांतराने ती काढणं हा एक अध्याय आहे.
हार्मोनियम वाद्य भारतात युरोपमधून आलं, अशा नोंदी सापडतात. हे वाद्य लोकप्रिय आहे. आमच्या लहानपणी उत्सवी नाटकांना पांयपेटी वाजवत. हाताचा भाता नसे. दोन्ही पायांनी दाबायचे दोन भाते होते. अनेक संक्रमण अवस्थातून हे वाद्य गेले. पण त्याचं अस्तित्व मात्र अबाधित आहे.
मुकेश थळी
(लेखक साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत.)