परीक्षेत ५५१ वा क्रमांक मिळवत घातली यशाला गवसणी
कागल : जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यशापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागत नाही. ध्येय उराशी बाळगलेल्यांसाठी परिस्थिती कधीच आडकाठी बनू शकत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बिरदेव सिद्धप्पा ढोणे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातील यमगे या लहानशा गावातील मेंढपाळ कुटुंबातील बिरदेव या युवकाने केंदीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. यूपीएससी २०२४ च्या परीक्षेत त्याने ५५१ वा क्रमांक मिळवून घसघशीत यश संपादन केले आहे.
पहा व्हिडिओ
‘मला शुभेच्छा देण्यासाठी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणला नाही तरी चालेल, पण एखादे पुस्तक जरूर आणा. कारण पुस्तकं हीच माझ्या आयुष्याची संजीवनी आहे. माझ्या यशाला कारणीभूत पुस्तकंच आहे. तुम्ही आणलेल्या पुस्तकांतून गावात ग्रंथालय उभे राहील’ असे एका वाहिनीला मुलाखत देताना ते म्हणाले.
बिरदेव यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण यमगे केंद्र शाळेत, तर दहावीपर्यंतचे शिक्षण जय महाराष्ट्र हायस्कूलमधून झाले. दहावीत ९६ टक्के गुण मिळविल्यानंतर त्यांनी मुरगूडच्या शिवराज कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेतला. बारावीत ८९ टक्के गुण मिळविल्यानंतर त्यांनी पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून बी. टेक. पूर्ण केले.
बिरदेवचे केंदीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न होते. पण, घरची परिस्थिती हलाखीची असल्याने दिल्ली किंवा पुण्यात जाऊन अभ्यास करणे कठीण होते. वडिलांनी नोकरी करण्याचा सल्ला दिला, पण भाऊ वासुदेव डोणे यांच्या मदतीने त्यांनी अभ्यास सुरू ठेवला.
दरम्यान नागरी सेवेच्या परीक्षेत पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले. दुसऱ्या प्रयत्नातही मुख्य परीक्षेत ते यश मिळवू शकले नाहीत. अखेर तिसऱ्या प्रयत्नात बिरदेव यांनी यूपीएससी परीक्षेत ५५१वा क्रमांक मिळवून आयपीएस सेवा मिळवली.
यूपीएससीच्या पूर्व परीक्षेला १३ लाख ४ हजार परीक्षार्थी बसले होते. त्यात उत्तीर्ण झालेले १४ हजार ६२७ परीक्षार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले. त्यातील २ हजार ८४५ जणांनी उत्तीर्ण होऊन मुलाखत दिली. परीक्षा एकूण एक हजार ५६ पदांसाठी झाली होती आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही अपार जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यमगे गावातील बिरदेव डोणे यांनी थेट आयपीएस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण गावात आणि कोल्हापूर जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यूपीएससी निकालाच्या दिवशी बिरदेव आपल्या पालकांसोबत कर्नाटकातील अथणी येथे मेंढ्यांच्या पाळ्यात होते. निकालाची माहिती कळताच धनगरी पाळ्यावरच त्यांचा धनगरी फेटा घालून सत्कार करण्यात आला. गावकऱ्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. जिद्द, चिकाटी आणि कष्ट यांच्या जोरावर कोणतीही अडचण मात करता येते. बिरदेव डोणे यांनी आपल्या यशाने सिद्ध केले आहे.