
जोयडा: जोयडा, धारवाड, कलघटगी आणि हळीयाळ परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून हर हर महादेव, उळवी श्री चन्नबसवेश्वर महाराज की जय अशा जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले आहे. पहाटे चार वाजता सुरू होणारा हा भक्तीनाद रात्री उशिरापर्यंत घुमत असून, हळीयाळ–दांडेली आणि बेळगाव-रामनगर-उळवी मार्गावर यात्रेसाठी जाणाऱ्या बैलगाड्यांमुळे जत्रेसारखे वातावरण निर्माण झाले आहे. बैलांच्या गळ्यातील घंटांचा निनाद, बैलगाड्यांच्या चाकांचा आवाज आणि भक्तीगीतांच्या साथीने संपूर्ण मार्ग भक्तीने न्हाऊन निघाला आहे.
हळीयाळ–दांडेली आणि बेळगाव-जोयडा मार्गे चक्कडी गाड्यांतून श्रीक्षेत्र उळवीकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून जाणाऱ्या सजवलेल्या चक्कडी गाड्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. धारवाड ते उळवी या मार्गावर, अंगडी रिसॉर्टजवळ तसेच इतर ठिकाणी अन्नदान शिबिरे आयोजित करण्यात आली असून, रथोत्सवासाठी येणारे भाविक येथे भोजन व विश्रांती घेऊन आपला प्रवास पुढे सुरू ठेवत आहेत.
जोयडा तालुक्यातील श्रीक्षेत्र उळवी येथे २५ जानेवारीपासून जत्रेला सुरुवात झाली असून, ३ फेब्रुवारी रोजी महारथोत्सव होणार आहे. ही जत्रा ५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. जोयडा तालुक्यातील घनदाट जंगलात वसलेले श्री चन्नबसवेश्वर मंदिर हे उत्तर कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. धारवाड, कलघटगी, हावेरी, बैलहोंगल, सौदत्ती आदी भागांतून हजारो भाविक रथोत्सवासाठी उळवीत दाखल होत आहेत.
या जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे, आधुनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध असतानाही भाविक आजही पारंपरिक चक्कडी गाड्यांतून प्रवास करतात. या चक्कडी गाड्या रंगीबेरंगी सजावटीने नटवल्या जातात. बैलांच्या शिंगांना रिबिन, गळ्यात घंटा व दागिने बांधले जातात. वाटेत भजन, कीर्तन व भक्तीगीतांच्या गजरात ही चक्कडी यात्रा पुढे सरकते. गुरेढोरे निरोगी राहावीत, पाऊस चांगला पडावा आणि पीक भरघोस यावे, या श्रद्धेतून भाविक ही यात्रा करत असल्याचे सांगतात.
उळवी जत्रेसाठी येणाऱ्या काही पायी प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंनी व चक्कडी यात्रेकरूंनी शहर आणि वनक्षेत्रातील काही ठिकाणी स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. तसेच, काही ठिकाणी मद्यपानाच्या घटना घडल्याने सार्वजनिक सुव्यवस्था व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चक्कडी यात्रेमुळे काही ठिकाणी जड वाहने, ट्रक व बस वाहतुकीस अडथळा येत असल्याच्या तक्रारी वाहनचालकांकडून करण्यात येत आहेत.