
पणजी : युनिटी मॉलच्या (Unity Mall) जागी झालेले बांधकाम तसेच पत्रे काढून परिसर पूर्वी सारखा करण्याची मागणी आंदोलन करीत असलेल्या ग्रामस्थांनी केली. आंदोलनासंदर्भात आज रात्री निर्णय होणार. मात्र, उद्या शुक्रवारी सकाळी आझाद मैदानावर महाआंदोलन होणार; अशी माहिती चिंबल (Chimbel) जैवविविधता समितीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांनी दिली.
युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ स्थलांतरीत करण्याच्या निर्णयासाठी त्यांनी मुख्यमंत्री (Chief Minister) डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार मानले. दोन्ही प्रकल्प अन्य ठिकाणी स्थलांतरीत करण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. मात्र, प्रकल्प चिंबल तळ्याच्या प्रभाव क्षेत्रात येत नाही, हे ग्रामस्थांना मान्य नाही. युनिटी मॉल तसेच प्रशासन स्तंभ हे दोन्ही प्रकल्प तळ्याच्या प्रभाव क्षेत्रात येतात, असे त्यांनी सांगितले. सर्वेक्षण अहवाल आणि डीपीआर (DPR) घेऊन आम्ही अभ्यास केला तेव्हा आम्हाला ही माहिती दिसून आली, असे त्यांनी सांगितले.
युनिटी मॉल प्रकल्पाविरोधात चिंबल ग्रामस्थांनी २८ डिसेंबरपासून आंदोलन सुरू केले. गुरुवारी त्यांच्या आंदोलनाला ३३ दिवस पूर्ण झाले. आंदोलन २८ डिसेंबरला सुरू झाले असले तरी लढा सप्टेंबर २०२४ वर्षापासून सुरू झाला. खासदार विरियातो फर्नांडिस, आमदार विरेश बोरकर यांच्यासहीत राज्यातील बऱ्याच भागातील लोकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांचे आंदोलकांनी आभार मानले. या आंदोलनाकडे बरेच लोक जोडले गेले. युनिटी मॉल, प्रशासन स्तंभ दुसरीकडे नेण्याचा निर्णय झाला असला तरी चिंबलचे तळे राखण्याबरोबरच परिसर पूर्वी सारखा करण्याची आमची मागणी आहे. यासाठी शुक्रवारी महाआंदोलन होणार; अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.