मडगावात मानकुराद ६०० रुपयांना एक

हापूस १५०० रुपये डझन, कैर्‍या शंभरला सहा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th January, 11:46 pm
मडगावात मानकुराद ६०० रुपयांना एक

मडगाव : मडगावात (Margao) आता आंब्यांची (mango) आवक सुरू झाली आहे. मात्र, अजूनही मोठ्या प्रमाणात फळे दाखल झाली नसल्याने आंब्याचा भाव वधारलेला आहे. मडगावात मानकुराद (Mankurad) ६०० रुपयांना एक, तर ७२०० रुपये डझन आहे. तर हापूस आंबा (Hapus mango) १५०० रुपये डझन आहे. याशिवाय कैर्‍या १०० रुपयांना सहा अशी विक्री होत आहे.

मडगाव बाजारपेठेत कमी प्रमाणात आंबा विक्रीसाठी दाखल झालेला आहे. अजूनही फळांच्या निर्मितीचा हंगाम येण्यास किमान २० दिवसांचा अवधी लागणार आहे. मात्र, पहिल्यांदा काढलेली फळे पिकलेली असून त्यांचे प्रमाण कमी असल्याने आंब्यांचा भाव वाढलेला दिसून येतो. मडगावातील आंबा व्यापारी नरेंद्र नाईक यांनी सांगितले की, मडगाव बाजारपेठेत सध्या हापूस आंबा व गोव्याचा मानकुराद आंबा दाखल झाला आहे. याशिवाय आंब्यांच्या कैर्‍यांनाही मागणी आहे. हापूस आंब्यांचा दर १५०० रुपये डझन असून मानकुराद प्रति आंबा ६०० रुपयांनी विक्री होत आहे. त्यामुळे मानकुराद आंबा ७२०० रुपये डझन विक्री होत आहे.
फळांची आवक वाढण्यासाठी आणखी १५ ते २० दिवसांचा अवधी लागणार आहे. फळांची आवक वाढल्यानंतर आताचा वाढलेला दर कमी होईल व ग्राहकांनाही आंबे कमी दरात खरेदी करता येणार आहेत. कैर्‍यांनाही मडगाव बाजारात मागणी असून ५० रुपयांना तीन कैर्‍या अशी विक्री सध्या केली जात आहे.
उत्पन्न चांगले मिळण्याचा अंदाज
यावर्षी थंडीचा कडाका चांगला असल्याने आंब्याच्या झाडांना मोहर मोठ्या प्रमाणात आला होता. मात्र, गेल्या आठवड्याभरात दव पडण्याचे प्रमाण वाढल्याने त्याचा फळांच्या दर्जावर काय परिणाम होईल, याबाबत बागायतदार साशंक आहेत. तरीही, एकंदरीत परिस्थिती पाहता यावर्षी आंब्याचे उत्पन्न चांगले मिळेल, अशी आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा