चिंबल येथील तळे २३ प्रजातींच्या पशू-पक्ष्यांचे आश्रयस्थान

२६ हेक्टर क्षेत्र पाणथळ म्हणून जाहीर : गोवा पाणथळ प्राधिकरणाच्या अहवालातून माहिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
चिंबल येथील तळे २३ प्रजातींच्या पशू-पक्ष्यांचे आश्रयस्थान

पणजी : चिंबल (Chimbal) येथील ऐतिहासिक तळ्याचा (historical lake) २६.३१ हेक्टर परिसर पाणथळ जमिनीच्या (Wetland) प्रभावी क्षेत्राखाली येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या तळ्याचे पर्यावरणीय महत्त्व समोर आले असून, हे तळे २३ प्रजातींचे वन्य प्राणी, पक्षी आणि विविध प्रकारच्या माशांचे सुरक्षित निवासस्थान बनले आहे, अशी माहिती गोवा पाणथळ प्राधिकरण आणि गोवा जैवविविधता मंडळाने तयार केलेल्या अहवालातून मिळाली आहे.
या अहवालानुसार, तळ्याचा मुख्य विस्तार १.५५ हेक्टरवर असून त्याची खोली २० मीटर आहे. हे तळे समुद्रसपाटीपासून ५२ मीटर उंचीवर वसलेले आहे. पावसाचे पाणी, भूजल, पाणलोट क्षेत्र, नैसर्गिक झरे आणि तळ्याच्या तळाशी असलेल्या उघड्या विहिरी हे या तळ्याचे मुख्य पाण्याचे स्रोत आहेत. येथील पाण्याची पीएच पातळी सामान्य असून, हे पूर्णपणे गोड्या पाण्याचे तळे आहे. तळ्याच्या ६१.९५ टक्के पाणलोट क्षेत्रात केवळ जंगल असून तिथे मानवी हस्तक्षेप किंवा वस्ती नाही.
हे तळे केवळ निसर्गासाठीच नाही, तर स्थानिक लोकजीवनासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे. शेती, मत्स्यपालन आणि गुरे चरण्यासाठी हे तळे एक मुख्य नैसर्गिक स्रोत म्हणून ओळखले जाते. या तळ्याच्या संरक्षणामुळे चिंबल परिसरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यास मोठी मदत होणार आहे.
तळ्यासभोवती जैवविविधतेचा खजिना
या तळ्याच्या परिसरात विविध प्रकारचे पशू-पक्षी आणि जलचर प्राणी आढळतात. रानडुक्कर, रानकोंबडा, मोर, कौरव बगळा, ब्राह्मणी मैना, पाणकावळा, जांभळा बगळा, घुबड, पाणडूबी (बदकाची प्रजाती), कबूतर, भारद्वाज, कोकिळा, टीटवी, कमळपक्षी, किंगफिशर आणि ग्रीन बी-इटर यांसह अनेक जनावरांच्या प्रजातींची नोंद झाली आहे. तसेच या तळ्यात थिगूर, तिलापिया, गप्पी आणि पिट्टोळ यांसारख्या माशांच्या चार प्रमुख प्रजाती सापडतात. तळ्याच्या परिसरात घाणेरी आणि आकाशी यांसारख्या झाडांचे प्रमाण अधिक आहे.      

हेही वाचा