पणजी : नवनियुक्त सरकारी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रसेवेचे काम करून देशाच्या प्रगतीत हातभार लावावा. राष्ट्र आणि लोकसेवा हेच त्यांचे प्रमुख कर्तव्य आहे, असे मत केंद्रीय वीज राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले. शनिवारी पणजीत १५ व्या टप्प्यातील केंद्रीय रोजगार मेळाव्या अंतर्गत ४७ जणांना नियुक्ती पत्र देण्याचा कार्यक्रम पार पडला. यात ते बोलत होते. यावेळी अबकारी आयुक्त सुधीर देशमुख, जीएसटी आयुक्त बिपिन कुमार उपाध्याय व अन्य अधिकारी उपस्थित होते.
नाईक म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. यासाठी युवकांना सशक्त आणि आत्मनिर्भर करणे आवश्यक आहे. यामुळेच आज देशभर ५१ हजार युवकांना रोजगार नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. ही पत्रे मिळालेल्या युवकांनी आपल्याला मिळालेली नोकरी ही लोकांच्या सेवेसाठी आहे हे समजून काम करणे अपेक्षित आहे. या कर्मचाऱ्यांनी सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात.
ते म्हणाले, प्रामाणिकपणा, समर्पण आणि विनम्रतेने काम करून जनतेचा विश्वास संपादन करावा.सध्या जग वेगाने बदलत आहे. अनेक ठिकाणी एआयचा वापर सुरू झाला आहे. आज नियुक्ती पत्रे मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी याचा देखील विचार केला पाहिजे. स्वतःचे कौशल्य , क्षमता, आदी काळानुसार अद्ययावत करणे आवश्यक आहे. शिकण्याची प्रक्रिया कायम ठेवल्यास भविष्यात याचा कर्मचाऱ्यांना आणि पर्यायाने देशाला फायदा होणार आहे.
सुधीर देशमुख म्हणाले की, विकसित भारत साकार करण्यासाठी केंद्र सरकारने रोजगार मेळा हा उपक्रम राबवत आहे. आज जीएसटी, आयकर, अबकारी खाते, भारतीय रेल्वे, स्टेट बँक ऑफ इंडिया ,टपाल व अन्य केंद्रीय खात्यांमधील भरतीसाठी परीक्षेत यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत. आज देशभरात ५१ हजार युवकांना आत्मनिर्भर करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने काम करून देशाची सेवा करावी.