चोक्सी अत्यंत आजारी आहे, त्यामुळे विमानमार्गेही त्याला हलविणे शक्य नसल्याचा दावा त्याचे वकील करीत आहेत. असे असले तरी त्याच्या प्रकृतीची तपासणी होईपर्यंत त्याचा प्रवास लांबणीवर पडू शकतो, परंतु त्याचे प्रत्यार्पण थांबणार नाही, असे भारतीय वकिलांचे म्हणणे आहे.
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील म्होरक्या तहव्वूर राणा याला भारतात आणल्यावर त्याचे श्रेय घेण्याचे प्रयत्न काँग्रेस पक्षाने केले खरे, पण सातत्यपूर्ण प्रयत्नांनी त्या आरोपीचे प्रत्यार्पण घडवून आणल्याबद्दल मोदी सरकार अभिनंदनास पात्र आहे. एक अट्टल आणि विकृत गुन्हेगार अशीच राणा याची प्रतिमा देशात आहे. त्याला आणण्यासाठी पुरेसे पुरावे देण्यात तपास यंत्रणा यशस्वी ठरल्याने परदेशातील न्यायालयाने विश्वासाने त्यास भारताच्या स्वाधीन केले आहे. आता आर्थिक गुन्हेगारांच्या यादीत बराच वरचा क्रमांक पटकावलेला मेहुल चोक्सी याला भारतात आणून न्याययंत्रणेसमोर कधी उभा केला जाईल, याची देशवासीयांना उत्सुकता आहे. चोक्सी आणि नीरव मोदी या मामा-भाचा हिरे व्यापारी जोडीने पंजाब नॅशनल बँकेला तब्बल १३ हजार ८०० कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. त्यामुळे या दोघांवर सीबीआय आणि ईडीकडून कारवाई सुरू असून त्यांच्यावर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, फरार आर्थिक गुन्हेगार कायदा अंतर्गत खटले दाखल आहेत. गेल्या सात वर्षांपासून ते भारतीय यंत्रणांना चकवा देण्यात यशस्वी झाले आहेत. नीरव मोदी प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला सामोरे जात लंडनमध्ये आहे, तर त्याचा मामा चोक्सीला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. चोक्सी ४ जानेवारी २०१८ रोजी मुंबईत छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारतातून निघून गेला होता. ३१ जानेवारी २०१८ रोजी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर २३ फेब्रुवारी २०१८ रोजी आरपीओ, मुंबईने त्यांचा पासपोर्ट रद्द केला. हा घोटाळा ३३ वर्षांपूर्वी म्हणजे एप्रिल १९९२ मध्ये दिवंगत बिग बुल हर्षद मेहता यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर केलेल्या शेअर बाजार-सह-बँकिंग घोटाळ्यापेक्षा जवळपास चारपट मोठा आहे.
पंजाब नॅशनल बँकेतील १३,८०० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी भारतीय तपास यंत्रणांनी प्रत्यार्पणाची विनंती केल्यानंतर फरार हिरे व्यापारी चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. हा घोटाळा उघडकीस येण्याच्या काही आठवडे आधी हा ६५ वर्षीय चोक्सी आपल्या देशातून पळून गेला होता. आता सीबीआय आणि ईडी प्रत्यार्पणाच्या विनंतीनंतर बेल्जियम पोलिसांनी शनिवारी (१२ एप्रिल) अँटवर्पमध्ये चोक्सीला अटक केली. गेल्या महिन्यात चोक्सी आपली पत्नी प्रीतीसोबत बेल्जियमच्या अँटवर्प शहरात राहत असल्याची बातमी समोर आली होती. चोक्सीला अटक झाली असली तरी त्याचे बेल्जियममधून भारतात प्रत्यार्पण करणे सोपे नाही, असे मानले जाते, यामागे तशी कारणेही आहेत. भारत आणि बेल्जियम यांच्यात प्रत्यार्पण करार झाला असून आर्थिक गुन्ह्यांसह दुहेरी गुन्हेगारीच्या आधारे फरार आरोपींना परत पाठविण्याची मुभा देण्यात आली आहे. दुहेरी गुन्हेगारी म्हणजे दोन्ही देशांमध्ये लागू असलेल्या कायद्यांनुसार गुन्हा दंडनीय असेल तरच एखाद्या व्यक्तीचे प्रत्यार्पण होऊ शकते. विशेष म्हणजे प्रत्यार्पणाची मागणी राजकीय स्वरूपाची असेल तर ती विनंती फेटाळण्याची मुभा करारात आहे. विनंती करणारा देश दोन महिन्यांच्या आत दोषाचे पुरावे सादर करण्यास असमर्थ ठरल्यास अटक केलेल्या व्यक्तीची सुटका केली जाऊ शकते. २०२३ मध्ये, भारत आणि बेल्जियमने परस्पर कायदेशीर सहाय्य करारांवर स्वाक्षरी केली, ज्यात दोन्ही देशांना त्यांच्या तपास यंत्रणांना हव्या असलेल्या फरारी लोकांविरुद्ध एकमेकांचे शोध वॉरंट आणि समन्स अंमलात आणणे आवश्यक आहे.
चोक्सीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सोपी नाही. भारताने त्याला परत आणण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व कायदेशीर साधनांचा वापर करायचे ठरविले आहे. चोक्सीविरोधात मुंबईतील विशेष न्यायालयाने २०१८ आणि २०२१ मध्ये जारी केलेले किमान दोन ओपन एंडेड अरेस्ट वॉरंट भारतीय तपास यंत्रणांनी बेल्जियमच्या सहकाऱ्यांना दिले आहेत.
त्याच्या अटकेनंतर औपचारिक कागदपत्रांची पूर्तता सुरू आहे. प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सीबीआय आणि ईडीची पथके बेल्जियमला भेट देऊन युरोपियन देशाच्या कायद्यानुसार खटला तयार करतील. मात्र, चोक्सी लवकरच भारतात परत येईल, याची शाश्वती नाही. प्रत्यार्पणाची प्रक्रिया लांबली असून फरार उद्योगपतीचे वकील विविध कारणांवरून त्याच्या भारतात परतण्याला आव्हान देणार आहेत.
चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी सोमवारी (१४ एप्रिल) पत्रकारांशी बोलताना चोक्सीचे भारतात प्रत्यार्पण केल्यास त्याच्या मानवी हक्कांवर मोठा परिणाम होईल, असा युक्तिवाद करत अपील दाखल करणार असल्याचे सांगितले. चोक्सी अत्यंत आजारी आहे आणि कर्करोगावर उपचार घेत आहे, त्यामुळे विमानमार्गेही त्याला हलविणे शक्य नसल्याचा दावा वकील करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चोक्सी गेल्या वर्षी अँटिग्वा आणि बारबुडा येथून कॅन्सरच्या उपचारासाठी बेल्जियममध्ये आला होता. हे राजकीय प्रकरण असून (भारतीय तुरुंगात) मानवी स्थिती चांगली नाही, असा युक्तिवादही अग्रवाल यांनी केला आहे.
असे असले तरी वैद्यकीय उपचारांच्या आधारे चोक्सीच्या बचावामुळे त्याच्या प्रकृतीची तपासणी होईपर्यंत त्याचा प्रवास लांबणीवर पडू शकतो, परंतु त्याचे प्रत्यार्पण थांबणार नाही, असे भारतीय वकिलांचे म्हणणे आहे. चोक्सीबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या सात ते आठ वर्षांपासून तो एका देशातून दुसऱ्या देशात जाऊन चुकीची माहिती देतो, आजाराचे कारण हे कायदेशीर प्रक्रियेपासून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले जाते. चोक्सीला जामीन मिळेपर्यंत बेल्जियमच्या तुरुंगात त्याची नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे. २०२३ मध्ये इंटरपोलने चोक्सीविरुद्धची रेड कॉर्नर नोटीस रद्द केली होती, कारण चोक्सीला भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी अपहरण करण्यात आले होते आणि देशात त्याची निष्पक्ष सुनावणी न होण्याचा धोका होता, असा त्याच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानला गेला. चोक्सीच्या अँटिग्वाच्या नागरिकत्वामुळे त्याचे बेल्जियममधून भारतात प्रत्यार्पण ही किचकट होऊ शकते. त्यामुळे चोक्सीला लगेच भारतात आणला जाण्याची शक्यता कमी दिसते आहे.
गंगाराम केशव म्हांबरे
(लेखक पत्रकार असून विविध
विषयांवर लेखन करतात)
मो. ८३९०९१७०४४