नैसर्गिक आपत्तीसाठी सर्वाधिक कॉल : २०२४-२५ मध्ये २६.५१ कोटींची मालमत्ता वाचवण्यात यश
पणजी : गतवर्षीच्या तुलनेत यंदा अग्निशामक दलाने तिपटीहून अधिक लोकांचे प्राण वाचवले आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये दलाने १९६ जणांचे प्राण वाचवले होते, तर आर्थिक वर्ष २०२४-२५ दरम्यान दलाला ४१७ जणांना जीवदान देण्यात यश आले आहे. २०२३-२४ मध्ये दलाने ३३.३५ कोटी रुपयांची मालमत्ता व ६९२ जनावरांना वाचवले होते. २०२४-२५ मध्ये २६.५१ कोटींची मालमत्ता आणि ७८२ जनावरांना वाचवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार २०२४-२५ मध्ये अग्निशामक दलाला ८९६६ कॉल आले होते.
यातील सर्वाधिक ४१४१ पाऊस किंवा हवामान विषयक आपत्तीसाठी होते. तर आगी संबंधित २६७६, अन्य आपत्कालीन २०६६, जलविषयक ५५ तर दरड कोसळणे व अन्य गोष्टींसाठी २८ कॉल्स होते.
तालुकानिहाय पाहता बार्देशमधून सर्वाधिक १४९० कॉल्स आले होते. सासष्टी १३१७, तिसवाडीतून १२०४, फोंड्यातून ११३५, डिचोलीतून ८२७, सत्तरीतून ६७९, पेडण्यातून ६१८ कॉल्स आले होते.
या कालावधीत विविध आपत्कालीन घटनेत सुमारे १४.१६ कोटींच्या मालमत्तेचे नुकसान झाले. या दरम्यान राज्यातील विविध आगीच्या व अन्य आपत्कालीन घटनात १२४ व्यक्ती आणि ५७ जनावरांचा मृत्य झाला.
मागील आर्थिक वर्षात अग्निशामक दलाला पाऊस किंवा हवामान संबधित दुर्घटांनासाठी ४१४१ कॉल्सपैकी सर्वाधिक ४३८ कॉल हे डिचोली केंद्रात आले होते. त्यानंतर वाळपई स्थानकात ४२४ कॉल्स आले होते.
जंगल क्षेत्रात आगीसाठी १८५ कॉल
मिळालेल्या माहितीनुसार २०२४-२५ जंगल भागातील आगी बाबत १८५ कॉल आले होते. यातील सर्वाधिक ३९ कॉल डिचोली केंद्रात आले होते. वरील कालावधीत वाळलेल्या गवताला लागलेल्या आगीबाबत १३२८, कचरा किंवा भंगार अड्ड्याच्या आगीसाठी १७७, निवासी भागातील आगीसाठी १६९ तर विद्युत उपकरणे संबंधी आगीसाठी १४८ कॉल आले होते.