कृत्रिमरीत्या पिकवल्याच्या संशयावरून म्हापशात ८ लाखांचा आंबा जप्त
म्हापसा : येथील म्हापसा मार्केट सब यार्डमध्ये कृत्रिमरीत्या पिकवल्या जाणाऱ्या आंबा व केळी विक्री घाऊक दुकानांवर अन्न व औषधे प्रशासनाने छापा टाकून सुमारे ८ लाखांचा माल जप्त केला. यामध्ये १८० पेट्या आंबा व ४५० किलो केळींचा समावेश असून तीन दुकाने बंद करण्यात आली.
आंबा व केळीसह अजून चार फळांचे नमुने एफडीएच्या अधिकाऱ्यांनी गोळा केले असून ते रासायनिक अवशेष विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या अहवालानंतर संबंधित विक्रेत्यांवर पुढील कारवाई केली जाणार आहे.
सोमवारी १४ रोजी अन्न व औषधे प्रशासनाच्या संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर गोवा अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी राजाराम पाटील, लेनिन डिसा, अमित मांद्रेकर व सफिया खान या पथकाने शिवोली येथील स्थानिकांच्या सात आंब्याच्या विक्री दुकानांची पाहणी केली व नमुने चाचणीसाठी पाठवले आहेत.
त्यानंतर एफडीएच्या या पथकाने म्हापसा सब यार्डमधील आठ आंबा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानांची तपासणी केली आणि विविध प्रकारच्या आंब्यांच्या जातीचे २४ नमुने घेण्यात आले. तसेच इतर चार फळांचे नमुने देखील घेण्यात आले. तपासणीवेळी दोन दुकानांमध्ये आंब्याच्या क्रेटमध्ये इथिलीन या रसायनाच्या संशयास्पद पिशव्या आढळून आल्या.
त्यामुळे हा सुमारे २२०० डझन आंबा जप्त करण्यात आला. इथिलीन राईपनर ही इथिलीन रसायन वापरून कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरली जाणारी एक पद्धत आहे. या पद्धतीमुळे फळे आणि भाज्यांची पिकण्याची प्रक्रिया जलद होते.
आंब्याच्या १८० क्रेट जप्त
म्हापसा सब यार्डमध्ये आम्हाला तीन दुकानांमध्ये संशयास्पद रसायनाच्या पिशव्या आढळल्याने आम्ही आंब्याच्या १८० क्रेट जप्त करून गोदामात ठेवल्या आहेत. नमुन्यांचा चाचणी अहवाल आल्यावर पुढील योग्य ती कारवाई केली जाईल. शिवाय सब यार्ड मधील एका रेस्टॉरन्टच्या तपासणीवेळी काही विसंगती आढळल्या आहेत. नियमांचे पालन करत २४ तासांच्या आत सुधारणा करण्याचे निर्देश संबंधित मालकाला दिले असल्याचेही वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी राजाराम पाटील यांनी सांगितले