जयवंत दळवींचे 'पुरुष' नाटक पाहिल्यानंतर दोन दिवस सर्वत्र चर्चा चालू आहे ती कला अकादमीत ऐनवेळी बिघडलेल्या प्रकाश यंत्रणेचीच. काहींना यात निर्मिती संस्थेचीही चूक असल्याचे वाटत असले तरी कला अकादमीला त्यापासून पळ काढता येणार नाही.
गोव्याची शान म्हणून कला अकादमी संकुलाची ओळख आजही टिकून आहे. पण ही ओळख कायमच पुसून टाकण्याचा कोणी निर्धार केला असेल आणि त्याकरिता कोणी वावरत असेल तर त्यांना रोखण्याचे काम केवळ कलाकार आणि मायबाप प्रेक्षक यांनाच करता येईल, असे वरवर वाटत असले तरी मागील वर्ष दोन वर्षांत त्या आघाडीवरही कमी प्रयत्न झाले आहेत असे म्हणता येणार नाही. पण तेही अपुरे ठरले आहेत, असे परवा रविवारी तेथे जयवंत दळवी यांचे 'पुरुष' हे गाजलेले नाटक पाहताना आमच्यासारख्या कलासक्त प्रेक्षकांनी जी काही परिस्थिती अनुभवली त्यावरून निश्चितच म्हणता येईल. जयवंत दळवी हे गोवेकरांचेही एक आवडते लेखक आणि नाटककारही. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचेच एक काळ बरेच गाजलेले 'पुरुष' हे नाटक पुन्हा रंगमंचावर आणण्याचे काम प्रथितयश कलाकार शरद पोंक्षे आणि राजन ताम्हाणे आदि मंडळीने केल्यानंतर साहजिकच मुंबईत या नाटकास तुफान प्रतिसाद मिळाला. अशी नाटके गोवेकर प्रेक्षकांसमोर सादर केल्याशिवाय मुंबईतील कोणीही निर्माता आपले नाटक यशस्वी ठरल्याचा दावा क्वचितच करतो. या नाटकाचेही असेच झाले आणि पन्नासावा प्रयोग आपल्या कला अकादमीत योगायोगाने का होईना गोमंतकीय नाट्यरसिकांसमोर सादर करण्याची संधी त्यांना मिळाली. पण ७०-७५ कोटी रुपये खर्चून नूतनीकरण केलेल्या आपल्या कला अकादमीत सध्या असा एखादा प्रयोग कमी अधिक प्रमाणात विचका न होता पार पडणे म्हणजे तो प्रयोग सादर करणाऱ्यांच्या नशिबावरच अवलंबून असते, असे म्हटले जाते. जयवंत दळवींचा 'पुरुष' त्याबाबतीत असाच कमनशिबी ठरला.
कला अकादमीत एखाद्या नाटकाचा प्रयोग वा सांगीतिक कार्यक्रम वेळीच सुरू करायचा झाल्यास बऱ्याच वेळा नशिबाच्या हवाल्यावरच अवलंबून रहावे लागते. गोवा मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या 'कल्पवृक्ष कन्येसाठी' या सांगीतिक कार्यक्रमावेळी असो वा नुकत्याच सादर करण्यात आलेल्या 'जर तरची गोष्ट' या नाट्यप्रयोगाच्या वेळीही त्याचा कटू अनुभव आम्ही घेतलेला आहे आणि तेथील एकूण सदोष व्यवस्थेवर लिहिलेही आहे, पण शेवटी लक्षात कोण घेतो? कला अकादमीचे कार्यकारी मंडळच मागील तीनेक वर्षे अस्तित्वातच नसेल तर या सगळ्याच बाबतीत सुसूत्रता येण्याची अपेक्षा कोणी व का बाळगावी? 'पुरुष' नाट्यप्रयोग सुदैवाने वेळीच सुरू झाला आणि दिलेल्या वेळेत नाट्यगृहातील सीटवर आसनस्थ झालो, तेव्हा बराच दिलासा मिळाला. पण कुठचे काय अर्धा पाऊण तासातच नाट्यगृहातील प्रकाश योजना 'दांडिया' खेळायला लागली आणि पुढे जे काही घडले ते मागील चार पाच दशकांत नाट्यरसिक या नात्याने कधीच अनुभवले नव्हते, म्हणून त्याची अधिक खंत वाटली. 'पुरुष' हे जयवंत दळवी यांचे एक जबरदस्त ताकदीचे, रसिक प्रेक्षकांना बसल्या जागी खिळवून ठेवणारे नाटक असल्याने प्रेक्षकांनी नाट्यगृहात ही गर्दी केलेली, पण नाटक ऐन रंगात येत असतानाच प्रकाश योजनेतील दोष उघड झाले आणि नाटक पुढे चालू ठेवणे निर्मात्यांना अशक्य झाले. कला अकादमीतील सदोष यंत्रणेसाठी आता कोणालाही नव्याने सांगायची गरज नसल्याने प्रेक्षकांनीही कला अकादमीच्या नावाने ओरड सुरू करावी, हे अपेक्षितच होते आणि नेमके झालेही तसेच. कला अकादमीची यात नेमकी काय चूक होती वा नाटकाच्या निर्मात्यांच्या बेफिकिरीपणा त्यांना नडला काय, हा आता चर्चेचा विषय असला तरी अत्यंत महागडी तिकिटे खरेदी करून नाटकाचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या रसिकांचा रसभंग होऊ नये याकरिता सर्व ती दक्षता घेणे जसे कला अकादमीचे काम होते, तशीच ती निर्मात्यांचीही जबाबदारी होती. पण तसे झाले नाही आणि एका चांगल्या नाट्यप्रयोगाचा विचका व्हावा याचे वाईट वाटते. कला अकादमी नाट्यगृहातील ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था यंत्रणेत सुधारणा घडवून आणण्यासाठी बराच वाव असताना त्याकडे दुर्लक्ष का केले जाते, या प्रश्नाचे उत्तर लाख वेळा विचारूनही दिले जात नाही आणि ते मिळण्याचीही शक्यता नाही. कला अकादमीचे व्यवस्था पाहणारा येथे कोणी आहे काय, या शरद पोंक्षे यांनी रंगमंचावरून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर कोणी देऊ शकला नाही, तेव्हा कला अकादमीचे कार्यकारी मंडळ मग नेमके काय करते असाही प्रश्न अनेकांनी केला. कला अकादमीचे कार्यकारी मंडळ मागील तीनेक वर्षे अस्तित्वातच नसल्याची माहिती त्यातूनच समोर आली आणि तोच चर्चेचा विषय बनला. कला अकादमी ही संस्था गोव्याचे भूषण असल्याचे आपण छाती पुढे करून सांगत असतो, पण याच संस्थेला कारभार चालवण्यासाठी तीनेक वर्षे कार्यकारी मंडळ का नसावे यामागील इंगित कळायला मार्ग नाही.
कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री या नात्याने गोविंद गावडे यांनी कलेच्या क्षेत्रात केलेल्या कार्याबाबत खूप काही बोलले जाते. त्यांचा उत्साहही दांडगा आहे यात संदेह नाही, पण कला अकादमीसारख्या संस्थेला मागील काही वर्षांपासून जो गंभीर असा आजार जडला आहे त्यातून बाहेर काढण्यासाठी काहीच प्रयत्न का होत नाहीत, या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्यांच्यासाठी ती भूषणावह अशी बाब म्हणता येणार नाही. कला अकादमीचे नूतनीकरण हा विषयच कला आणि संस्कृती मंत्री वा सरकारसाठी अप्रिय असल्याचे जाणवते, तेव्हा त्यावर चर्चा होणे स्वाभाविकच ठरते. त्यातच भर म्हणून जयवंत दळवी यांच्या 'पुरुष' या नाट्यप्रयोगाच्या सादरीकरणाच्या निमित्ताने आलेल्या कटू अनुभवातून मुंबई - पुण्यासारख्या शहरात नेमका कोणता संदेश जाईल, याचाही अंदाज आताच बांधता येईल. शरद पोंक्षे, स्पृहा जोशी, अविनाश नारकर आदि दिग्गज कलाकारांच्या अप्रतिम अभिनयाने 'पुरुष' हे नाटक रसिक प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहणार असले तरी जयवंत दळवींचे हे नाटक पाहिल्यानंतर दोन दिवस सर्वत्र चर्चा चालू आहे ती कला अकादमीत ऐनवेळी बिघडलेल्या प्रकाश यंत्रणेचीच. काहीना यात निर्मिती संस्थेचीही चूक असल्याचे वाटत असले तरी कला अकादमीला त्यापासून पळ काढता येणार नाही. या गोष्टी भविष्यात कशा टाळता येतील आणि कला अकादमीची नाहक बदनामी होऊ नये यासाठी योग्य ती पावले विनाविलंब उचलणे ही काळाची गरज आहे.
वामन प्रभू, (लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, राजकीय तसेच क्रीडा विश्लेषक आहेत) मो. ९८२३१९६३५९