जांबावलीच्या शिगमोत्सवात चिनू आणि मनू आपल्या वडिलांसोबत गेले होते. रंगांची उधळण आणि गुलालाच्या वर्षावात ते दोघेही खूप आनंदले. गर्दी वाढत असल्यामुळे चिनू आणि मनूचे वडील त्यांना घेऊन कसेतरी गाडीजवळ पोहोचले. पाणी पिऊन झाल्यावर चिनूची नजर जवळच्या गोशाळेकडे गेली.
“अरे वा मनू, कितीतरी गाई आहेत बघ!” चिनू कुंपणाच्या जवळ जात म्हणाला.
“अरे चिनू, तिकडे बघ, छोटी छोटी गोंडस वासरेसुद्धा आहेत!” मनू उत्साहाने म्हणाला.
दोघेही कुंपणाजवळ उभे राहून गोशाळेतील दृश्य न्याहाळू लागले. आत दावणीला बांधलेल्या काही गाई होत्या. एका बाजूला मोकळी वासरे खेळत होती, तर दुसऱ्या बाजूला बैल बांधलेले होते. आणखी एका बाजूला मोठे शिंग असलेले दोन-चार बैल वेगळे बांधले होते. हे पाहून चिनू आणि मनूला खूप कुतूहल वाटले.
“बाबा, ह्या सगळ्या गाई-म्हशी इथे का आहेत?” चिनूने वडिलांना विचारले.
त्यावर त्याचे वडील म्हणाले, “अरे बाळांनो, याला गोशाळा म्हणतात. आता बघून झाले असेल तर पटकन गाडीत बसा. मी तुम्हाला वाटेत सगळी माहिती देतो.”
सगळे गाडीत बसले आणि मडगावकडे निघाले.
चिनूचे वडील म्हणाले, “चिनू आणि मनू, ही जांबावली गावात असलेली गोशाळा आहे. गोशाळा म्हणजे गायी-गुरांना सुरक्षित ठेवण्याची आणि त्यांची काळजी घेण्याची जागा. ज्या लोकांना काही अडचणींमुळे किंवा इतर कारणांमुळे आपल्या जनावरांची देखभाल करणे शक्य नसते, ते लोक आपल्या गायी-गुरांना येथे आणून सोडतात. तसेच, अपघातात जखमी झालेल्या किंवा लोकांनी सोडून दिलेल्या गायी-गुरांचीही येथे काळजी घेतली जाते.”
मनूने विचारले, “पण काका, त्यांना खायला-प्यायला कोण देतं?”
चिनूचे वडील म्हणाले, “अरे, त्यांच्या देखरेखीसाठी खास माणसे ठेवलेली असतात. याशिवाय, काही लोक स्वतःहून गोमातेच्या सेवेसाठी या गोशाळेत येतात. अनेक लोक सणा-उत्सवांमध्ये किंवा शुभ कार्यांमध्ये या गोशाळेला दान देतात आणि त्यातूनच या गोशाळेचा खर्च चालवला जातो.”
बाबांचे बोलणे ऐकून चिनू आणि मनूचे कुतूहल आणखी वाढले.
चिनू म्हणाला, “पण बाबा, त्या छोट्या वासरांना वेगळे का ठेवले आहे? त्यांना त्यांच्या आईजवळ का नाही ठेवलं?”
“अरे चिनू, जर त्यांना आईजवळ ठेवले तर ते दिवसभर तिचे दूध पीत राहतील आणि मस्ती करतील. जसे तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर खेळता आणि बागडता, तसेच ती वासरेही एकमेकांबरोबर खेळून आनंदात राहतात.”
मनूने विचारले, “आणि त्या दोन-चार बैलांना वेगळे का बांधले होते काका?”
“अरे बाळांनो, ते लांब शिंगांचे बैल जरा मस्तीखोर आहेत. त्यांच्यामुळे इतर गुरांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना वेगळे ठेवले आहे. आणि तो एक बैल तू पाहिलास ना? जो शिंगाने माती उकरत होता. त्याची शिंगे पाहिलीस ना? किती लांब होती ती!” चिनूच्या वडिलांनी सांगितले.
चिनू आणि मनूला गोशाळेची माहिती खूप आवडली.
“पण बाबा, आपण कधी जाणार आहोत त्या गोशाळेला?” चिनूने विचारले.
यावर त्याचे वडील हसून म्हणाले, “चिनू आणि मनू, रविवारी तुम्हाला शाळेला सुट्टी आहे. त्या दिवशी आपण परत जांबावलीला जाऊ. छानपैकी गोशाळा पाहू. तिथल्या लोकांबरोबर बोलू, गोशाळेबद्दल आणखी माहिती घेऊ आणि मग मंदिरात जाऊन दामोदराचे दर्शन घेऊ. आणि जवळच्या हॉटेलमध्ये चपाती-भाजी खाऊ आणि कसाय पिऊ.”
बोलता बोलता ते कधी मडगावात पोहोचले, हे त्यांना कळलेच नाही. मनूला आणि त्याच्या वडिलांना त्यांच्या बिल्डिंगच्या गेटजवळ सोडून चिनू आणि त्याचे वडील घरी परत आले. घरी आल्यावर चिनूने आंघोळ केली आणि आईने दिलेले गरम दूध पिऊन तो आजी-आजोबांबरोबर गुलालाच्या गप्पांमध्ये रंगून गेला. थोड्या वेळाने आईने त्याला गरमागरम मासोळीचे जेवण वाढले. आजी-आजोबांसोबत जेवण झाल्यावर चिनू शांतपणे झोपला. आज तो खूप आनंदी होता आणि स्वप्नात त्याला फक्त गोशाळाच दिसत होती.
शर्मिला प्रभू
आगाळी, फातोर्डा-मडगाव