चंदनाचा शरीराला स्पर्श होताच थंड वाटतं, त्याशिवाय चंदनाचा सुगंध दरवळत राहतो आणि कसं मस्त वाटतं. चंदन गुणाने थंड असल्यामुळे त्याचा उन्हाळ्यात उपयोग होतो.
उन्हाळ्यात उन्हाचा, उष्णतेचा त्रास होत असला तरी या ऋतूत देवाने आपल्यासाठी अनेक छान छान गोष्टी दिल्या आहेत. या ऋतूत येणारी रसदार फळे-फळांचा राजा आंबा, काजू, करवंद, जांभूळ, जाम इ. ऊसाचा रस, रंगीबेरंगी सुगंधी फुले इ. एकदा ही फळं पिकली आणि आपण खायला सुरुवात केली, की मग आपल्याला उष्णतेचा खूप त्रास वाटत नाही. तोपर्यंत मात्र उकाडा कमी करण्यासाठी काय करू काय नको असं होतं. त्याचसाठी आपण उकाडा कमी करण्याचे नैसर्गिक उपाय एक एक करून जाणून घेत आहोत.
उन्हाळा सुरू झाला की सगळ्यात जास्त त्रास होतो तो घामाचा. खूप घाम येतो आणि मग घामोळेही त्रास करायला लागते. म्हणूनच घामोळ्यासाठी आज एक सोपा उपाय सांगते.
देवपूजेत आपण देवाला स्नान घातलं की मंत्र म्हणत सुगंधी चंदन मूर्तीला लावतो. या चंदनाचा दरवळ आला की किती छान वाटतं. जसं आपण देवाला चंदन लावतो, तसंच उन्हाळ्यात आंघोळ झाली की शरीर नीट पुसून कपाळाला चंदनाचा टिळा लावावा.
ज्यांना खूपच उष्णतेचा त्रास होतो, उन्हात जाऊन आल्यावर डोकेदुखी होते त्यांनी चंदन उगाळून पूर्ण कपाळाला चंदनाचा लेप लावावा.
शरीराच्या ज्या भागावर घामोळं येतं उदा. मान, गळा, पाठ तिथे सुद्धा चंदन लावावं.
चंदनाचा शरीराला स्पर्श होताच थंड वाटतं, त्याशिवाय चंदनाचा सुगंध दरवळत राहतो आणि कसं मस्त वाटतं. चंदन गुणाने थंड असल्यामुळे त्याचा उन्हाळ्यात उपयोग होतो. आणि त्याच्या थंड गुणामुळेच उष्णतेच्या आजारांमध्ये जी आयुर्वेद औषधं वापरली जातात त्यात सुद्धा चंदन घातलेलं असतं. या उन्हाळ्यात रोज देवाला चंदन अर्पण केलं की थोडं चंदन स्वतःच्या शरीराला सुद्धा लावा आणि उन्हाळ्याच्या त्रासांपासून स्वतःच्या शरीराचे रक्षण करा.
वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य