शालान्त मंडळाचा आदेश
पणजी : इतर राज्यांतील शालान्त मंडळांतून दहावी किंवा अकरावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी जर गोव्यात अकरावी किंवा बारावी वर्गात प्रवेश घेण्यास इच्छुक असतील, तर त्यांनी गोवा शालान्त मंडळाचे पात्रता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.
गोवा शालान्त मंडळाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले असून पात्रता प्रमाणपत्राशिवाय इतर मंडळातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाऊ नये असे सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांना सूचना दिल्या आहेत. तसेच, ज्या विद्यार्थ्यांनी आधीच प्रवेश घेतले आहेत, त्यांची नोंदणी १५ जूनपूर्वी शालान्त मंडळाकडे करण्यात यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रक्रिया
विद्यार्थ्यांनी www.gbshe.in या वेबसाईटवर जाऊन आवश्यक माहिती आणि कागदपत्रे सादर करावी. त्यासाठी ४०० रुपये शुल्क भरावे लागेल. प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच त्यांचा प्रवेश मान्य केला जाईल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.ही सूचना गोव्यातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी लागू आहे.