नगरविकास मंत्र्यांच्या अनुपलब्धतेमुळे कार्यक्रम ढकलला पुढे
म्हापसा नगरपालिकेचा बहुउद्देशीय व्यापारी संकुल प्रकल्प. (उमेश झर्मेकर)
प्रतिनिधी । गोवन वार्ता
म्हापसा : येथील नूतनीकृत केलेल्या काम्र म्युनिसिपल दी बार्देश या जुन्या नगरपालिका वारसा इमारतीसह नव्या पालिका व्यापारी संकुलाच्या लोकार्पणाची तारीख एेनवेळी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. नगरविकास मंत्री विश्वजीत राणे हे गोव्याबाहेर गेल्यामुळे सोमवार, २ मे रोजी होणारा हा कार्यक्रम दुसर्यांदा पुढे ढकलावा लागला आहे.
लोकार्पण सोहळा पुढे ढकलल्यामुळे म्हापसा तसेच बार्देशवासीयांची ग्रंथालयाची प्रतीक्षा लांबणीवर पडली आहे. म्हापसा पालिकेचे ग्रंथालय बंद असल्याने मागील सात वर्षे लोकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. २३ एप्रिल रोजीचा हा कार्यक्रम देखील पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे केंद्र सरकारने देशभर तीन दिवस दुखवटा जाहीर केल्यामुळे पुढे ढकलावा लागला होता. या दोन्ही कार्यक्रमांची पूर्वतयारी पालिकेने केली होती. २ मे रोजीचा कार्यक्रम हा ऐनवेळी म्हणजेच काही तासांच्या अगोदर रद्द करण्यात आला. त्यामुळे कार्यक्रमाची केलेली तयारी आणि खर्च वाया गेला आहे. दोन्ही इमारती फुलांनी सजवण्यात आल्या होत्या. शिवाय मंडपही घातला होता.
प्रकल्पावर ३.८० कोटी रुपये खर्च
वारसा तथा आताईद ग्रंथालय इमारतीच्या नूतनीकरणाचे काम डिसेंबर २०२२ मध्ये जीसूडातर्फे हाती घेतले होते. परंतु त्यावेळी राजकीय मतभेदामुळे या प्रकल्पाचे काम पायाभरणीच्या कार्यक्रमाविनाच हाती घ्यावे लागले होते. या प्रकल्पावर ३.८० कोटी रुपये खर्च झाला आहे.
प्रकल्पाचे प्रकरण उच्च न्यायालयात
म्हापसा पालिका व्यापारी संकुलाचे बांधकाम जीसूडातर्फे २०.५९ कोटी रुपये खर्चून करण्यात आले. बहुउद्देशीय प्रकल्पाचे काम सात वर्षांनी (सप्टेंबर २०१९) पूर्णत्वास आले आहे. सध्या एका जमीन मालकाने आपल्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा दावा केल्यामुळे या प्रकल्पाचे प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे.
नगरविकास मंत्र्यांना तातडीने गोव्याबाहेर जावे लागल्याने पालिकेच्या नूतनीकृत वारसा इमारत तसेच व्यापारी संकुल प्रकल्पाचे लोकार्पण आम्हाला पुढे ढकलावे लागले. लवकरच सर्वांना विश्वासात घेऊन नवीन तारीख निश्चित केली जाईल.
- प्रिया मिशाळ, नगराध्यक्ष, म्हापसा