आसगाव पठारावरील कचरा झाकण्यासाठी निविदा

प्रदूषण‌ नियंत्रण मंडळाच्या निर्देशानंतर पालिकेचे पाऊल


03rd June, 01:16 am
आसगाव पठारावरील कचरा झाकण्यासाठी निविदा

प्रतिनिधी । गोवन वार्ता
म्हापसा : आसगाव पठारावरील सर्व कचरा एकाच ढिगार्‍यात एकत्रित करून तो ताडपत्रीने झाकण्यासाठी म्हापसा पालिकेने १८.४५ लाखांची निविदा काढली आहे. पावसाळ्यात कचरा भिजून कचरायुक्त पाणी जमिनीत झिरपू नये, यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा कचरा व्यवस्थित झाकण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार चेन एक्सकॅव्हेटर (मशीन) व ताडपत्रीसाठी पालिकेने ही निविदा जारी केली आहे.
गेल्या दि. १० ऑक्टोबर २०२४ रोजी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (जीएसपीसीबी) आसगाव कोमुनिदादचे पदाधिकारी व पालिकेच्या उपस्थितीत आसगाव पठारावरील पालिकेकडून कचरा टाकला जाणार्‍या जागेची पाहणी केली होती. त्यानंतर पालिकेला कचरा न टाकण्याचे निर्देश दिले होते. मात्र याचे पालन करण्यास पालिकेला अपयश आले. नंतर हा प्रकार आसगाव कोमुनिदादने जीएसपीसीबीच्या निदर्शनास आणून दिल्यावर आसगाव कोमुनिदाद मालमत्तेवर बेकायदेशीरपणे कचरा टाकल्याबद्दल पालिकेला नोटीस बजावली होती. यासंबंधी प्रदूषण मंडळाकडे पालिका अधिकारी, गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ, उपजिल्हाधिकार्‍यांसमक्ष वैयक्तिक सुनावणी झाली. पालिकेला आसगाव जागेवर कचरा टाकणे थांबवणे, टाकलेला कचरा एकाच ढिगार्‍यात जमा करणे व कचरायुक्त पाणी जमिनीत झिरपण्यापासून रोखण्यासाठी हा कचरा ताडपत्रीने (टारपॉलिन शीटने) झाकणे किंवा एका महिन्याच्या आत हा एकत्रित कुचेली कचरा प्लांटस्थळी हलवावा, असा आदेश दिला होता.
या आदेशावर पालिकेने गेल्या महिन्यात झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत चर्चा केली होती. त्यानुसार पालिकेने १८ लाख ४५ हजार रूपये रकमेच्या दोन निविदा काढून इच्छुक पक्षांकडून अभिप्राय मागवला आहे. हे ३० दिवसांचे काम आहे. त्यात थ्रीडीएक्स चेन एक्सकॅव्हेटर पुरवण्यासाठी अंदाजे ४.०२ लाख रुपये किमतीच्या, तर ताडपत्रीचे आवरण घालून कचरा झाकण्यासाठी अंदाजे १४.४३ लाख रुपये किमतीच्या निविदेचा समावेश आहे.


आम्ही आसगाव पठारावरील कचरा एकत्र करून तो झाकण्यासाठी भाड्याने चेन एक्सकॅव्हेटर मशिन, तसेच कचर्‍यावर झाकण्यासाठी ताडपत्री खरेदीची निविदा काढली आहे. पावसाळ्यात कचरायुक्त पाणी झिरपू नये म्हणून हा तोडगा आहे.
- प्रिया मिशाळ, नगराध्यक्ष, म्हापसा