केएलई विद्यापीठाचा आज पदवीदान समारंभ

डॉ. श्रीखंडे यांचा होणार डॉक्टरेटने सन्मान; १,८४४ पदव्यांचे वितरण


03rd June, 01:12 am
केएलई विद्यापीठाचा आज पदवीदान समारंभ

पत्रकारांशी बोलताना डॉ. प्रभाकर कोरे. सोबत डॉ. नितीन गणगणे आणि डॉ. गणाचारी.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
बेळगाव : केएलई उच्च शिक्षण आणि संशोधन अकॅडमी (केएलई अभिमत विद्यापीठ), बेळगावच्या वतीने मंगळवारी केएलईएस कन्वेन्शन सेंटरमध्ये पदवीप्रदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात एकूण १,८४४ पदव्या वितरित करण्यात येणार आहेत. संस्थेच्या माजी विद्यार्थी आणि ख्यातनाम सर्जन डॉ. श्रीखंडे यांना डॉक्टर ऑफ सायन्स (D.Sc.) (Honoris Causa) ही सन्माननीय पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
या वर्षीच्या पदव्या वितरणामध्ये ४० पीएच.डी., २९ पदव्युत्तर डॉक्टरेट पदव्या (DM/M.Ch.), ६६० पदव्युत्तर, १,०८० पदवी, ९ पदव्युत्तर डिप्लोमा, ११ डिप्लोमा, ४ फेलोशिप आणि ११ प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रावीण्याची दखल घेऊन ३५ गुणवंत विद्यार्थ्यांना ४६ सुवर्णपदके प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये २८ मुली आणि ७ मुले आहेत. यंदाच्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये केएलई श्री बी.एम. कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयाच्या डॉ. श्वेता राजशेखर गोरे यांना बीएएमएस शाखेत चार सुवर्णपदके प्राप्त झाली असून, ही यूजी स्तरावरील सर्वाधिक पदके आहेत. जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. करुमुडी प्रत्युषा यांना जनरल मेडिसिनमध्ये पीजी स्तरावर तीन सुवर्णपदके प्रदान करण्यात येणार आहेत.
या प्रसंगी डॉ. कोरे म्हणाले, विद्यापीठ गुणवत्तापूर्ण शिक्षण, प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान-आधारित अध्यापनावर भर देत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना आरोग्य सेवा क्षेत्रातील सतत बदलणाऱ्या गरजांसाठी सक्षम करता येईल. सर्जिकल ऑन्कोलॉजी क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ आणि टाटा मेमोरियल रुग्णालयाचे उपसंचालक व कॅन्सर सर्जरी विभागप्रमुख डॉ. श्रीखंडे यांना यंदाच्या सन्माननीय डॉक्टरेट पदवीने गौरवण्यात येणार आहे. जीआय व एचपीबी (गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि यकृत-मार्गाशी संबंधित) कॅन्सरवरील त्यांच्या विशेष कार्यासाठी ते ओळखले जातात. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ६०० हून अधिक व्याख्याने आणि भाषणे दिली आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. एम. एस. गणाचारी यांनी दिली.
समारंभाला केंद्रीय मंत्री नड्डा राहणार उपस्थित
समारंभाचे मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा रसायन व खते मंत्री जगतप्रकाश नड्डा उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केएलई संस्था आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रभाकर कोरे असतील.