देशाचे मेमधील जीएसटी संकलन १ लाख ४९ हजार कोटींहून अधिक
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्याच्या मे महिन्याच्या जीएसटी संकलनात यंदा १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा मे महिन्यात जीएसटीद्वारे एकूण ५८७ कोटी रुपये महसूल गोळा करण्यात आला आहे. गतवर्षीच्या मे महिन्यात जीएसटी संकलन ५१९ कोटी रुपये होते. संपूर्ण देशाचा विचार करता मे महिन्यात जीएसटी संकलन १ लाख ४९ हजार कोटी रुपयांच्या वर गेले आहे. यंदाचे देशाचे जीएसटी संकलन मागील वर्षीच्या मे महिन्यापेक्षा १३.६६ टक्क्यांनी जास्त आहे.
केंद्रीय अर्थ खात्याने जारी केलेल्या अहवालानुसार, एप्रिल आणि मे २०२५ मध्ये जीएसटी रूपाने केंद्राने गोव्यातून ३८५ कोटी, तर राज्याने ४८९ कोटी रुपये संकलन केले आहे. वरील कालावधीत जीएसटीसह अन्य स्वरूपातून एकूण ५१८ कोटी रुपये जमा झाले आहेत. गतवर्षीच्या एप्रिल आणि मेच्या तुलनेत यंदा राज्यातील जीएसटी संकलानातील वाढ ८.४ टक्के झाली आहे.
एप्रिल आणि मे २०२५ मध्ये केंद्र सरकारने इंटिग्रेटेड जीएसटी (आयजीएसटी) मधून गोव्याला दुसऱ्या टप्प्यातील ७४० कोटी रुपयांचा वाटा दिला आहे. मागील वर्षी याच दोन महिन्यांत हा वाटा ७६६ कोटी रुपये होता. यंदा या वाट्यात किंचित घट झाली आहे. पहिल्या टप्प्यात गोव्याला एप्रिल आणि मे २०२४ मध्ये ४७३ कोटी, तर यंदा याच दोन महिन्यांत ४८९ कोटी रुपयांचा वाटा देण्यात आला होता. गतवर्षीच्या तुलनेत पहिल्या टप्प्यातील वाटा ३ टक्क्यांनी वाढला आहे.
महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी संकलन
केंद्रीय अर्थ खात्याने जारी केलेल्या अहवालानुसार, मे महिन्यात महाराष्ट्रातून सर्वाधिक ३१ हजार ५३० कोटी रुपये जीएसटी संकलन झाले. यानंतर कर्नाटकमधून १४ हजार २९९ कोटी रु. तर तामिळनाडूतून १२ हजार २३० कोटी रुपये जीएसटी संकलन झाले. देशात मिझोरम मधून सर्वात कमी २९ कोटी रुपये जीएसटी संकलन झाले. यानंतर नागालँडमधून ६५ कोटी, तर त्रिपुरातून ९२ कोटी रुपये जीएसटी जमा करण्यात आला. केंद्रशासित प्रदेशात दिल्लीतून सर्वाधिक १० हजार ३६६ कोटी रुपये जीएसटी संकलित करण्यात आला.