केपे : कष्टी-काले येथील पिग फार्ममुळे गावातील नाला दूषित झाला असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे हा पिग फार्म तात्काळ बंद करावा किंवा दुसऱ्या ठिकाणी हलवावा, अशी जोरदार मागणी स्थानिकांनी केली आहे. अन्यथा पंचायतीवर मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
शनिवारी (१ जून) सकाळी यासंदर्भात ग्रामस्थांनी एक विशेष बैठक बोलावली होती. यावेळी सरपंच बाळू गांवकर आणि पंच सदस्यही उपस्थित होते. ग्रामस्थांनी यावेळी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की, फार्म सुरू करताना त्यांना अंधारात ठेवण्यात आले. डुकरांपासून होणाऱ्या घाणीचे सांडपाणी सरळ कष्टी नाल्यात सोडले जात असल्याने पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे. सरपंच बाळू गांवकर यांनीही कबूल केले की, फार्म सुरू करताना पंचायत मंडळास चुकीची माहिती देण्यात आली. फार्ममधील सांडपाण्यासाठी सोकपीट बांधण्यात आली असली तरी ते पाणी थेट नाल्यात जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक अमर नाईक यांनी सांगितले की, कष्टी गावात बहुसंख्य हिंदू समाजाचे वास्तव्य असून, नाल्यात गणपती विसर्जन, सरस्वती पूजन, शिगमोत्सवाचे धार्मिक विधी पार पडतात. अशा पवित्र जागेच्या जवळ डुक्कर पालन चालणे हे अशोभनीय असून, गावापासून केवळ १०० मीटर अंतरावर असलेला हा फार्म गावासाठी घातक ठरत असल्याचे ते म्हणाले. ग्रामस्थांनी पंचायतीने फार्मला दिलेला ना-हरकत दाखला तात्काळ मागे घ्यावा आणि सात दिवसांत फार्म बंद करावा असे स्पष्ट शब्दांत सांगितले असून, असे न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.