रवीनाची गोष्ट

Story: छान छान गोष्ट |
11 hours ago
रवीनाची गोष्ट

रवीना नावाची एक मुलगी होती. ती गोव्यातल्या आंबेडे या गावी राहत असे. ती शाळेत जायची. सुट्टी पडली की ती आजीच्या घरी जायची. एकदा रवीना सुट्टीत आज्जीकडे गेलेली. दुसऱ्या दिवशी ती व तिची आज्जी माई मावशीच्या बाळाच्या बारश्याला गेली. बारश्याला मावशीकडे जाताना वाटेत त्यांना रवीनाची एक लांबची मावशी भेटली. मग काय विचारता! मावशीने रवीनाचे खूप लाड केले. तिचे गालगुच्चे घेतले. तिला दुकानात नेऊन तिला दोन मोठ्ठ्या चॉकलेटी दिल्या.

रवीनाला चॉकलेटी बघून अगदी आनंद झाला. आज्जी आणि ती आता पुन्हा मावशीकडे जायला निघाली. रवीना तर वाटभर नुसता चॉकलेटीचाच विचार करत राहिली. आता मी ह्या एवढ्या मोठ्ठ्या चॉकलेटी खूप दिवस लावून खाणार. आई-बाबा आणि आज्जीला पण थोडा थोडा त्यातला तुकडा देणार. खूप दिवसांनी त्या संपवणार. हा विचार करत करत ती मावशीकडे बारश्याला पोहोचली.

तिकडे खूप माणसं जमली होती. नात्यातली, ओळखीची, अनोळखी माणसं. आज्जीसोबत ती एका खुर्चीवर बसली आणि सगळीकडे पाहू लागली. तिथे एक लहान मुलगी तिला दिसली. तिच्या आजूबाजूलाच ती खेळत होती पण तिचे लक्ष रवीनाकडेच होते. रवीनाच्या हातातल्या चॉकलेटी ती मघापासून बघत होती. काही वेळाने ती रवीनाजवळ आली आणि तिने विचारले, “मला एक चॉकलेट देशील?” रवीनाने पटकन म्हटले, “हो... देते.” आणि असे म्हणून त्या लहान मुलीला खूश करण्यासाठी रवीनाने तिला दोन्ही चॉकलेटी देऊन टाकल्या. 

हे पाहून त्या मुलीला आनंद झाला. तिने दोन्ही चॉकलेटी घेतल्या आणि ती आपल्या आईकडे गेली. तिने रवीनाचा विचारच केला नाही! 

इकडे रवीनाला थोड्या वेळाने खूप दु:ख झाले. दोन्ही चॉकलेटी उगाच दिल्या, एकच द्यायला हवी होती असे वाटून तिला खूपच वाईट वाटले. आपण ठेवलेला विश्वास त्या मुलीने तोडला असे तिला वाटले. रवीनाला वाटत होते एक चॉकलेट ती पुन्हा आपल्याला देणार. पण तसे झाले नाही. त्या दिवशी रवीनाला समजून आले, आपण दुसऱ्याला आपल्याकडच्या सगळ्याच गोष्टी द्यायच्या नाहीत. तर अगोदर थोडे स्वतःसाठी ठेवावे आणि थोडे दुसऱ्यांना द्यावे.


अनया विठ्ठल गावस 
इयत्ता : तिसरी
शाळा : डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, वाळपई