पोलिसांनी कर्तव्य विसरू नये

गोवा पोलिसांनी राजकारण्यांशी असलेली मैत्री कमी केली आणि कर्तव्याकडे जास्त लक्ष दिले तर राज्यातील जनतेला न्याय मिळू शकतो. आलेल्या तक्रारदारांना पोलीस आपलेसे वाटायला हवेत. पोलिसांत तक्रार केली म्हणजे प्रश्न सुटेल, असा त्यांना विश्वास वाटायला हवा.

Story: अग्रलेख |
28th March, 12:10 am
पोलिसांनी कर्तव्य विसरू नये

कॉमेडियन कुणाल कामराने विडंबन गीत गायल्यामुळे मुंबईतील हॅबिटेट स्टुडिओची शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोडतोड केली. या एकूण घटनेवर कुणाल कामराने एका मुलाखतीत एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. विदेशात कोणी तोडफोड केली तर त्याच्या घरी पोलीस येऊन त्याला उचलून घेऊन जातात. भारतात पोलीस कार्यवाहीच होत नसल्यामुळे जाळपोळ, मोडतोड केली जाते. पोलिसांची भीती नसल्यामुळे या गोष्टी होतात, असे त्याचे म्हणणे आहे. त्याचे म्हणणेही बरोबर आहे. दुसऱ्याची मालमत्ता किंवा सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी. त्यांच्याकडून नुकसान झालेली रक्कम वसूल व्हायला हवी. पण तसे होत नाही. राजकारण्यांच्या आदेशानुसार पोलीस काम करू लागल्यामुळे देशात पोलीस आपले कर्तव्यच विसरले आहेत. चांगले अधिकारी सेवेत असले तरीही ते काम करू शकत नाहीत, कारण त्यांना त्यांच्याच खात्याकडून सहकार्य मिळत नाही. त्यातच पोलीस खात्याला एखाद्या धर्माची तळी उचलून धरण्याची सवय जडली तर आणखीच प्रकरण गंभीर होते. पोलिसांच्या चुकीच्या कार्यपद्धतीवर भारतातील सिनेमा उद्योगात चित्रपटांचा, वेबसीरीजचा खच पडलेला आहे. बहुतांश चित्रपटांमध्ये पोलिसांनाच खलनायक करून दाखवले जाते. यातून पोलीस व्यवस्था काही शिकलेली दिसत नाही. 'चांगले पोलिसिंग' सोडून इतर सर्व कामे पोलीस करतात म्हणूनच त्यांच्या कर्तव्यावर अनेकदा प्रश्न उपस्थित होतो. गोवा पोलिसांच्या बाबतीत या गोष्टी सातत्याने घडतात. गेल्या काही वर्षांमध्ये गोवा पोलीस दलात अनेक बदल झाले. वर्षानुवर्षे रखडलेल्या शेकडो पोलिसांना बढत्या मिळाल्या. वेळोवेळी पोलिसांच्या बदल्या होत आहेत. गोव्यातील पोलिसांना पगारही चांगला मिळतो. पण पोलीस कर्तव्यात खरोखरच चांगले आहेत का, हा मात्र नेहमी पडणारा प्रश्न आहे. गुन्ह्यांचा छडा लावण्यात गोवा पोलिसांचा हात कोणी धरू शकत नाही एवढी चांगली कामगिरी आहे. पण त्याच गुन्ह्यांमधील आरोपींना शिक्षा होणे, अर्थात त्यांचे गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण मात्र कमी आहे. 

गोवा पोलिसांनी राजकारण्यांशी असलेली मैत्री कमी केली आणि कर्तव्याकडे जास्त लक्ष दिले तर राज्यातील जनतेला न्याय मिळू शकतो. आलेल्या तक्रारदारांना पोलीस आपलेसे वाटायला हवेत. पोलिसांत तक्रार केली म्हणजे प्रश्न सुटेल, असा त्यांना विश्वास वाटायला हवा. गुन्ह्यांतील आरोपींना बोलावून कित्येकदा पोलीस समझोता करण्याचेच काम 'प्रामाणिक'पणे करतात. गोवा पोलिसांनी आपली प्रतिमा बदलायला हवी. पोलीस अधीक्षक सुचेता देसाई यांनी एक आदेश जारी करत गोवा पोलिसांना पोलीस म्हणून सेवा बजावण्यासाठी काही निर्देश जारी केले आहेत. चांगल्या शब्दांत सर्वांनाच समज दिली आहे. काही पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी आपण पोलीस असल्याचे विसरून गणवेशात नाच-गाणी करतात, ड्युटीवर असताना कार्यक्रमांमध्ये ताल धरतात. सुचेता देसाई यांनी पोलिसांनी आपल्या गणवेशाची गरिमा जपावी यासाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

पोलीस दलाची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी पोलिसांनी गणवेशाच्या शिस्तीचे पालन करण्याचा सल्ला देताना गणवेशात सार्वजनिक व्यासपीठ किंवा रस्त्यांवर सादरीकरण करणे टाळावे. सार्वजनिक संपर्क वाढवण्यासाठी आणि पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी गणवेशधारी पोलिसांनी काम करावे. गणवेशाच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग टाळावा, पोलीस अधिकाऱ्यांनी सादरीकरणातील कथा / संहिता कायदेशीर नियमांनुसार आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी तसेच पोलिसांबाबत संभ्रम निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी असे म्हटले आहे. गोव्यातील काही पोलीस अधिकारी गणवेशातच सार्वजनिक कार्यक्रमात नाचताना यापूर्वी दिसले आहेत. काहीजण मिरवणुकीच्या सुरक्षेसाठी असताना ताल धरतानाचे व्हिडिओ वायरल झाले आहेत. यातून पोलिसांची प्रतिमा खराब होते. कारण कर्तव्य सोडून नको त्या कामांमध्ये पोलीस रुची दाखवतात, असा संदेश लोकांपर्यंत जातो. त्यामुळेच गोव्यातील पोलिसांना देसाई यांनी चांगल्या शब्दांत दम दिला आहे. या गोष्टीची गरज होती. पोलिसांना लोकांप्रती आपली सेवा बजावण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्यांनी लोकांची सुरक्षा, लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. वैयक्तिक जीवनात तुमच्यावर बंधने नसली तरी सार्वजनिक सेवेत असताना तुम्ही सेवेला शोभत नाहीत, अशा गोष्टी करू नयेत.