ताळगावच्या पठारावरील पांढरा हत्ती

या संस्थेला ताळगाव पठारावरचा 'पांढरा हत्ती' म्हटल्यास तो माझ्या मातृसंस्थेचा अपमान ठरणार नाही, कारण पांढरा हत्ती हा फक्त आणि फक्त शोभेचा असतो. त्याचा प्रत्यक्ष कामासाठी काहीही उपयोग नसतो.

Story: विचारचक्र |
28th March, 12:08 am
ताळगावच्या पठारावरील पांढरा हत्ती

गोवा विद्यापीठ म्हणजे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी योजिलेला व गोव्याचे सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री राहिलेले प्रतापसिंह राणे यांच्या कारकिर्दीत प्रत्यक्ष साकार झालेला एक सर्वांगसुंदर शैक्षणिक प्रकल्प‌. विद्यापीठाचा कॅम्पस अतिशय सुरम्य व लोभसवाणा आहे, विद्यापीठाचा कर्मचारी वर्ग नाही. विद्यापीठाचे पुरुष वसतिगृह तर बहुसांस्कृतिक घडामोडींचा संगम आहे, पण विद्यापीठाच्या विभागांमध्ये आंतरविद्याशाखीय संवाद, सुसंवाद व संगम होतातच याची शक्यता फारच कमी असते. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये तुम्हाला मोर, खारूताई, नागोबा, धामण, माळूण, मण्यार, अजगर, काटांदर, ससा, माकड किंवा वानर असे वन्यजीव अचानक भेटतीलच व विभागवार सन्माननीय अपवाद वगळले तर एका तासाच्या लेक्चरला सुमारे पाऊण तासानंतर 'आज लेक्चर नाही, चला घरी' असे सांगायला फिरकणारे प्राध्यापकही तुम्हाला अनेक विभागांत आढळतील. विद्यापीठातील प्रत्येक ब्लॉकमधील सुरक्षारक्षक व प्रत्येक विभागातील चपराशी हे अतिशय नम्र व प्रेमळ असतात, पण प्रत्येक विभागातील चपराशाबरोबर क्लार्कही नम्र असतो / असते हे मात्र फार दुर्मिळ म्हणून अशक्य आहे. काही क्लार्क वा क्लार्किणींना आपल्याला आपल्या आमदाराने 'कामांक लायला' याचा भलताच मद असतो व ते तो 'मदार्क' आपल्या बोलण्यातून क्षणोक्षणी दाखवूनही (की चाखवून?) देतात. विद्यापीठाच्या कोणत्याही विभागात वा अगदी प्रशासकीय इमारतीतही सर्वात दुर्लक्ष करावे अशी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या समस्या. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे यात एक वेगळाच स्वॅग असावा व या दुर्लक्ष करण्याच्या उत्कट कृतीतून विद्यापीठाच्या कर्मचारी वर्गाच्या मेंदूला भरपूर प्रमाणात डोपामाईनचा पुरवठा होत असावा. 

नाताळ साजरा झाल्यावर विद्यापीठाचा हिरवागार कॅम्पस हळूहळू वैराण होत जातो, त्याउलट विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण हे बारा महिने तेरा काळ अगदी जख्ख म्हातारे व वैराण भासते. विलियम वर्डस्वर्थसारखा रोमँटिक कवी जरी इथे आला तरी इथले वातावरण पाहून त्याचे मन हॅम्लेटच्या पात्रासारखे अस्तित्ववादाची शिकार होईल यात शंका नाही. इथे पहिले पाऊल ठेवल्यानंतर व शेवटी काढता पाय घेईपर्यंत विद्यार्थ्यांनी या संस्थेचा अभिमान बाळगू नये, यासाठी इथले कर्मचारी शक्य ते सर्व प्रयत्न करतात. इथल्या वातावरणात एक नकोशी नकारात्मक संवेदना भरून राहिलेली असते. तुम्ही ज्या महाविद्यालयातून आलाय, त्या महाविद्यालयाची आठवण आल्याशिवाय एक दिवस जात नाही. जो मोकळेपणा विद्यार्थी - प्राध्यापक या नात्यात तुम्ही महाविद्यालयात असताना अनुभवता तो मोकळेपणा तुम्ही इथे अनुभवालच याची कोणतीही शाश्वती नसते. 

या संस्थेला ताळगाव पठारावरचा 'पांढरा हत्ती' म्हटल्यास तो माझ्या मातृसंस्थेचा अपमान ठरणार नाही, कारण पांढरा हत्ती हा फक्त आणि फक्त शोभेचा असतो. त्याचा प्रत्यक्ष कामासाठी काहीही उपयोग नसतो. इथल्या समस्या दुर्लक्ष केल्यामुळे व दुरुस्ती न केल्यामुळे वर्षानुवर्षे भिजत राहतात. 

विद्यापीठाला दिलेली स्वायत्तता विद्यापीठाच्या निष्क्रियतेला कारणीभूत तर नाही ना, असा संशय घ्यायला जागा आहे. डॉ. सतिश शेट्ये हे विद्यापीठाला लाभलेले एकमेव गोमंतकीय कुलगुरू होते, त्याआधी व त्यानंतर कोणताही गोमंतकीय कुलगुरू झाला नाही. गोमंतकीय प्राध्यापक तीन त्रिकाळ फक्त स्वतःची नवनवीन वैयक्तिक प्रकाशने व शोधनिबंध छापण्यावर भर देत नाहीत, हे एक मोठे कारण यामागे आहे असे उघडपणे बोलले जाते. 

कोकणी व मराठी विभागांचा अपवाद वगळला तर प्रत्येक विभागात, बिगर गोमंतकीय प्राध्यापक अगदी ठासून भरलेत. याला भाषा व साहित्य तसेच सामाजिक विज्ञान महाशालाही अपवाद नाही. अनेक विभागांत गोमंतकीय विद्यार्थ्यांना पीएचडी कशा मिळू दिल्या जात नाहीत यावर माहिती अधिकारांतर्गत विभागवार तपशील मिळवून सार्वजनिक केला तर अनेक प्राध्यापकांचे पितळ उघडे पडेल, हे निःसंशय. 

विद्यापीठात जेवढी लैंगिक अत्याचाराची प्रकरणे घडलीत तितकी प्रकरणे कुठल्याच शैक्षणिक संस्थेत घडली नसतील. राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील शिखर संस्था म्हणून जे काही शैक्षणिक, तात्विक, नैतिक, प्रशासकीय व कायदेशीर साधनशुचिता बाळगायला हवी ती बाळगताना हयगय होते आहे, हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. उच्चशिक्षण संचालनालय आपल्या अधिकारातील महाविद्यालयात प्रतिनियुक्ती तत्वावर प्राध्यापक व इतर कर्मचारी वर्गाची नियुक्ती करते तसेच गोवा विद्यापीठही करते. अनेक प्रतिनियुक्तीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी बोलताना माहिती मिळाली ती अशी की या प्रतिनियुक्त केलेल्या कर्मचारी वर्गाचा फायदा त्याच्या मातृसंस्थेला नॅक मानांकनात वरचा क्रमांक मिळवण्यासाठी होतो. पण अनेक उमदे व बुद्धिमान प्राध्यापक 'प्रतिनियुक्ती नको पण मानसिक छळ आवरा' असा सूर लावत इथून राजीनामा देऊन अधिकृतपणे परतीचा प्रवास किंबहुना अक्षरशः पळ काढतात, असे म्हणावे लागेल. गोवा वैद्यकीय महाविद्यालय, गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय व गोवा विद्यापीठ या तिन्ही सस्थांमधून इतरत्र ठिकाणी बदली होत नाही व याचा फायदा इथला कर्मचारी वर्ग पुरेपूर उठवतो. कर्मचाऱ्यांची बदली जास्तीत जास्त एका विभागातून दुसऱ्या विभागात होते‌ तेही तो कर्मचारी द्वितीय, तृतीय किंवा चतुर्थ श्रेणी कर्मचारी असेल तरच. प्रस्तुत लेखकाच्या एका तरुण गुरुवर्यांनी पीएचडीला सुरुवात करून दोनच वर्षांत पीएचडी व पीएचडीला 'मार्गदर्शन' वगैरे करणाऱ्या गाईडला 'रामराम' ठोकला. कारण विचारल्यावर कळले की गाईड तेवढा 'गाईडी' नव्हता. पदव्युत्तर पदविका व पीएचडीसाठीचा प्रबंध लिहिताना एक कळून चुकते की आयुष्यात तुम्ही तुमची आई व तुमचा गाईड बदलू शकत नाही. तुमचा गाईड तुमच्या आईसारखा असतो, तुम्ही त्याला बदलू शकत नाही. 

पदवी पूर्ण झाल्यावर हे विद्यापीठ व त्या विद्यापीठातील आपल्या विषयाचा विभाग सोडताना जर विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी आले तर विद्यापीठाचा कर्मचारी वर्ग हा खरोखरच कर्तव्यदक्ष झालाय, असा संशय व्यक्त करायला हरकत नाही.


प्रा. विघ्नेश शिरगुरकर, (लेखक प्राध्यापक, कथालेखक, अनुवादक, कवी ‌आहेत.)