उत्तर प्रदेश
राणा सांगा (महाराणा सांगा सिंह) यांनी १५०९ ते १५२८ पर्यंत राजस्थानातील मेवाडवर राज्य केले. त्यांनी मेवाड साम्राज्याचा विस्तार केला. राजपुतानातील सर्व राजे त्यांच्या नेतृत्वाखाली संघटित होते. राणा सांगा यांनी परकीय आक्रमकांविरुद्ध सर्व राजपुतांना एकत्र केले. त्यांनी दिल्ली, गुजरात आणि मालवा येथील मुघल सम्राटांच्या हल्ल्यांपासून आपल्या राज्याचे रक्षण केले. अशा राणा सांगा यांचा बुधवारी राज्यसभेत समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांनी ‘देशद्रोही’ असा उल्लेख केला. खासदार सुमन राज्यसभेत म्हणाले, ‘मुस्लिमांमध्ये बाबरचा डीएनए आहे, हे भाजपच्या लोकांचे एक वैशिष्ट्य बनले आहे. मग हिंदूंमध्ये कोणाचा डीएनए आहे? बाबरला कोणी आणले? इब्राहिम लोधीचा पराभव करण्यासाठी राणा सांगा यांनी बाबरला भारतात आणले.’
या वक्तव्यामुळे भावना दुखावलेल्या करणी सेनेच्या १०० हून अधिक संतप्त कार्यकर्त्यांनी खासदार रामजी लाल सुमन यांच्या आग्रा येथील घरावर बुलडोझर घेऊन हल्ला केला. तिथे मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि दगडफेक झाली. कार्यकर्त्यांसोबत झालेल्या चकमकीत अनेक पोलीस जखमी झाले. करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी खासदार सुमन यांच्या घराबाहेर ठेवलेल्या ४० ते ५० खुर्च्या फोडल्या, १० हून अधिक वाहनांची तोडफोड केली.
करणी सेनेच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी समाजवादी पक्षाचे कार्यकर्तेही खासदार सुमनच्या घरी पोहोचले. तेथे करणी सेनेच्या कार्यकर्त्यांशी त्यांची झटापट झाली. परिस्थिती तणावपूर्ण बनून हाताबाहेर जात असल्याचे दिसून आल्यावर पोलिसांनी लाठीहल्ला सुरू केला. मात्र, तरीही परिस्थिती नियंत्रणात येऊ शकली नाही. अखेर परिसरातील अन्य पोलीस ठाण्यांमधून कुमक मागवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना तेथून हुसकावून लावले.
या हाणामारीच्या प्रकारावेळी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्यात आले. करणी सेनेचे कार्यकर्ते ‘जय श्री राम’च्या घोषणा देत होते. पोलिसांनी कार्यकर्त्यांना वाटेत रोखण्याचा प्रयत्न केला; पण ते एक्सप्रेस-वेने शहरात शिरले. सुरक्षेचा विचार करून समाजवादी पक्षाच्या खासदारांच्या सोसायटीचे दोन्ही दरवाजे बंद करण्यात आले.
करणी सेनेचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष ओकेंद्र राणा यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. ते म्हणाले की, खासदार रामजी लाल सुमन यांनी क्षत्रिय समाजाच्या महापुरुषाविरुद्ध अत्यंत हीन दर्जाचे अवमानकारक विधान केले आहे. महापुरुषांना आणि पूर्वजांना शिवीगाळ आम्ही खपवून घेणार नाही. यावेळी खासदार रामजी लाल सुमन यांना आम्ही माफ करणार नाही.
प्रदीप जोशी