५० हजार रुपयांचे नुकसान : नैसर्गिक संपत्तीची हानी
वाळपई : सत्तरी तालुक्यात जंगलामध्ये आग लागण्याचे प्रकार पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. रविवारी एका दिवसात दोन ठिकाणी आग लागून नैसर्गिक संपत्तीची हानी झाली. वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. तरीसुद्धा नैसर्गिक संपत्तीची हानी झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
मोर्ले येथील रहिवासी कॉलनी या ठिकाणी बाबाजी बार यांच्या शेजारी गवताला आग लागून नुकसान झाले. घटना दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशामक दलाच्या जवानांना याची माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन अडीच तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. ज्ञानेश्वर गावस यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक नाईक, गंगाराम पावणे, आनंद शेटकर यांनी आग विझवण्यासाठी सहाय्य केले. आगीमुळे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज अग्निशामक दलाच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात आला. मात्र, १ लाख रुपयांची मालमत्ता वाचविण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
दुसऱ्या एका घटनेत नागवे या ठिकाणी जंगलाला आग लागून नैसर्गिक संपत्तीची हानी झाली. आग कशी लागली याचे कारण स्पष्ट झाले नाही. मात्र, वाळपई अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आग लागली. सतीश नाईक यांच्या नेतृत्वाखाली तुळशीदास झर्मेकर, अविनाश नार्वेकर यांनी यंत्रणेचा वापर करून आग आटोक्यात आणण्यास योगदान दिले.
सध्या उष्णतेचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. अनेक ठिकाणी गवत सुकल्यामुळे आग लागण्याचे प्रकार सातत्याने घडू लागले आहेत. यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, अशी सूचना अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी केली.
दोन वर्षांपूर्वी सत्तरी तालुक्याच्या डोंगराळ भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागून जंगल संपत्तीची हानी होण्याचे प्रकार सातत्याने घडत होते. त्यामुळे सरकारवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाला होता.
सतर्क रहाण्याचे अग्निशमनचे आवाहन
रस्त्याच्या बाजूला असलेल्या सुक्या गवताला आग लागण्याचे प्रकार गेल्या एक महिन्यापासून घडू लागले आहेत. यामुळे अग्निशामक दलाने या संदर्भात नागरिकांनी सतर्क रहावे व अशा प्रकारच्या घटना घडल्यास ताबडतोब अग्निशामक दलाच्या यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.