सत्य ज्ञानापासून वंचित ठेवणे

माझी मूर्ती घडवून, ती पुढे ठेवून ते माझी भक्ती करतात. आणि ती मूर्ती भंग पावली की देवपण गेले असे समजून ते ती टाकून देतात. अशा पद्धतीने ते मला मानवाचा आकार देतात आणि त्यांचे असे करणे हेच त्यांना सत्य ज्ञानापासून वंचित ठेवते.

Story: विचारचक्र |
23rd March, 09:30 pm
सत्य ज्ञानापासून वंचित ठेवणे

नवव्या अध्यायातील १० व्या श्लोकात ज्ञानप्राप्तीचा आव आणलेले महाभाग सत्य ज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती नसतानाही केवळ वाचा-शक्तीच्या आधाराने (नसलेल्या) अनुभवाची ऐट ज्या फोल शब्द-ज्ञानाने दाखवतात, त्याचा योग्य प्रभाव समाजमनावर पडू शकत नाही, असे मत श्रीकृष्ण अर्जुनाजवळ व्यक्त करताना आपण बघितले.

आता ११ व्या श्लोकात ते काय म्हणताहेत ते आपण पाहू.

श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, स्पष्ट सांगतो, की या जन्मात अनुभवास येणाऱ्या दु:खांना घाबरून माणसाला भगवत्प्राप्तीची इच्छा होते खरी, पण मी दाखवलेली माझ्या प्राप्तीची खूण तो लक्षात ठेवत नाही. ती (मला भ्रूमध्यात पाहण्याचा सराव करण्याची) खूण त्याने सोsहं भावाने  जपणे अगत्याचे आहे.

काविळीची बाधा झाल्यावर माणसाला जसे स्वच्छ शुभ्र चांदणेसुद्धा पिवळे दिसायला लागते किंवा ताप आल्यामुळे जशी तोंडाची चव जाऊन दूध सुद्धा कडू लागते, तसे (सत्यज्ञानाच्या अभावाची बाधा झाल्याने) माझ्या शुद्ध स्वरूपाच्या ठायी लोकांना नाना दोष दिसतात आणि मी देह-धर्म यांच्या पलिकडे असतानाही ते मला देहयुक्त समजतात. म्हणून हे पार्था, मी तुला परत परत सांगतोय की तू त्या मी सांगितलेल्या खुणेचा विसर पडू देऊ नकोस.

जे मला ढोबळपणे स्थूल-दृष्टीने बघायला जातात त्यांचे ते प्रयत्न फुकटच जायचे असतात कारण जसे स्वप्नात अमृत पिऊन कोणी चिरंजीव होत नाही, तसे स्थूल दृष्टीने पाहून मी यथार्थत्वे दिसूच शकत नाही (म्हणजे जाणला जाऊ शकत नाही). अशा पद्धतीने मला पाहण्याचा प्रयत्न करून "पाहिले, पाहिले आम्ही देवाला पाहिले" असा जे डंका पिटतात, त्यांच्या त्या मूढज्ञानाच्या अडसरापायीच त्यांना सत्यज्ञानाचा प्रकाश दिसणे दुष्कर होऊन बसते.

नदीतल्या किंवा सरोवरातल्या पाण्यात पडलेल्या चांदण्यांच्या प्रतिबिंबाला हिरेमोती समजून त्यांच्या लोभाने एखादा हंस जसा त्या पाण्यात प्रवेश करून (त्यातील मगरींना आयती मेजवानी मिळाल्याने) स्वतःचा घात करून घेतो किंवा मृगजळाच्या पाण्याला गंगा समजून एखादा त्याकडे धावतो किंवा कल्पवृक्ष समजून बाभळीलाच पुजतो किंवा सापालाच दुपदरी रत्नहार समजून तो हातात घ्यायला जातो  किंवा हिऱ्यांची रांग समजून गारगोट्या वेचत सुटतो किंवा शेवटी निधान सापडले म्हणून निखारे ओटीत बांधून घेऊ जातो किंवा सिंह जसा विहिरीतल्या आपल्याच प्रतिबिंबाला दुसरा सिंह समजून त्यात उडी घेतो किंवा जसा एखादा पाण्यात चंद्र सापडला म्हणून त्याला धरायला पाण्यात शिरतो किंवा कांजी वा पेज पिऊन अमृत प्यायल्याच्या परिणामाची अपेक्षा करतो -  हे सगळे प्रयत्न जसे पुरतेपणी वाया जातात, तशा प्रकारे नाशिवंत स्थुलाकारी अशा भरंवशाला आपल्या चित्तांत स्थान देऊन अव्यय असलेल्या अशा मला जे पाहू जातात त्यांना माझी प्राप्ती कशी होईल? अर्थात् होणार नाही. पूर्वेकडे चालायला लागले तर पश्चिमेचा सागर कसा दिसेल? किंवा कोंड्याचे जर कांडण केले तर त्यात दाणा कसा सापडेल?

तसे "पंचमहाभूते" या विकारांनी जे हे सगळे स्थूळ विश्व निर्माण झालेय, त्याच्या (मळलेल्या) ज्ञानाने माझ्या निर्मळ स्वरूपाचे आकलन कसे होईल? पाण्यावरचा फेस प्यायल्याने काही पाणी पोटात जात नाही.

लोक आपल्या मार्ग चुकलेल्या, भरकटलेल्या, प्रदूषित मनाच्या व्यवहारायोगे मोहित होऊन मला प्रपंचात पाहतात! जन्म, मृत्यू या स्थिती ते मलाही लावून मोकळे होतात! अनामी असलेल्या माझे ते नामकरण करतात. अक्रिय असलेल्या माझ्यावर ते कर्माचे आरोपण करतात! देहाविरहित असलेल्या मला ते देहधर्मयुक्त मानतात! निराकार व उपाधिरहित असलेल्या माझ्यावर ते स-आकार उपचारांची कल्पना करतात. विधि-विवर्जित (म्हणजे नियमांच्या पलिकडे) असलेल्या मला ते स-आचार आचारादी व्यवहारांचा लेप चढवतात. वर्णहीन, गुणातीत व अचरण असलेल्या मला ते वर्ण, गुण व चरण चिकटवतात. हात नसलेल्या मला हात लावतात. अमाप असलेल्या मला मापात बांधायला बघतात. मी सर्व ठिकाणी असूनही ते मला एकाच ठिकाणी असल्याचे मानतात. झोपलेल्याला जसे स्वप्नात अंथरुणातच उपवन दिसते, तसे ते अरूप असलेल्या मला आपल्याला आवडतील ती नाना रूपे बहाल करतात. अकर्णाला कर्ण, अचक्षूला नयन, अगोत्राला गोत्र, अव्यक्ताला व्यक्तता, अनार्ताला आर्तता, स्वयंतृप्ताला तृप्तता, अनावरणाला प्रावरण व अभूषणाला भूषण अशी योजना ते भावनेने माझ्या ठायी करतात.

आदिकारणासाठीही कारण शोधतात, जो स्वाभाविकपणे अस्तित्वात आहे त्याला अस्तित्व बहाल करतात. मी नित्य स्वयंसिद्ध असूनही माझे आवाहन करतात आणि विसर्जनही करतात. माझी प्राणप्रतिष्ठाही करतात. बाल्य, तारुण्य, वृद्धत्व इत्यादी उपाधिक संबंधही मला जोडतात. मला अद्वैताला द्वैतात आणतात आणि कर्मातीताला कर्मात आणतात. प्रत्यक्षात अभोक्ता असूनही मी भोग भोगतो असे ते म्हणतात. माझे मूळ स्वरूप न जाणून अकुळ असलेल्या मला ते कुळाही बांधतात. मी शाश्वत असूनही काही काही वेळा माझे निधन झाले असे मानून ते आक्रंदन करत शोकाकुलही होतात.

सर्वांच्या अंत:करणात राहणाऱ्या मला कुणाकुणाचा मित्र व कुणाकुणाचा वैरी असेही मानतात. नित्य निरंतर निजानंदी पूर्ण रममाण असणाऱ्या मला नाना सुखदुःखे ते चिकटवतात. सर्वांच्या ठायी माझी व्याप्ती सारखीच असूनही मी एकाच ठिकाणी असतो, एखाद्यावर कोप करून त्याला ठार मारतो व इतरांचा कैवार घेतो असेही समजतात आणि हा समज ते सर्वत्र पसरवतात. थोडक्यात, ते मानवाची सगळी वैशिष्ट्ये मला चिकटवतात. असे त्यांचे ज्ञान विपरीत आहे. माझी मूर्ती घडवून, ती पुढे ठेवून माझी भक्ती करतात आणि ती मूर्ती भंग पावली की देवपण गेले असे समजून ते ती टाकून देतात. अशा पद्धतीने ते मला मानवाचा आकार देतात आणि त्यांचे असे करणे हेच त्यांना सत्य ज्ञानापासून वंचित ठेवते.


- मिलिंद कारखानीस

(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)

मो. ९४२३८८९७६३