पर्यटन खात्याने ज्या २३ शॅकचे परवाने रद्द केले तिथे पुढच्या वर्षी नव्या व्यावसायिकांना शॅक द्यावेत. नियम मोडणाऱ्यांना पुन्हा शॅक देऊ नयेत. असे केले तरच शॅक व्यवसायात सुसूत्रता येईल आणि शॅक व्यवसाय गोवेकरांच्या हाती राहील.
गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवर राज्याच्या पर्यटन खात्याने दिलेले शॅक मूळ मालकांनी दुसऱ्यांना चालवायला दिल्याचे उघड झाल्यानंतर २३ शॅकचे परवाने रद्द करून ते बंद करण्याचे आदेश पर्यटन खात्याने दिले. सुमारे ११० शॅकची पाहणी करून ते कोण चालवतो त्याची चौकशी करण्यात आली. दोन शॅकवर गेल्या पाच महिन्यांत दोन खून झाले. काही शॅकवर पर्यटकांना मारहाण करण्याचे प्रकार घडले. हे सगळे घडल्यानंतर पर्यटन खाते खडबडून जागे झाले. इतकी वर्षे शॅकवर कसलेच नियंत्रण नव्हते. प्रथमच पर्यटन खात्याने आपले अधिकार वापरून शॅक मालकांना सरळ करण्यासाठी मोहीम हाती घेतली.
शॅक आपल्या नावावर घ्यायचे आणि आपण घरी बसून गोव्याबाहेरील व्यावसायिकांना ते चालवायला द्यायचे असे प्रकार गोव्यात चालतात. ज्या शॅकवर पर्यटकांना मारहाण झाली, ज्या शॅकवर खून झाले त्यातील काही शॅक मूळ मालक चालवतच नाहीत असे दिसून आल्यानंतर पर्यटन खात्याने समुद्र किनाऱ्यांवरील शॅकची अचानक पाहणी केली. अनेक शॅकधारकांनी पर्यटन खात्याच्या शॅक धोरणाचा भंग केल्याचे यात आढळून आले. त्यातील ११० शॅक मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यातील ५४ जणांच्या सुनावण्या घेण्यात आल्या. सुनावण्या झाल्यानंतर २३ जणांचे शॅक बंद करण्याचे आदेश पर्यटन खात्याने दिले. शॅक दुसऱ्याला चालवायला दिला, हे शोधणेही कठीण होते. शेवटी शॅकवर ग्राहकांकडून बिल फेडताना यूपीआय पेमेंटद्वारे ज्या खात्यात पैसे गेले, त्यातून निष्कर्ष काढून २३ जणांवर कारवाई करण्यात आली. अन्यथा हे शॅक मूळ मालक सोडून दुसरेच चालवतात, हे शोधणे कठीण होते. या २३ जणांना पुढील पंधरा दिवसांत शॅक बंद करून ते पाडण्यात यावेत, असे आदेशात म्हटले आहे. हे शॅक मालक आता उच्च न्यायालयात जातीलही, पण त्यांनी नियम भंग केल्यामुळे त्यांना न्यायालयात दिलासा मिळण्याची शक्यताही कमी आहे. आता मूळ शॅक मालकाने गोव्यातीलच व्यावसायिकाला शॅक चालवायला दिला असेल तर त्यांच्यावर कारवाई करू नये, पण राज्याबाहेरील व्यावसायिकाला शॅक चालवायला दिले असतील तर अशा शॅक मालकांवर कारवाई करावी, अशी भूमिका शॅक मालक संघटनेने घेतली आहे. गोव्यातील व्यावसायिकांना शॅक चालवायला दिला असेल तर ते पारंपरिक शॅक चालक आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ नये, असे शॅक मालकांना वाटते. मुळात दुसऱ्याला शॅक चालवायला देणे हेच चुकीचे आहे आणि तो नियमाचा भंग आहे. आपण शॅक चालवू शकत नाही तर शॅक वितरणात अशा लोकांनी भागच घेऊ नये. दुसऱ्याला शॅक चालवायला दिले जातात, यातून नव्याने शॅक व्यवसायात येणाऱ्यांनी जुन्या व्यावसायिकांसोबत केलेली सिंडिकेट उघड होते. शॅक व्यवसाय हा गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना गोव्यातील खाद्यपदार्थांची मेजवानी देण्यासाठी असतात. अशा प्रकारची संकल्पना अन्य राज्यांत आढळत नाही. गोव्यातील किनाऱ्यांवरील शॅक हे पर्यटकांच्या सेवेसाठी असतात. ते गोव्यातीलच पारंपरिक व्यावसायिकांनी चालवावेत, यासाठीच सरकारचा आग्रह असतो. २०२३ ते २०२६ या कालावधीसाठी सुमारे ३६१ शॅकना परवाने दिले आहेत. उत्तर गोव्यात २६३ तर दक्षिण गोव्यात ९८आहेत. नोव्हेंबर ते मे महिन्यापर्यंत शॅकचा हंगाम असतो. अर्थात हाच गोव्याचा पर्यटन हंगाम. या काळात शॅक असतात. मेच्या शेवटी ते हटवले जातात. तात्पुरते बांधकाम उभारण्यासाठी शॅक दिलेले असतात. तिथे कायमस्वरुपी बांधकाम करता येत नाही. तरीही नियम मोडून अनेक शॅक मालक कायमस्वरुपी पक्के बांधकाम करतात. काहीजण मुंबई, दिल्ली, हिमाचल या राज्यांसह नेपाळ, इस्रायल, रशिया व इतर देशांतील व्यावसायिकांना शॅक चालवायला देतात. किनारी भागात शॅकच्या नावाखाली अनेक व्यावसायिक अन्य गैरधंदेही करतात, असा आरोप अनेकदा झाला आहे. हे शॅक गोव्यातीलच लोकांनी चालवावे, गोव्यातील पारंपरिक शॅक व्यावसायिकांनी हा व्यवसाय परप्रांतियांच्या हाती देऊ नये अशी अपेक्षा सरकारही ठेवते. पण हल्लीच्या काळात गोव्यातील हा महत्त्वाचा पर्यटन व्यवसायही परप्रांतियांच्या हाती जात असल्याचे दिसते. पर्यटन खात्याने ज्या २३ शॅकचे परवाने रद्द केले तिथे पुढच्या वर्षी नव्या व्यावसायिकांना शॅक द्यावेत. नियम मोडणाऱ्यांना पुन्हा शॅक देऊ नयेत. असे केले तरच शॅक व्यवसायात सुसूत्रता येईल आणि शॅक व्यवसाय गोवेकरांच्या हाती राहील.