ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणारा ‘हाय इंड’चा देखावा

गोवा

Story: अंतरंग |
20th March, 12:02 am
ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणारा ‘हाय इंड’चा देखावा

हाय इंड रेस्टॉरंट्सची संकल्पना आपल्या बदलत्या राहणीमानानुसार अस्तित्वात आली. देशी-विदेशी धनवंत पर्यटकच नव्हे तर स्थानिक लोकही या रेस्टॉरंट्सना भेट देतात. गोव्यात आसगाव, सांगोल्डा, पर्वरी सारख्या शहरीकरणाच्या दिशेने वाटचाल करणार्‍या भागात ही हाय इंड रेस्टॉरंटस् मोठ्या संख्येने उभी राहिली आहेत.

सध्या सरकारच्या अन्न व औषधे प्रशासनाने या उच्च दर्जाच्या रेस्टॉरंट्सवर कारवाईची मोहीम राबवल्यामुळे ही हाय इंड रेस्टॉरंट्स चर्चेत आली आहेत. या रेस्टॉरंट्समध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याच्या माहितीच्या आधारे गेल्या दोन तीन आठवड्यात एफडीएने अशा अनेक रेस्टॉरंट्सवर कारवाईचा बडगा उगारला. त्यातून बहुतेक रेस्टॉरंट्सचा व्यवसाय हा अवैधरित्या सुरू असल्याचे दिसून आले. शिवाय रेस्टॉरंट्सची स्वयंपाकघरे अस्वच्छ असल्याचेही आढळून आले. बाहेरून सुंदर आणि चकचकीत देखावे आणि गलिच्छ स्वयंपाकघरात तयार केलेले आरोग्यास हानीकारक असे अन्न हाय इंड रेस्टॉरंट्स ग्राहकांना वितरित करीत असल्याचा प्रकार पाहून एफडीएचे अधिकारीही चकीत झाले.

उत्कृष्ट अन्न, सर्वोत्तम सेवा, आनंददायी वातावरण अशी या हाय इंड रेस्टॉरंट्सची संकल्पना. मात्र उत्तम सेवा आणि आनंददायी वातावरण असले तरी एफडीएने कारवाई केलेल्या रेस्टॉरंट्समधून चांगले दिसणारे अन्न हे दर्जात्मक किंवा आरोग्यदायी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.    

एखादी टपरी किंवा गाळ्याच्या परवान्याच्या आधारे ही हाय इंड रेस्टॉरंट्स चालवली जात असल्यामुळे या उच्च दर्जाच्या रेस्टॉरंट्सच्या संकल्पनेवरच आता लोक संशय व्यक्त करीत आहेत. गोव्यात विशेषतः परप्रांतिय व्यावसायिक ‘हाय इंड’च्या नावाखाली कशाप्रकारे अवैध आणि लोकांच्या आरोग्याशी खेळणारे व्यवसाय चालवतात, हे आता उघडकीस आले आहे. एफडीएने हाय इंड रेस्टॉरंट्समध्ये तयार होणार्‍या अन्नाच्या गुणवत्तेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावरून ही रेस्टॉरंट्स उच्च दर्जाचा देखावा करीत आहेत, हेही उघड झाले आहे. 

उच्च दर्जाचा देखावा करणारी ही हाय इंड रेस्टॉरंट्स कायदा नियमांना तिलांजली देत असल्यास हा एकंदरित प्रकार गोव्याच्या पर्यटनाला धोक्याचा संकेत मानावा लागेल. संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून सुरुवातीपासूनच अशी कारवाई व्हायला हवी. तेव्हाच असे हे ग्राहकांच्या भावना दुखावणारे, आरोग्याशी खेळणारे ‘हाय इंड’चा देखावा करणारे मुखवटे उघडे पडतील आणि त्यातून लोकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी अन्न मिळेल.

उमेश झर्मेकर