स्मार्ट कार्डमुळे पणजी ईव्ही बसमधली प्रवाशांची संख्या रोडावली

कदंब महामंडळाच्या अधिकाऱ्यांची माहिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
9 hours ago
स्मार्ट कार्डमुळे पणजी ईव्ही बसमधली प्रवाशांची संख्या रोडावली

पणजी: पणजी स्मार्ट सिटीमध्ये सुरू असलेल्या ईव्ही बसेसमध्ये स्मार्ट कार्डमुळे प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. जे नियमितपणे प्रवास करत नाहीत ते कार्ड तयार करत नाहीत तसेच आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल जास्त माहिती नसलेले ज्येष्ठ नागरिकांनीही ईव्ही बसमधून प्रवास करणे बंद केल्याचे कदंब वाहतूक महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. इलेक्ट्रीक स्मार्ट बसेससाठी तिकिटे बुक करण्यासाठी पणजीमध्ये स्मार्ट कार्ड आणि ट्युमोक अॅप लाँच करण्यात आले होते. तसेच या स्मार्ट बसेसमध्ये प्रत्यक्षात तिकिटे देण्यासाठी कंडक्टरऐवजी ही प्रक्रिया डिजिटायझेशन केली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. 

ही कार्ड दीर्घकाळ टिकतील आणि कार्डला सुरुवातीला १५० चे रिचार्ज करणे आवश्यक आहे. सदर कार्ड स्वाइप केल्यानंतर, पणजीमध्ये प्रवाशाने प्रवास केलेल्या अंतरानुसार तिकिटाचे पैसे कार्डमधून वजा होतील असे सांगण्यात आले होते. 

जानेवारी २०२५च्या सुरुवातीला, स्मार्ट सिटीने अचानक स्मार्ट कार्ड सक्तीचे केले आणि तिकिटांसाठी रोख व्यवहार बंद केलेय त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला. स्मार्ट कार्ड सक्तीचे करण्याबाबत कोणतेही निर्देश देण्यात आले नव्हते आणि अचानपणे रोख रक्कम घेणेही बंद करण्यात आल्याने लोकांनी अशा बसमधून प्रवास करणे बंद केले. कदंब वाहतूक मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कार्ड सक्तीचे झाल्यामुळेच अनेक प्रवाशांनी ईव्ही बसेसकडे पाठ फिरवली आहे. 

जे दैनंदिन प्रवासासाठी बस वापरत नाहीत अशा प्रवाश्यांनी कार्ड सक्तीचे केल्याने ईव्ही बसेस मधून प्रवास करणे बद केले आहे. अनेक पर्यटक देखील या ईव्ही बसेसचा वापर करायचे मात्र त्यांच्याकडे कार्ड नसल्याने त्यांनीही बसकडे पाठ फिरवली आहे. याशिवाय तंत्रज्ञानाचे ज्ञान नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कार्ड कसे वापरावे हे माहित नसल्याने त्यांनीही बसने प्रवास करणे थांबवले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.


ऑनलाईन पेमेंट करण्याचाही पर्याय

स्मार्ट सिटी स्मार्ट ट्रान्झिस्ट या ईव्ही बसेससाठी सुमारे १८०० स्मार्ट कार्ड कार्यरत आहेत. पण कार्डशिवाय ऑनलाईन पेमेंट करण्याचाही दुसरा पर्याय आहे. ट्युमोक अॅपद्वारे प्रवासाचा मार्ग निवडून अॅपवर पैसे देऊन तिकिटे बुक करण्याचा पर्याय प्रवाश्यांकडे आहे. तसेच ड्रायव्हरकडे यूपीआय पेमेंटसाठी क्यूआर कोड उपलब्ध असून त्या कोडचा वापर करूनही पैसे देता येतील असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.


आतापर्यंत १५,३९४ कार्डद्वारे तिकीट बुकिंग

पणजी स्मार्ट बसपेक्षा जास्त प्रतिसाद गोव्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये जाणाऱ्या इतर कदंब बसेसच्या स्मार्ट कार्डसाठी आहे. स्मार्ट सिटीसाठी सुमारे १८०० कार्ड तयार करण्यात आली आहेत. तथापि, इतर कदंब सेवांसाठी, दररोज सरासरी १७५ कार्ड तयार केले जातात आणि आतापर्यंत १५,३९४ कार्डचा वापर तिकीट बुकिंगसाठी केला आहे. 

हेही वाचा