१९ मार्च २०१९ रोजी घेतली होती शपथ : घटक राज्यानंतर सलग सर्वाधिक काळ भूषवले मुख्यमंत्रिपद
पणजी : दिवस किती वेगाने जातात, ते कळतही नाहीत. दिवसामागून महिने जातात, महिन्यामागून वर्षे जातात आणि मागे राहतात त्या केवळ आठवणी. हा, हा म्हणता माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या देहावसानाला सहा वर्षे पूर्ण झाली. त्यांची पुण्यतिथी सोमवारी पाळली गेली. दिवंगत पर्रीकरांच्या निधनानंतर दोन दिवसांनी म्हणजे १९ मार्च २०१९ रोजी डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीनंतरही मुख्यमंत्रिपदावर त्यांचीच निवड झाली. मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत हे बुधवारी सहा वर्षे पूर्ण करीत आहेत.
घटक राज्यानंतर सलग सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा मान त्यांना प्राप्त झाला आहे. घटक राज्य मिळण्यापूर्वी प्रतापसिंग राणे हे सलग ७ वर्षे १३४ दिवस (१६ जानेवारी १९८० ते ३० मे १९८७) पर्यंत मुख्यमंत्री होते. घटक राज्य मिळाल्यानंतर प्रतापसिंग राणे २ वर्षे ३०१ दिवस (३० मे १९८७ ते २७ मार्च १९९०) मुख्यमंत्री होते. घटक राज्य मिळाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नंतर दिगंबर कामत हे सलग ४ वर्षे २७५ दिवस (८ जून २००७ ते ९ मार्च २०१२) मुख्यमंत्री होते. घटक राज्य मिळाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून विधानसभेचा संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करणारे दिगंबर कामत हे एकमेव मुख्यमंत्री आहेत. आयाराम गयारामांंमुळे राजकीय अस्थिरतेच्या पर्वाला कामत यांनीच विराम दिला.
भाजप सरकारात स्व. मनोहर पर्रीकर व प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मुख्यमंत्रिपद भूषवलेले आहे. स्व. मनोहर पर्रीकर यांनी चार वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा एकंदर कार्यकाळ हा ८ वर्षे ३४९ दिवसांचा आहे. भाजपचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा मान स्व. मनोहरभाईंनाच मिळाला आहे. प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर हे २ वर्षे १२६ दिवस (८ नोव्हेंबर २०१४ ते १४ मार्च २०१७) मुख्यमंत्री होते. तसेच घटक राज्याचा दर्जा मिळण्यापूर्वी स्व. भाऊसाहेब बांंदोडकर हे ९ वर्षे १११ दिवस मुख्यमंंत्री होते. त्यानंंतर स्व. शशिकला काकोडकर या ५ वर्षे २५८ दिवस मुख्यमंंत्री होत्या.
प्रतापसिंग राणे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री
संघशासित प्रदेश व घटक राज्य म्हणून एकंदर विचार केला तर प्रतापसिंग राणे हेच सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत. संघशासिक प्रदेश असताना ते ७ वर्षे १३४ दिवस (१६ जानेवारी १९८० ते ३० मे १९८७) मुख्यमंत्री राहिलेले आहेत. घटक राज्य असताना ८ वर्षे २५१ दिवस ते मुख्यमंत्री होते. सर्वप्रथम ३० मे १९८७ ते २७ मार्च १९९०, त्यानंतर १६ डिसेंबर १९९४ ते २९ जुलै १९९८ पर्यंत ते मुख्यमंत्री होते. स्व. मनोहर पर्रीकर यांचे सरकार पडल्यानंतर ३ फेब्रुवारी २००५ ते ४ मार्च २००५ व ७ जून २००५ ते ८ जून २००७ पर्यंत ते मुख्यमंत्री होते.