गोवा विद्यापीठात ‘यूपीएससी’चे वर्ग सुरू

स्पर्धा परीक्षा देण्याचे अनेकांचे स्वप्न होणार पूर्ण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10 hours ago
गोवा विद्यापीठात ‘यूपीएससी’चे वर्ग सुरू

पणजी : गोवा विद्यापीठाच्या करिअर कौन्सिलिंग विभागामार्फत प्रथमच विद्यापीठात केंद्रीय लोकसेवा आयोगांच्या (यूपीएससी) परीक्षांसंदर्भातील वर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती कुलगुरू हरिलाल मेनन यांनी दिली आहे.
राज्यातील अधिकाधिक युवकांनी स्पर्धा परीक्षांकडे वळावे, यासाठीच विद्यापीठात ‘यूपीएससी’चे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. स्पर्धा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना उज्ज्वल करिअरची संधी मिळते. नोकरी आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षा मिळते. स्वत:चा सर्वांगीण विकास साधता येतो. गोव्यातील विद्यार्थ्यांना गोष्टींचा फायदा मिळवून देणे हेच या वर्गांचे उद्दिष्ट आहे. पदवी प्राप्त केलेल्या गोव्यातील कोणत्याही विद्यार्थ्याला या वर्गांचा लाभ घेता येईल, असे मेनन यांनी म्हटले आहे.
यूपीएससी’ वर्गांचे आयोजन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत स्टुडंट, प्लेसमेंट अँड अॅल्युम्नी रिलेशन्स संचालक डॉ. रुपेश पात्रे, करिअर कौन्सिलिंग विभागाचे अध्यक्ष डॉ. अरविंद हळदणकर, समन्वयक डॉ. म्रिदिनी गावस, आकृती हळर्णकर, डॉ. संगीता नाईक यांचा समावेश असून, शशिकांत मोरजकर समितीचे सदस्य सचिव आहेत.
‘यूपीएससी’चे वर्ग विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर
राज्यात अनेक तरुण-तरुणींची स्पर्धा परीक्षा देऊन यश मिळवण्याची इच्छा आहे. परंतु, राज्यात स्पर्धा परीक्षांचे वर्ग उपलब्ध नाहीत. इतर राज्यांत जाऊन याबाबतचे शिक्षण घेणे अनेक विद्यार्थ्यांना परवडणारे नसते. त्यामुळेच स्पर्धा परीक्षांची संस्कृती राज्यात रुजलेली नाही. आता गोवा विद्यापीठाने ‘यूपीएससी’चे वर्ग सुरू केल्याने त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना मिळणार आहे.