केंद्रीय नेत्यांशी बैठका : लवकरच होणार निर्णय
पणजी : सभापती रमेश तवडकर यांनी काहीच दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यांमुळे राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या चर्चांना ऊत आलेला असतानाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मंगळवारी दिल्लीत हजेरी लावत केंद्रातील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या. या बैठकांत फेरबदलाबाबत चर्चा झाल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
पुढील पंधरा दिवसांत राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होतील, आमदार नीलेश काब्राल, दिगंबर कामत, संकल्प आमोणकर, डिलायला लोबो आणि मायकल लोबो यांच्या नावांचा मंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो, असे सभापती तवडकर यांनी म्हटले होते. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच २६ मार्चनंतर कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत असतानाच मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मंगळवारी दिल्लीत हजेरी लावल्याने याबाबतच्या चर्चांना अधिक जोर चढला होता.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिल्लीत दाखल झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांच्यासोबतच्या बैठकीत नवीन फौजदारी कायद्यांच्या गोव्यात होत असलेल्या अंमलबजावणीसोबतच खाण व्यवसायातील नवीन घडामोडींची माहिती त्यांनी अमित शहांना दिली. सोबतच राज्याचे प्रशासन आणि विकासात्मक प्रकल्पांबाबतही त्यांनी शहांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत, पेडणे-काणकोण कॉरिडोर, राज्यातील रेल्वे सेवांचा विस्तार आणि मडगाव रेल्वे स्थानकाचे सार्वजनिक-खासगी (पीपीपी) तत्त्वावर अपग्रेडेशन करण्यासंदर्भात चर्चा केली.
नावांबाबतही चर्चा
राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने निश्चित केलेले आहे. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना मंगळवारी दिल्लीत बोलावून घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. विद्यमान मंत्रिमंडळातून कोणाला डावलायचे आणि कोणत्या आमदारांना मंत्रिपद द्यायचे याबाबत केंद्रीय नेत्यांनी मुख्यमंत्री आणि दामू नाईक यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यामुळे पुढील काहीच दिवसांत मंत्रिमंडळात फेरबदल होईल हे निश्चित असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
मी आहे तिथेच आहे : दिगंबर
माजी मुख्यमंत्री तथा भाजप आमदार दिगंबर कामत यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत मंगळवारी पत्रकारांनी त्यांना विचारले असता, मी मागचाही विचारही करत नाही आणि पुढचाही. मी आहे तिथे आहे, असे म्हणत त्यांनी यावर अधिक बोलण्याचे टाळले.